Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शृंगापत्ती

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2016 - 06:25
🗣 413 प्रतिसाद
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

प्रतिक्रिया द्या
92497 वाचन

💬 प्रतिसाद (413)
प
पद्माक्षी Sat, 08/20/2016 - 12:28 नवीन
मला असं का वाटतंय कि या कथेत नायिका असल्यामुळे डॉक वर जास्त टीका झाली. म्हणजे जर मुली ऐवजी मुलगा असता ज्याने आपल्या मैत्रिणीला गर्भपातासाठी आणले असते आणि तो नंतर मित्राचा जावई म्हणून भेटला असता तर लोकांनी काय सल्ला दिला असता? कदाचित असे सांगितले असते का कि मित्राला सावध करा किंवा मित्राने पूर्ण चौकशी केली आहे कि नाही हे विचारा इत्यादी.. इथे बरयाच लोकांनी म्हंटले आहे कि त्यांच्या मुलांनी असे लग्न केले तर हरकत नाही. पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल? डॉक्टरांच्या मित्राला जर ती मुलगी परत भेटली नसती तर प्रश्नच नव्हता. पण ती भेटली आणि काही नात्याने भेटली आहे. आता प्रॉब्लेम असा आहे अशा गोष्टी कायम लपून राहतातच असे नाही. त्यामुळे समजा उद्या हे त्या कुटुंबाला कळले तर काय? काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते. मग किमान त्या मित्राच्या मुलाने तरी डॉक्टरांच्या मित्राला भेटून खात्री द्यायला हवी होती. I mean, its common sense.
म
मृत्युन्जय Sat, 08/20/2016 - 12:37 नवीन
काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते. नॉट नेसेसरी. पण तुमच्या तर्कांची दिशा मात्र आवडली. तार्किकदृष्ट्या बोलायचे झाल्यास मुद्द्यात दम है :)
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
अ
अभ्या.. Sat, 08/20/2016 - 12:43 नवीन
हा ना.
मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल?
हेच विचारतोय हैसियत का मामला म्हणून. घरची, आपली बाब येते तेंव्हा कुठली हैसियत अव्वल?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पद्माक्षी Sun, 08/21/2016 - 08:35 नवीन
मला तरी यात डॉक्टरांची काही चूक आहे असे वाटले नाही. सरळ साधा किस्सा आहे, रादर व्यावसायिक नीतिमत्ता हा मुद्दा मला काही फार महत्वाचा वाटला नाही या प्रसंगात. म्हणजे तसे काही बंधन नसते तरी एकदा लग्न होऊन गेल्यावर डॉक्टर आपल्या मित्राला काही सांगू शकले असते का ? नॉट शुअर..
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
झ
झेन Sat, 08/20/2016 - 13:27 नवीन
कमाल आहे, सगळी लाज बघणं-यालाच असावी का ? एका मित्राची कुचंबणा (शृंगापत्ती शब्द आवडलेला आहे) एक केस स्टडी म्हणून स्वीकारायची ब-याच जणांची तयारी नाही. धागाकर्ता बुर्झ्वा आणि ज्या मुलीने लग्नाआधी स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले ति स्वातंत्र्याची देवता. एक तर लेखकाने मांडलेल्या चौकटीतून घटनेबद्दल काथ्या कुटावा अन्यथा वास्तवातील पात्रे ओळखीची असतील तर दुसरी बाजू मांडावी. बाकी आत्याबाईच्या मिश्या ..... - डॉक्टरांच्या मुलाने/मुलीने लग्नाआधी संबंध ठेवले तर, - मुलगी ज्याच्यामुले गरोदर राहिली त्याच्याशी परत संबंध ठेवणारच नाही, - ज्या मुलामुळे गरोदर होती त्याला एड्स झाला असेल तर, - ज्याच्याशी लग्न झाले त्याच्यामुळे कुणी गर्भपात केला असेल तर, - मुलीचे एकाच मुलाशी संबध असतील का, - मुलीचा एकच गर्भपात झाला असेल का, हि मालिका अशी चालू राहिल्यास तारक मेहता का उलटा चष्मा पेक्षा लांब मालिका होईल. एक कल्पना ... समजा स्वत: ती मुलगी मिपावर आली तर काय म्हणेल/लिहील ? ब-याचश्या प्रतिसादांवरून असे वाटते कि कथेतली मुलगी योनिशुचीतेच्या अवास्तव कल्पनांच्या विरुध्ध बंड करून उठलेली नायिका आहे आणि आपल्या समाजात लग्न हि गोष्ट “संपूर्ण स्वतंत्र्याच्या” आड येत असल्यामुळे आऊटडेटेड झाली आही.
स
संदीप डांगे Sat, 08/20/2016 - 13:31 नवीन
खरं सांगायचं तर खूप मनोरंजक धागा आणि चर्चा, मोबाईलवर असल्याने जास्त लिहू शकता नाही, पण ... असोच!!
स
साहेब.. Mon, 08/22/2016 - 09:03 नवीन
आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
V
vcdatrange Sat, 08/20/2016 - 15:33 नवीन
कोंबडीपेक्षा मसालाच जास्त चवदार झालायं यह कम्बखत श्रावण कब संपेगा?
न
नमकिन Sat, 08/20/2016 - 17:29 नवीन
महान शिक्षक आहे. ही थोड़ी बहुत सर्व सामान्य गोष्ट ठरत चालली आहे लग्नाआधी शरीर संबंध हे निरीक्षण भारतातलेच. म्हणजे एक अनुभव /ओढ/चढाओढ किंवा अपरिहार्यता इ सर्व परिस्थितित परिणति शरीर संबंधात होतेच, पण इतके गर्भवती होने पर्यंत फार कमी प्रमाण असावे असे वाटते, अहो पुढची पिढी हुशार नाहीं का! तर घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे गर्भपात कराने साठी (जे काही अंशी पापच ठरते-जसे फक्त मजा करुन घेताना गर्भ धारण करायचा अन् मारायचा) धंदा करायचा, उगीच नैतिकता -मूल्यांकन काहीतरी बागूलबुवा उभा करायचा. नैतिक मूल्ये, आचरण हे व्यक्ति, धर्म,पंथ, जाती -पाती, रिति-रिवाज, देश-ठिकाने या दरम्यान बदलत रहातात, त्यात अडकून मैत्री -विश्वास याला तोड़ता पहाणे कष्टप्रद. मागच्या पिढीने ठरवले की गर्भपात नैतिक (वरिल गोष्टीतल) पण संबंध अनैतिक, काहीही. बरं हेच पाप करुन स्वतःची मुले मोठी करुन मोक्ष प्राप्तिची अपेक्षा करणे म्हणजे हिप्पोक्रसी!
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:52 नवीन
लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. कुणी उत्तम विचार प्रवर्तक दिल्या. काहींनी नीट वाचन न करता दिल्या, कुणी भावनेच्या भरात दिल्या. जशा आहेत तशा त्या शिरसावंद्य. माझ्या मित्राला शृंगापत्ती केवळ लेखात लिहिली आहे एवढ्याच कारणाने झाली नाही तर त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर? व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ? कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)
प
पुंबा Mon, 08/22/2016 - 17:35 नवीन
आता हा खर्या अर्थाने नैतीक पेच होतो. विचार करावा लागेल.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आदूबाळ Tue, 08/23/2016 - 18:16 नवीन
त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर? व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ? कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)
हां. हा नैतिक पेच आहे. प्रायमि ग्रॅव्हिडा असं अर्थातच लिहायचं नाही. कारण "घरच्या स्त्रीरोग तज्ञा"ला माहीत आहे की ही पहिली गर्भधारणा नाही. उलट प्रायमि ग्रॅव्हिडा असं लिहिलं तर ते व्यावसायिक नीतिमत्तेचं उल्लंघन होईल. जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर तो तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. डॉक्टरच्या नव्हे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वाल्मिक Sat, 08/20/2016 - 21:10 नवीन
जर तर 1) गर्भाशयात राहिलेला भाग ,मुलगा म्हणून जिवंत असला तर आणि त्याने आई कुठे आहे विचारले असते तर ? 2) रुपाली समजा इम्पोटेन्ट झाली abortion नंतर तर ? 3) रुपाली ला तिच्या नवऱ्याहून अजून श्रीमंत कोणी मिळाला आणि त्या वेळी परत ती गर्भार असती तर ? 4) रुपेश ने IT मध्ये 2-3 switch मारले आणि तिच्या नवऱ्याहून जास्त श्रीमंत होऊन तिच्या आयुष्यात परत आला तर ? 5) रुपाली च्या डोळ्यात तिरस्कार ऐवजी प्रेम दिसले तर ?
उ
उडन खटोला Sun, 08/21/2016 - 04:52 नवीन
सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत. अपेक्षितच. भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला. बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो! टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो! एकंदरीत असोच असो! गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.
स
सामान्य वाचक Tue, 08/23/2016 - 06:45 नवीन
आपल्या स्वातंत्र्याच्या अतिरेकात आपण एखाद्या जीवाचे, एखाद्याच्या प्रेमाचे, एखाद्याच्या विश्वासाचे, एखाद्याच्या भावनांचे काय करतो आहे, याचाही विचार नाही हे अवघड आहे justify करायला
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Sun, 08/21/2016 - 04:52 नवीन
सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत. अपेक्षितच. भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला. बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो! टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो! एकंदरीत असोच असो! गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.
स
सुबोध खरे Sun, 08/21/2016 - 20:20 नवीन
गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे. अतिशय योग्य. आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. (आणि हे आमच्यासारख्या डॉक्टरना फार वेळा पाहावे लागते.) भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत? पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा. कशासाठी?
↩ प्रतिसाद: उडन खटोला
व
वाल्मिक Sun, 08/21/2016 - 20:35 नवीन
माझी परतिक्रिया आहे कि
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्य वाचक Tue, 08/23/2016 - 06:48 नवीन
,
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 08/23/2016 - 07:06 नवीन
+१ मी हेच वर लिहिले आहे. या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिली आणि नंतर कोणतेही सबळ कारण नसताना गर्भाची हत्या केली.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कपिलमुनी Tue, 08/23/2016 - 17:16 नवीन
या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिली
हे कुठुन कळला ? त्यांच्या हेल्मेटचा प्रॉब्लेम झाला असेल तर ??
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण Tue, 08/23/2016 - 17:39 नवीन
हो.ना किंवा आपल्या समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून हेल्मेटला छिद्र पाडूनही दिलेले असू शकते. पॉसिबिलीटीज आर एंडलेस
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 08/23/2016 - 20:15 नवीन
गर्भधारणा होण्याची शक्यता किती हे डॉक्टरांनी वर लिहिलंच आहे आणि असा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं असतं हे देखील लिहिलं आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मार्मिक गोडसे Tue, 08/23/2016 - 07:22 नवीन
भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?
सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.
पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा. कशासाठी?
वरील लेखात मुलीच्या बाबतीत असे काही घडलेले आढळले नाही.
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली.
म्हणजे ती पहिल्या महिन्यातच तुमच्या मित्राकडे तपासायला आली असेल (त्या मुलीची पाळी नियमीत असेल असे गृहीत धरून).
त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले.
युरीन प्रेगनन्सी टेस्ट केली असती तरी चालले असते ना? सोनोग्राफी कशासाठी ? तुमच्या मित्रानी गर्भपाताच्या गोळया देऊनही दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही म्हणून छोटी शल्यक्रिया केली असे लेखात तुम्ही म्हटले आहे, ह्यात गर्भाचे अवयव तयार झाल्याचा उल्लेख आढळला नाही. ह्याचा अर्थ त्या मुलीने कायदेशीरपणे गर्भपात केलाय तर त्याला हत्या कसे म्हणता येईल? मला तर ती मुलगी प्रामाणीक वाटते. तीने गर्भपाता करण्याचे कारण सांगताना कोणतीही गोष्ट लपवली नाही. उद्या समजा तुमच्या डॉक्टर मित्राने मेडीकल ईथिक्स तोडून त्या मुलीच्या नवर्‍याला किंवा त्याच्या वडलांना मुलीच्या गर्भपाताबद्दल सांगितले व पुढे प्रकरण घटस्पोटापर्यंत गेल्यास तुमच्या मित्रावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 08:58 नवीन
गोडसे साहेब सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.हे मान्य आहे पण गर्भ गर्भाशयातच आहे कि फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे, गर्भ एकच आहे जुळं/ तिळं आहे हे मूत्र तपासणीत कळत नाही. गर्भाशयात गर्भच आहे कि एका तऱ्हेचं कर्करोग आहे (ज्यात गरोदरपणाची मूत्र चाचणी + येते). ( पुरुषांच्या एका तर्हेच्या वृषणाच्या कर्करोगात सुद्धा गरोदरपणाची चाचणी + येते) ( http://www.cancer.org/cancer/gestationaltrophoblasticdisease/detailedguide/gestational-trophoblastic-disease-what-is-g-t-d) अशा सर्व तर्हेच्या शंका साठी सोनोग्राफी करावी लागते. शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही. (आमच्या सरांना एका मुलीने गर्भाचे हात पाय दिसत असताना मी गरोदर असणे शक्यच नाही असे ठामपणे सांगितले. त्यावर सर शांत पणे म्हणाले बेटी एक तर तू खोटं बोलत आहेस किंवातू दुसरी व्हर्जिन मेरी असशील. तूच काय ते ठरव.) सोनोग्राफीचा रिपोर्ट काय हे मी येथे सांगणार नाही कारण व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप माझ्यावर होईल. स्वतःच्या बळावर जगू शकत नसलेल्या गर्भाचा( २८ आठवड्यापूर्वी) गर्भपात हि "हत्या" आहे का हे कायदेतज्ज्ञ सांगू शकतील. पण जे झालं ते पूर्ण कायदेशीर होतं एवढंच मी सांगू शकेन. उदा. सैनिक जेंव्हा शत्रूच्या सैनिकाला गोळी घालतो तेंव्हा ती "कायदेशीर" हत्या असते
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 09:16 नवीन
एक महत्त्वाची गोष्ट राहिली. बहुसंख्य मुली तीन चार महिने झालेले असले तरी एकच महिना, दीडच महिना झाला आहे असे सर्रास खोटं बोलतात. कायद्याप्रमाणे १२ आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एकाच डॉक्टरचे मत लागते आणि १२ आठवड्यनंतर दोन डॉक्टरांची संमती लागते. हा कालावधी नक्की करण्यासाठी आणि वर म्हटल्याप्रमाणे इतर कारणांसाठी सोनोग्राफी केली जाते.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Tue, 08/23/2016 - 13:41 नवीन
धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर तुमच्या डॉक्टर मित्राने त्या मुलीला सोनोग्राफी करायला सांगितली असती का?असा मी विचार करत होतो, परंतू सगळ्याच गोष्टी खुल्या करता येत नसतात (उदा. डॉक्टर रुग्णामधील संवाद) हे तुमच्या प्रतिसादातून कळले. अशा केसमध्ये सोनोग्राफीचे फायदेही समजले.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 19:32 नवीन
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल आणि धागा जन्मालाच आला नसता.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 08/24/2016 - 07:30 नवीन
त्या मुलीची कोणतीही शारिरीक अथवा युरीन तपासणी न करता तुमच्या डॉक्ट मित्राने ती मुलगी गरोदरच आहे हे कसे ठरवले? गरोदरपणाच्या चाचणीचा क्रम थेट सोनोग्राफीने सुरू होतो का? पाळी चुकणे हे १०० % गरोदरपणाचे लक्षण आहे का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/24/2016 - 07:59 नवीन
"उलटी" किंवा संशय ग्रस्त विचारसरणी. रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली. त्यांनी तिला गर्भाचे वय आणि स्थान इ सर्व ( वर म्ह्टल्याप्रमाणे) तपासण्यासाठी सोनोग्राफीसाठी पाठवले. मूत्र तपासणी "निगेटिव्ह" आली असती तर रूपालीला डॉक्टर कडे जायची गरजच नसती आणि धाग्याचे प्रयोजनच नसते
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 08/24/2016 - 08:39 नवीन
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले
असे लेखात आहे.
रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली.
असा उल्लेख आढळला नाही म्हणून शंका आली. त्यात तुम्ही वरील एका प्रतिसादात म्हटले आहे,
शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही.
त्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल तुमचा डॉक्टर मित्र साशंक होता म्हणूनच खात्री करण्यासाठी सोनोग्राफीला पाठवले असाही अर्थ होऊ शकतो.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/24/2016 - 08:42 नवीन
सविस्तर १०० मार्कांचा निबंध पाहिजे का? मला तो झेपणार नाही. मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 08/24/2016 - 09:23 नवीन
मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.
त्या मुद्द्यावर मी प्रतिसाद दिलेले आहेत आणि ते तुम्ही वाचलेही आहेत.
माझ्या कडून आता अधिक काही लिहिणे नाही इति लेखनसीमा
असे तुम्ही म्हटल्यामुळे तेव्हडे सोडून मला धाग्यावर पडलेल्या शंका विचारतोय, परंतू
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल आणि धागा जन्मालाच आला नसता.
असे चुकीची गृहीतके मांडू नका. जशी लघवीची प्रेग्ननन्सी टेस्ट चूकीची + येऊ शकते तशी चुकीची निगेटीवही येऊ शकत असेलच ना?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Sun, 08/21/2016 - 07:18 नवीन
अबाबो, कसलं घमासान झालं ह्या धाग्यावर, अनेकांना खरेंचा साधासा मुद्दा लक्षात आलेला दिसला नाही, सगळे व्यावसायिक नितीमत्तेवर तोंडसुख घेत आहेत, चिंता वेगळीच होती डॉक्टरांच्या मित्राची!
श
शाम भागवत Sun, 08/21/2016 - 07:31 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Sun, 08/21/2016 - 21:16 नवीन
जाला वर पूर्ण वेळ सक्रिय असणाऱ्या माणसांची एक विशिष्ट मनोवृत्ती दिसून येते. ते बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात आणि त्यांना जाल हेच जग असे वाटते. लग्नाआधी संबंध ठेवले तर त्यात वावगे नाही. आणि हे तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला/ बायकोला प्रामाणिकपणे सांगून टाका. यात सकृतदर्शनी काहीच चूक नाही. पण असे विचार करणारे लोक आपल्या भारतात किती आहेत. १-२ % ( एक ते दोन टक्के) पेक्षा जास्त नाहीत. उरलेले ९८ टक्के लोक जाला वर नाहीत किंवा तशा विचार सरणीचे नाहीत. या २% लोकांमध्ये प्रेम विवाह करणारे किती असतील ४० %. म्हणजे लोकसंख्येच्या ०.८% लोकांना सकृत दर्शनी विवाह पूर्व संबंध मान्य असतील. बाकी एकंदर प्रेमविवाहाचे प्रमाण किती असेल ते भारतात १०-१२ % पेक्षा जास्त नाही. राहिली प्रचंड लोकसंख्या आजही ठरवून विवाह करते. यात आई वडिलांचा फार मोठा वाटा नक्कीच आहे. आई वडील प्रथम "बाकी सर्व" चौकशी करतात आणि मगच मुलगा/ मुलगी "पाहण्याचा" कार्यक्रम केला जातो. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत "बहुसंख्य" पुरुष दांभिक आहेत.स्वतः बाहेर कितीही शेण खाल्ले तरी त्यांना बायको मात्र अनाघ्रात कलिकाच हवी असते. आणि त्यांच्या आय बहिणींचे पण म्हणणे "पुरुषांनी काहीही केले तर चालते पण बाईच्या जातीला असे करून चालते का? असेच दुर्दैवाने असते. वर कुणी तरी लिहिले आहे ते सत्य आहे. बरेच पुरुष "चोच मारण्याचा" प्रयत्न करतात त्यातील बहुसंख्य पुरुष "असफल" होतात. मग पुरुषी अहंकार आड येतो. मी जर धुतल्या तांदुळासारखा आहे, लग्न पूर्व संबंध ठेवला नाही( खरं तर ठेवू शकलो नाही) मग माझी बायको "स्त्री" असून कसे काय ठेवू शकते. मी छातीठोक पणे हे सांगतो कि ठरवून केलेल्या विवाहात जर मुलीने लग्नाच्या अगोदर प्रामाणीकपणे सांगितले कि माझे विवाहपूर्व संबंध होते तर ९९ % विवाह मोडतील. कोण आई, बाप किंवा आत्या मावशी आपल्या मुलाचे लग्न "अशा" मुलीशी करून द्यायला तयार होतील. "असल्या" छप्पन्न मुली आणून उभ्या करिन हा घराघरात होणारा संवाद पुनःप्रक्षेपीत होत असतो. प्रेम विवाहाला विरोध करतानाही हाच संवाद ऐकायला मिळेल. ( "अशा / असल्या" मुली हि "माझी मनोवृत्ती" नसून ऐकू येणाऱ्या संवादातील शब्द आहेत अन्यथा छिद्रान्वेषी लोक यात हि बोट घालतील प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील किती लोक" आपल्या भावाचे/ मुलाचे लग्न अशा "प्रामाणिक" मुलीशी करायला तयार होतील. माझा मुलगा / भाऊ जर "तिच्याशीच लग्न करायचे" असे म्हणाला तर मी त्याला आशीर्वाद देईन हा उदात्त विचार फक्त प्रेम विवाह असेल आणि त्या मुलाची भावनिक गुंतवणूक असेल तरच शक्य आहे.नाहीतरी मुलगा/ भाऊ लग्न करणारच आहे तर मोडता का घाला. उगाच "हात दाखवून अवलक्षण का करा" असा व्यवहारी विचार आहे बघून बघायची तर "असली" मुलगी कशाला हाच सर्वसाधारण विचार. दुर्दैवाने एखादी मुलगी अगदी तरुण वयात विधवा झाली तर तिच्याशी आपल्या भावाचे/मुलाचे लग्न करून द्यायला किती बायका तयार होतील? हे सर्व प्रेम विवाहातच शक्य आहे. लग्नापूर्वी मुलीला फायब्रॉईड( गर्भाशयात गोळा) आहे असे समजल्यावर मोडलेली लग्ने मला माहित आहेत, जेथे मुलीच्या "हातात" काहीच नसते. तसे जालावर "आधुनिक होणे" फार सोपे आहे. हस्तादपि न दातव्यं, गृहादपि न दीयते (मधली ओळ आत्ता आठवत नाही) वचने किम दरिद्रता . आणि प्रेम विवाहात जर मुलीने असे सांगितले कि माझे अगोदर प्रेम होते आणि शरीरसंबंध होते तर ४०-५० % विवाह मोडतील.हे प्रमाण प्रेमाच्या कोणत्या टप्प्यात सांगितले यावर अवलंबून असेल. भावनिक गुंतवणूक होण्याच्या अगोदर सांगितले तर जास्त विवाह मोडतील. एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला अनुभवातून आलेले शहाणपण आहे ( आणि ज्याची शास्त्रीय कारण मीमांसा आता माहिती आहे) ते म्हणजे महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे. म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात यामुळे त्या स्त्री पुरुषांची भावनिक गुंतवणूक जास्त असते. वरील केस मध्ये रुपालीचा प्रेम विवाह आहे कि ठरवून ते मला माहित नाही. "व्यावसायिक गोपनीयतेमुळे"(हा शब्द आता योनिशुचितेपेक्षा पवित्र झाला आहे) माझ्या मित्राने मला सांगितले तेवढेच मी येथे लिहिले आहे त्यामुळे रुपालीने ते तिच्या नवऱ्याला सांगितले असेल कि नाही हे माहित नाही. आजही बहुसंख्य (कदाचित १०० %) "ताईचा सल्ला' सारख्या सदरात येणारे सल्ले "तुम्ही लग्नापूर्वी काय केलेत हे नवऱ्याला/ बायकोला अजिबात सांगू नका" असेच असतात हे यामुळेच आहे. कारण अशा उपचार तज्ज्ञांना हे "अनुभवातून आलेले शहाणपण" आहे. जालावरील जग हेच खरे जग आहे असे समजणारे बरेच लोक बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात असे वाटते.प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यापासुन फार लांब आहे. कोंबडीपेक्षा मसालाच जास्त चवदार झालायं हि मात्र वस्तुस्थिती. ते तसंच असतं. नुसती उकडलेली कोंबडी किती लोक खातील.
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 06:12 नवीन
अतिशय सहमत! नाथिंग मोर टू ऍड.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Mon, 08/22/2016 - 06:17 नवीन
मस्त.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Mon, 08/22/2016 - 06:23 नवीन
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते । परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता ॥
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 06:26 नवीन
धन्यवाद
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
साहेब.. Mon, 08/22/2016 - 09:11 नवीन
हा लेख लिहून तुमचे काही चुकले असे मला वाटत नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्य वाचक Tue, 08/23/2016 - 06:50 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 08:02 नवीन
त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची फसवणूक केली असे मला वाटत नाही , कारण तो मित्र मुलाचे लग्न ठरवताना डॉक्टरकडे चौकशीस आला नव्हता त्यामुळे त्याला रुपालीबद्दल माहिती देणे वा सत्य न लपवणे हे डॉक्टरचे (मित्राच्या नात्याने) कर्तव्य होवूच शकत नाही ..बाकी एक डॉक्टर म्हणून त्यांना व्यावसायिक नितिमत्ता पाळावीच लागेल त्यामुळे अपराधीपणाचे कारण नाही. बाकी लग्नाआधीचे शारिरिक संबंध हे भावी जोडीदाराला सांगितलेच पाहिजेत असे नाही पण भावी जोडीदाराने त्याबद्दल लग्नाआधी विचारले तर लपवू नये असे मला वाटते. पण त्याचबरोबर भावी जोडीदाराने त्याबद्दल (विचारायचे असल्यास) लग्नाआधि विचारावे लग्नानंतर विचारणे योग्य नाही. लग्न ठरताना मुला मुलीने स्वतःची मेडिकल हिस्टरीही एकमेकांना सांगावी असे मला वाटते . वेगवेगळे मोठे आजार, सर्जरी, फिट्स , अबॉर्शन्स , महत्वाचे अपघात, अपघाताच्या मोठ्या खुणा (जसे त्वचेवर जळाल्याचे डाग ई) याबाबत एकमेकांना अंधारात ठेवू नये. झालंच तर स्वतःला चष्मा आहे का नाही (की कॉन्टॅक्ट लेन्स वापरत आहे), केस खरेच काळे आहेत (की रंगवत आहे) , आणि पुढे जावून आपला जन्म गर्भारपणाच्या कितव्या महिन्यात झाला , कुटूंबातील अनुवंशिक स्वरुपाचे ज्ञात असणारे आजार, हे देखील होणार्‍या जोडीदाराला स्वतःहून सांगायला हवे (अर्थात हे माझे मत !!)
र
राही Mon, 08/22/2016 - 08:49 नवीन
प्रतिसाद अगदी पटला. फक्त लग्नाआधीचे अ‍ॅबॉर्शन हा अजूनही (भयंकर) नैतिक गुन्हा समजला जातो. माझ्या मते तसे समजले जाऊ नये पण वास्तव हेच की ही गोष्ट खुल्या दिलाने स्वीकारणारे आणि ती माहीत झाल्यावर, आपल्या होणार्‍या बायकोशी आपली वागणू़क त्यामुळे न बदलणारे लोक फारच कमी सापडतील. योनिशुचितेचा पगडा समाजावर फारच मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टरांच्या मित्राला त्यामुळेच आपत्ती वाटत असावी. समागमामुळे स्त्री अशुद्ध होत नाही, अगदी लग्नपूर्व समागमानेसुद्धा, हे जर स्वीकारता आले तर गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो. आजकाल सुशिक्षित महाराष्ट्रीय समाजात चांगले शिकलेल्या मुलामुलींचे विवाह फारच उशीरा होतात. मुलामुलींचा लैंगिक कोंडमारा होतो. कित्येक मुले/मुली असे संबंध ठेवीत असतील. यात मुलाच्या बाजूला काहीच धोका नाही. पण मुलीला गर्भ राहिला तर कौटुंबिक आणि सामाजिक समस्या उद्भवते, हे वाईट आणि विषमतादर्शक असले तरी खरे आहे. लवकर विवाह उरकणे हा यावर उपाय नाही, (नाही तर जुन्या काळी मोठी चळवळ उभारून कायदा करायला लावून बंद पाडले गेलेले बालविवाहच बरे होते असे म्हणावे लागेल) तर परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता असणे हा आहे.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
र
राही Mon, 08/22/2016 - 09:28 नवीन
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. समागमसुख हे उच्च दर्जाचे सुख (मजा, आनंद काहीही म्हणा)आहे. ज्या काळात ते सर्वाधिक प्रमाणात हवेहवेसे वाटते, त्या काळात त्यापासून मुकावे लागू नये. येथे टेनिसच्या जुन्या इतिहासातले एक उदाहरण अवांतर ठरू नये. पुष्कळ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कॅशने विंबल्डन स्पर्धा जिंकली. करंडक स्वीकारल्यानंतर मैदानात लगेचच घेतल्या जाणार्‍या मुलाखतीत नेहमीचा ठरीव प्रश्न 'तुला कसं वाटतंय विंबल्डन जिंकल्यावर' त्यालाही विचारण्यात आला. रांगड्या पीटने भर मैदानात तुडुंब स्टेडियमसमोर सांगितले 'I am thrilled. This is more thrilling than even sex' केवळ अशा अद्वितीय कामगिरीतले यश हेच सेक्समधल्या आनंदापेक्षा अधिक आनंद देऊ शकते.
↩ प्रतिसाद: राही
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 10:42 नवीन
साधारण किती जणांमध्ये सेक्स केला तर चालेल? कितीचा ग्रुप मान्य करावा असं आपलं मत आहे? द्रौपदी स्टाईल एका स्त्रीचे चार पाच की एखाद्या नरपुंगवाप्रमाणे एका चे आठ दहा जणींशी की जोड्या जुळवा प्रमाणे इकडे चार तिकडे चार अशा कॉम्बिनेशन्स? परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता कशी ठरवणार?
↩ प्रतिसाद: राही
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 11:10 नवीन
वाह्यात प्रश्न
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 11:19 नवीन
नाही. वाह्यात नाही लैंगिक मुक्तता परस्पर संमतीने मान्य असेल तर अशा यात शक्यता लक्षात घ्यायला हव्यात ना? अशा प्रकारच्या संबंधाने नंतर ज्या गोष्टी होतील त्याला कुणाला जबाबदार धरणार?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चंपाबाई Mon, 08/22/2016 - 11:09 नवीन
अगदी सहमत !
↩ प्रतिसाद: राही
र
राजाभाउ Mon, 08/22/2016 - 15:38 नवीन
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. आता एकदा आपण लैंगिक मुक्तता मान्य केली आणि लग्न हे केवळ शरीर संबंधांसाठी नाही हेही मान्य केले तर मग असे परस्परसंमतीने मुक्त लैंगिक संबंध लग्नांनंतर ही चालू ठेवण चुकीच का ? आता ते बेकायदेशीर आहे वगैरे मुद्दे असु शकतात, पण सध्या बेकायदेशीर हा मुद्दा जरा बाजुला ठेवला तर काय ?
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा