Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

य
यनावाला
Sat, 10/07/2017 - 18:12
🗣 285 प्रतिसाद
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! " " गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?" " अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले. " गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो. मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले, " असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?" " शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला. " शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते. " वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !" ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता." " रागावू नका. मी सत्य तेच सांगितले." " आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले. सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. ****************************************************************
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
89545 वाचन

💬 प्रतिसाद (285)
प
पगला गजोधर Sat, 10/07/2017 - 19:14 नवीन
सावधान टोळधाड येत आहे .....
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 10:21 नवीन
जो माणूस दुसर्‍या विचारसरणीला टोळधाड म्हणतो तो नास्तिक कसा काय असू शकतो? ================================== अस्तिक लोकांच्या विचारांना नास्तिक किती वाचतात, समजून घेतात वा सन्मान देतात याचं हा प्रतिसाद एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एस Sat, 10/07/2017 - 19:35 नवीन
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
या परिच्छेदात लेखाचे सार आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 07:53 नवीन
प्रत्येक मनुष्याच्या ठायी बुद्धी, तर्क, कॉमनसेन्स, अनुभव तसेच विवेक असतो , तो समप्रमाणात असतो नि लोक एकत्र येऊन व्यवस्थित निर्णय घेऊ शकतात नि राबवू शकतात ही फार मोठी गृहितकं आहेत. याच्या आधारित जग बनवायला मूळात हे सगळं आपल्याकडे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 10/12/2017 - 14:47 नवीन
ही गृहितके माझ्या प्रतिसादात आपण कोठून शोधून काढलीत हे माहीत नाही. असो. तुम्ही मग कोणत्या गृहितकांवर जगाची मांडणी करणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 06:41 नवीन
ही गृहितके माझ्या प्रतिसादात आपण कोठून शोधून काढलीत हे माहीत नाही.
लेखाचं सार काय असायला हवं हे सांगतं. पण नुसती बुद्धी आणि तर्क असून चालत नाही. एक पूर्ण मॉडेल असण्यासाठी विवेक, निर्णय प्रक्रिया आणि राबवण्याची यंत्रणा इ देखिल आवश्यक आहे हे लॉजिकल आहे.
तुम्ही मग कोणत्या गृहितकांवर जगाची मांडणी करणार आहात?
बुद्धी आणि तर्काच्या अभावी वा कमी जास्त पणाने देखिल ईश्वरदत्त मानवी मूल्यांच्या आधारे जग उत्तम चालतं. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गोंधळ जितका कमी तितकं ते उत्तम चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Fri, 10/13/2017 - 14:47 नवीन
येथे तर्कबुद्धी आणि विवेकबुद्धी असा भेद करणे जास्त योग्य ठरेल. तर्काच्या पायावर नीतिमत्ता आणि सारासार विवेकबुद्धी यांचा सम्यक संगम घालूनच एक आदर्शवत समाजव्यवस्था उभी राहू शकते. नीतिमत्ता असण्यासाठी धार्मिक असणं अजिबात आवश्यक नाही. एक नास्तिक मनुष्यदेखील अतिशय नीतिमान आणि सद्सदमूल्यांच्या आधारे स्वतःची सकारात्मक मूल्यव्यवस्था बनवू आणि आचारू शकतो. याउलट, एखादा अतिशय क्रूर गुन्हेगारही श्रद्धेच्या बाबतीत अतिशय सश्रद्ध आणि परमेश्वराला वगैरे मानणारा असू शकतो. ईश्वरदत्त मानवी मूल्ये हा विरोधाभास आहे. मूल्ये ही ईश्वरी असतील तर ती मानवी नसतील. मानवी असतील तर ईश्वरी नसतील. सर्व मूल्ये ही मानवी असतात असे जर मानले तर इथेही ईश्वर संकल्पना अनावश्यक ठरते. ती असल्याने-नसल्याने मुळातच सकारात्मक असलेल्या नीतिमूल्यांना फारसा विशेष फरक पडत नाही. (ईश्वर संकल्पनेच्या स्वीकारार्हतेचे मूल्यमापन या वाक्यावरून मात्र केले जाऊ नये.) वैज्ञानिक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनांचा गोंधळ हा तुमच्या नकारात्मकतेतुन आला आहे. त्याला कसलाही तर्कशुद्ध आधार नाही. तस्मात् त्यावर काही चर्चा करण्यासारखे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 19:55 नवीन
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. मी स्वबुद्धीचा आधार घेतलेला आहे. परमेश्वराचे अस्तित्व हे माझ्या अनुभवानुसार, माझ्या कॉमनसेन्सचा वापर करून आणि माझ्या बुद्धीने विचार करून मला पूर्णपणे पटले आहे आणि त्यामुळे मी तेच खरे मानतो. ते नाकारणे ही माझ्या अनुभवांशी, कॉमनसेन्सशी व स्वबुद्धीशी प्रतारणा ठरेल. यातच माझ्या माणुसपणाचा सन्मान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 20:05 नवीन
लेख उत्तम आहे. मी पण नास्तिक आहे. पण मी एक गोष्ट कटाक्षाने पाळतो ती म्हणजे आस्तिक लोकांच्या श्रद्धेची चेष्टा करत नाही (तुम्ही करताय असे म्हणत नाही). आस्तिकांनी नास्तिकांना आस्तिक बनवण्याचा किंवा नास्तिकांनी आस्तिकांना नास्तिक बनवण्याचा प्रयत्न करू नये असे मला वाटते. जेव्हा असा प्रयत्न केला जातो तेव्हा विनाकारण वाद निर्माण होतात. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या मर्जीनुसार आस्तिक, नास्तिक काय व्ह्यायचे असेल ते व्हावे. गरजेनुसार शक्य असल्यास थोडीफार लवचिकता पण दाखवावी. म्हणजे मी नास्तिक आहे पण कुणाच्या घरी पूजेला किंवा गणपतीला बोलावले तर तिथे मांडलेल्या पूजेला, मूर्तीला नमस्कार करायला मला कमीपणा वाटत नाही. तसे केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत पण यजमानाला तर बरे वाटते ना? म्हणून मग करतो नमस्कार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/07/2017 - 20:15 नवीन
+1 मूर्तीमध्ये प्राण नसतो पण जिवंत माणसांमध्ये तर असतो. त्यांना दुखावून तुम्हाला काय मिळतं? आपली श्रद्धा( किंवा त्याचा अभाव/नास्तिकता) स्वतः जवळ ठेवावी आणि माणसे जोडावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
श
श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 20:30 नवीन
मूर्तीमध्ये प्राण नसेल कदाचित, पण भावना नक्कीच असते. आपल्या प्रियजनांचे चित्र म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्ती नसतात. तरी सुद्धा आपण त्या चित्रावर थुंकु शकणार नाही किंवा ते पायदळी तुडवू शकणार नाही. त्या चित्राप्रती एखाद्याच्या भावना जशा असतात, तशाच भावना एखाद्या श्रद्धाळूच्या देवाच्या मूर्तीप्रती असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश म्हेत्रे Sat, 10/07/2017 - 21:41 नवीन
अहो पण जे देव प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरले नाहीत. त्यांच्या मूर्तीप्रती अशा भावना असू कशा शकतात. अहो आपल्या मनावर लहानपणापासून देव आहे हे बिंबवले जाते. त्यामुळे आपल्या मेंदूत कायमस्वरूपी देवाची एक आकृती तयार होते. जे लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टीने विचार करतात ते नास्तिक बनतात. बाकीचे देव नाही आहे याचा विचार करत नाहीत. कोणीतरी देव नाही आहे असे म्हणणे म्हणजे त्यांचा स्वाभिमान दुखावणे असते. त्यामुळे समाजात नास्तिक व आस्तिक असे दोन गट कायमस्वरूपी वावरत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 08:00 नवीन
अहो पण जे देव प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरले नाहीत. त्यांच्या मूर्तीप्रती अशा भावना असू कशा शकतात.
पृथ्वी कूठून अवतरली याचा विचार करताना कदाचित भावना जागृत होत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश म्हेत्रे
M
mayu4u Mon, 10/09/2017 - 13:50 नवीन
चित्राप्रती एखाद्याच्या भावना जशा असतात, तशाच भावना एखाद्या श्रद्धाळूच्या देवाच्या मूर्तीप्रती असतात.
जसं चित्रावर थुंकत नाही तसं मूर्तीवर पण नाही. म्हणजे अपमान करत नाही. पण मग मनाविरुद्ध त्या मूर्तीला नमस्कार करा असा आग्रह कशाला? केवळ यजमानांचं मन जपावं म्हणून? याच न्यायाने, माझं मन जपावं म्हणून ते मला नमस्कार करायचा आग्रह न करतील, तर ते अधिक बरे नव्हे का? (प्रतिसाद कुणालाही उद्देशून नाही. कृपया वैयक्तिक घेऊ नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 20:21 नवीन
मूर्तीला नमस्कार करा म्हणजेच आस्तिक व्हा असे कोणी सांगत आहे का? निदान मी तरी असे कोणालाही सांगत नाही. परंतु धागालेखक स्वबुद्धी वापरा, कॉमनसेन्स वापरा, ग्रंथप्रामाण्य मानू नका इ. सांगतोय. हे सांगण्यासाठी त्यांनी एक काल्पनिक प्रसंग व संवाद निर्माण केले आहेत व त्यातून आस्तिक कसे अंधश्रद्धाळू, अवैज्ञानिक वगैरे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत आस्तिक न राहता तुम्ही नास्तिक व्हा हे सांगणे हाच उद्देश आहे. बादवे, मूर्तीचा अपमान करीत नाहीत हे तितकेसे खरे नाही. कर्नाटकात यू आर अनंतमूर्ती नावाचा एक लेखक होता. त्याने लहानपणी एका देवाच्या मूर्तीवर लघवी केली होती. ही गोष्ट त्याने स्वतःच एका पुस्तकात लिहिली होती व एका मुलाखतीतही त्याचा उल्लेख केला होता. एका कलबुर्गी नावाच्या दुसर्‍या लेखकाने एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करून "देवाच्या मूर्तीवर लघवी करणे चुकीचे नाही. सर्वांनी मूर्तीपूजा बंद करावी." असाही शहाजोग सल्ला दिला होता. या दोघांनाही आपण श्रद्धाळूंच्या भावना दुखावत आहोत याबद्दल ना खंत ना खेद. हे दोघे अर्थातच पुरोगामी, निधर्मी, विचारवंत, विवेकवादी, बुद्धीप्रामाण्यवादी इ. विशेषणांनी नटलेले होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 08:17 नवीन
पण मग मनाविरुद्ध त्या मूर्तीला नमस्कार करा असा आग्रह कशाला? केवळ यजमानांचं मन जपावं म्हणून? याच न्यायाने, माझं मन जपावं म्हणून ते मला नमस्कार करायचा आग्रह न करतील, तर ते अधिक बरे नव्हे का?
माझ्या मते आपल्या देशात वंदे मातरम चा देखिल मनाविरुद्ध आग्रह होत नाही. त्यामुळं नमस्काराचा आग्रह बलप्रयोग मानता येत नाही. यजमानाला वाटतं देवानं तुम्हाला पण आशिर्वाद द्यावा म्हणून तो तुम्हाला भलं करून घ्यायचा आग्रह करत असतो. शिवाजीने औरंगजेबासमोर मान तुकवावीच अशी मानसिकता यजमानाची नसते, तो नास्तिकाचा वहम असतो. ================================ आणि ईश्वर नाही, त्याचा आशिर्वाद व्यर्थ आहे हे तुम्ही एकट्यानं, सवत्यानं ठरवलेलं मत असतं. यजमान आणि तुम्ही यांच्यामधे एक लवाद स्थापन होऊन दिलेला निर्णय (देव नसल्याचा) यजमान ठुकरावत आहे असं नसतं. तेव्हा इथे आग्रह होणं स्वाभाविक आहे. तुमची भूमिका चूक असू शकते ही शक्यता तुम्ही १००% नाकारताय, हे टाळणं बरं नव्हे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
स
संजय पाटिल Sun, 10/08/2017 - 13:09 नवीन
शत प्रतिशत सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उगा काहितरीच Sun, 10/08/2017 - 07:17 नवीन
पण मी एक गोष्ट कटाक्षाने पाळतो ती म्हणजे आस्तिक लोकांच्या श्रद्धेची चेष्टा करत नाही (तुम्ही करताय असे म्हणत नाही). आस्तिकांनी नास्तिकांना आस्तिक बनवण्याचा किंवा नास्तिकांनी आस्तिकांना नास्तिक बनवण्याचा प्रयत्न करू नये असे मला वाटते. जेव्हा असा प्रयत्न केला जातो तेव्हा विनाकारण वाद निर्माण होतात. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या मर्जीनुसार आस्तिक, नास्तिक काय व्ह्यायचे असेल ते व्हावे. गरजेनुसार शक्य असल्यास थोडीफार लवचिकता पण दाखवावी. म्हणजे मी नास्तिक आहे पण कुणाच्या घरी पूजेला किंवा गणपतीला बोलावले तर तिथे मांडलेल्या पूजेला, मूर्तीला नमस्कार करायला मला कमीपणा वाटत नाही. तसे केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत पण यजमानाला तर बरे वाटते ना? म्हणून मग करतो नमस्कार.
यातील प्रत्येक शब्दांशी सहमत ! कुणावरही काही थोपवने हेच मुळात चूक आहे. आस्तीकपणाचा असो वा नास्तीकपणाचा , अट्टाहास नकोच. बरं जसं लोक "देव आहे" हे १००% सिद्ध करू शकत नाहीत तसं "देव नाही" हे पण तर सिद्ध करता येत नाही. आजच्या वैज्ञानिक ज्ञानाला सोडवताच येणार नाहीत असे असंख्य प्रश्न आहेत .बीजगणित , भुमिती, रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र यामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या की पुराव्याने सिद्ध करताच येत नाहीत तरीही "मानाव्या" लागतात. ते चालतं तर मग देव आहे हे मानायला का नको ? असो ! शेवटी आपापली इच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
श
श्रीगुरुजी Sun, 10/08/2017 - 11:44 नवीन
अगदी बरोबर! भूमितीत, अंकशास्त्रात अशी अनेक गृहितके आहेत जी गणितीय किंवा इतर कोणत्याही मार्गाने सिद्ध करता येत नाहीत. परंतु ती गृहितके सत्य आहेत असे मानूनच इतर सिद्धांत मांडलेले आहेत. ती गृहितके सिद्ध होऊ शकत नाहीत तरी सत्य मानली जातात, तर मग देव नावाची संकल्पना सत्य मानणे याला आक्षेप का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
य
यनावाला Sun, 10/08/2017 - 09:58 नवीन
माझ्या या लेखनाचा हेतू काय हे "माझी भूमिका" या लेखात स्पष्ट केले आहे. तो लेख इथे वाचता येईलः-- http://www.misalpav.com/node/33826
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 10:26 नवीन
तुमची भूमिका योग्यच आहे असं मानून मी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरं द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/12/2017 - 10:54 नवीन
ते निघून गेले आहेत. ते परत येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 12:04 नवीन
चुकून ...यद्गत्वा न निर्वतन्ते .... हे आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 08:07 नवीन
तसे केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत पण यजमानाला तर बरे वाटते ना? म्हणून मग करतो नमस्कार.
ज्या माणसाच्या विवेकाला, साज्जन्याला स्रोत लागत नाही त्याच्या नास्तिकपणाबद्दल अस्तिकांनी देखिल असहिष्णूता दाखवू नये. एक सहिष्णू अस्तिक म्हणून मी देखिल तुम्हाला बरं वाटावं म्हणून देवदेव टाळेन असं म्हणणारे अस्तिक देखिल हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
D
Duishen Sat, 10/14/2017 - 01:15 नवीन
पूर्णत: सहमत! पण विविधांगी विचारांचा प्रचार-प्रसार होणे पण महत्त्वाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ग
गामा पैलवान Sat, 10/07/2017 - 23:21 नवीन
यनावाला, माणुसकी म्हणजे काय? हेही एक तत्त्वंच आहे ना? असो. तुमच्या काही विधानांवर टिपणी करेन म्हणतो. १.
खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत.
विद्युत्पुंज (=इलेकट्रॉन) विषयी केलेलं कुठलंही विधान असत्यच असतं. तरीपण इलेक्ट्रॉनचा प्रत्यय येतोच ना? मग ईश्वरीतत्त्वाने काय घोडं मारलंय? त्यामुळे अमुक एका दिवशी तमुक देवतेचं तत्त्व जास्त प्रमाणावर असतं, हा विश्वासाचा भाग मानायला हरकत नसावी. २.
याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते.
विद्युत्पुंजाच्याही (=इलेक्ट्रॉन) सगळ्या उपाध्या मोजता येत नाहीत. त्याचं वस्तुमान स्थिरवस्तुमान (= rest mass) म्हणून मोजलं जातं. पण व्यवहारांत विद्युत्पुंज स्थिर कधीच नसतो. समजा तो रजनीकांतने स्थिर केला असं मानूया. आता विद्युत्पुंज स्थिर आहे म्हणजे त्याची जागा निश्चित आहे. म्हणून हायझेनबर्गाच्या अनिश्चिततेच्या नियमानुसार त्याचा संवेग (= momentum) पराकोटीचा अनिश्चित असेल. आता, संवेग = वस्तुमान * वेग इथे संवेग पराकोटीचा अनिश्चित आहे. विद्युत्पुंज स्थिर असल्याने त्याचा वेग मात्र ० म्हणजे सुनिश्चित आहे. म्हणून संवेगातली अनिश्चितता पूर्णपणे वस्तुमानाच्या अनिश्चिततेमुळे उत्पन्न झालेली असणार. म्हणजेच स्थिर विद्युत्पुंजाचं वस्तुमान पराकोटीचं अनिश्चित असणार. तर मग rest mass of electron ही संज्ञा फसवीच नव्हे काय? सर जे.जे. थॉमसन यांना विद्युत्पुंजाचं भारवस्तुमान गुणोत्तर ( = charge to mass ratio) शोधून काढलं ते खोटं मानायचं का? सर जे.जे. थॉमसन यांची बुद्धी कुंठीत झालेली असेल का? ३.
दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो.
विषाणूस्फटिक ( = cryallised viruses) स्वत:हून कसलीच हालचाल करंत नाहीत. ते सजीव मानावेत का? समजा असे विषाणू पाण्यासारख्या द्रवात विरघळवून ते पाणी मानवी शरीरात टोचलं आणि विषाणू कार्यरत झाले तर आपण काय म्हणणार? माणसातलं सजीव तत्त्व स्फटिकांत उतरलं असंच म्हणणार ना? मग दगडाच्या मूर्तीने कसलं घोडं मारलंय? ४.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते.
असतेच मुळी. अशी इंद्रियबाह्य अनुभूती घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. ५.
गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे.
अगदी बरोबर. हे जर मान्य नसेल तर स्वत:च गुरू बनणे इष्टं. अध्यात्मात शिष्य म्हणून काही नसतं. एक गुरू दुसरा गुरुंच निर्माण करंत असतो. हे माऊलींनी स्वत:च सांगितलं आहे. नक्की श्लोक आठवंत नाही. साधारण अर्थ असाय की एका दिव्यावर दुसरा दिवा लावला की दोन्ही एकसारखेच झाले. ६.
तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे.
आजिबात अशक्य नाही. ७.
मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही.
प्रतिकार करणे हे मूर्तीचं काम नव्हे. ८.
प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.
विद्युत्पुंजाचं स्थिरवस्तुमान हीदेखील एक धूळफेकच आहे. विज्ञानाच्या पुरोहितांना धारेवर का धरंत नाही तुम्ही? कक्षापुंजीकरण हीसुद्धा धूळफेकच आहे. कोणाला धारेवर धरताय बोला. ९.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?
ज्याअर्थी इलेक्ट्रॉनची कक्षा स्थिर आहे त्याअर्थी तिचे पुंजीकरण झालेले असले पाहिजे, असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे माझ्यासारख्या कुणाही बुद्धिमान व्यक्तीला अनकॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या विज्ञानपुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या विज्ञानमार्तंडांना वाटत नाही काय ? १०.
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.
याच्याशी तीव्र असहमत. मी भाविक असून विज्ञानातल्या विसंगतींवर अचूक बोट ठेवतोय. यावरून माझी बुद्धी संवेदनाहीन झालेली नाही, हे सिद्ध होतं. मी श्रद्धावान असूनही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा आहे. ११.
आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.
साफ चूक. अध्यात्मातला खरा अधिकारी माणूस महावाक्यांची अनुभूती आणून देतो. बिनबुडाची विधाने करंत बसंत नाही. हां, पण भोंदू मात्र सर्रास अशी विधाने करतात. १२.
एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल.
तुम्ही तुमच्या डोक्यावरचं पारंपरिक न्यूटनीय पूर्वसंस्कारांचं गाठोडं कधी उतरवणार? पुंजवाद अभ्यासून बघा तर एकदा. १३.
माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते.
वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे माझ्या आजवरच्या आयुष्यात काडीचाही वैयक्तिक फायदा झाला नाही. मग मी तो कशाला आचरणात आणू? तुमचा आग्रह आहे म्हणूनंच ना? मग तुमचा आग्रह ही नास्तिकाची श्रद्धाच झाली की! १४.
किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."
घटनेच्या ५१ व्या कलमात असा उल्लेख आहे खरा. पण हे कर्तव्य कसं पार पाडावं याविषयी काहीच मार्गदर्शन नाही. १५.
त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही.
Orbital quantisation हे शब्दप्रामाण्यच आहे. कारण की ते दुसरं काहीच नाही. आणि अनुभवाचं म्हणाल तर ते इंद्रियांवर आधारित असतात. इंद्रियांना फसवणं अत्यंत सोपं आहे. तर्कबुद्धीच्या मर्यादा म्हणजे इंद्रियगम्य ज्ञानाच्या मर्यादा. या मर्यादा अतिशय त्रोटक आहेत. सदैव इंद्रियप्रामाण्याच्या मागे लागलं तर आयुष्य कमी पडेल. विज्ञानातसुद्धा शब्द आणि ग्रंथ प्रमाण धरावेच लागतात. एव्हढंच नव्हे तर शब्दाची पारंपरिक ज्ञानासोबत (= गतानुगतिकतेशी) सांगड घालावी लागते. याला कॉरस्पॉण्डन्स प्रिन्सिपल म्हणतात. घाऊक परिस्थितीत शब्दप्रामाण्य आणि गतानुगतिकता हातात हात घालून जायला पाहिजे यावर कटाक्ष हवा. १६.
स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
स्वबुद्धीचा आधार घ्यायला हरकत आजिबात नाही. मात्र ती आत्मानुगामी हवी. कुठलीही चिकित्सा करतांना आत्मतत्त्वाचा धांडोळा कसा घ्यावा यावर बुद्धी केंद्रित झाली पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 10/09/2017 - 14:08 नवीन
असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
D
Duishen Sat, 10/14/2017 - 01:29 नवीन
प्रस्तुत लेखाच्या लेखकाला वैज्ञानिक दृष्टीकोन अपेक्षित आहेत. तसे पहिले तर सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि क्वांन्टम फिजिक्सनुसार वैज्ञानिक जे शोध लावत आहेत, जे नियम सांगत आहेत ते त्यांच्या अनुभूतीतून आले आहेत पण ती अनुभूती म्हणजे विश्वाचे नियम नव्हेत (ते अपूर्ण नियम आहेत). पण त्याचा अर्थ असाही नव्हे की ती अनुभूती सिद्ध झालेली नाही. आणि ती अनुभूती यावी यासाठी जो दृष्टीकोन बाळगला जातो तो महत्वाचा... मग तो दृष्टीकोन भौतिकशास्त्र असो की गणित असो की समाजशास्त्र यासाठीचा असो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Sat, 10/07/2017 - 23:55 नवीन
खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात.
आपले जे लेखामागचे सदुद्देश आहेत त्यांच्येशी मी सहमत आहे. आपला उद्देश सदुद्देश आहे याच्याशीही मी सहमत आहे. आपल्याला ज्या प्रकारचा संवाद हवा त्याचेशिही मी सहमत आहे. याउपर आपणांस मर्यादेत सदुद्देशप्रेरित थट्टा करायचा अधिकार आहे असंही माझं मत आहे. ==================================== यनावाला, आपण स्वतः कशाचे बनलेले आहात? ऑक्सीजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, कार्बन, इ इ चे ना? https://en.wikipedia.org/wiki/Composition_of_the_human_body मला सांगा, यातल्या कोणत्या मूलद्रव्यात तर्कतत्त्व, बुद्धितत्त्व, भावनातत्त्व, संवादतत्त्व, जाणिवतत्त्व, इ इ आहे? https://en.wikipedia.org/wiki/Carbon इथे उजव्या बाजूला दिलेल्या एकाही गुणधर्मात या कुठल्या तत्त्वांचा उल्लेख नाही. तर आपण मूळात संबंधहिन रेणूंचा संच आहात ना? आम्हा अस्तिकांना ब्रह्मांडातल्या प्रत्येक अस्तित्वात जे ईश्वरप्रणित कनेक्शन अभिप्रेत असतं, ते तसलं काही नसल्यामुळं आपण फक्त रँडमली एकत्र झालेल्या फिजिकल पार्टीकल्सचा गोळा आहात. या गोळ्यात वरच्या बाजूला एक छिद्र असलं, आणि त्यात धर्षण झालं म्हणून त्या छिद्रातून काही आवाज आला, तर त्याचं महत्त्व ते काय? ============================================== आपण जेव्हा मूलद्रव्यांच्या मूलभूत गुणधर्मांतूनच माझी जाणीव, भावना, बुद्धी, विचार, शक्ती, सुसंगतता, एकदिशा, इ इ निर्माण झालं आहे असं म्हणता वा मानता तेव्हा आपण जी उडी मारता ना ती शीवपींडित शिवतत्त्व आहे असं मानणारापेक्षा ५० पट लांबच असते. नसेल तर सांगा कनेक्शन. ================================================================= अजून एक सांगू ... तुम्ही नास्तिक ते जे बिग बँग पार्टिकल - सिंग्युलॅरिटी त्याचं नाव - मानता ना, त्यात सारं ब्रह्मांड साठलं होतं म्हणता. म्हणजे तुमचे ते दत्तभक्त मित्र आणि तुम्ही त्या अतिसुक्ष्म बिंदूमधे खेटून बसले होतात असं तुम्ही मानता. आणि तुम्ही आणि ते संपूर्णतः होमोजिनिअस मंजे जशास तसे होतात असंही तुम्ही मानता. ते अस्तिक का झाले आणि तुम्ही हुश्शार नास्तिक का झालात त्याचा काही पत्ता नाही. आपलं अस्तित्व कसलं आहे मानायची तुमची तर्‍हा नि त्यांची, फरक कायय?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 10/08/2017 - 00:05 नवीन
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते."
चंद्रतत्त्व म्हणून कैतरी असतं, वाढतं, कमी होतं यावर तरी सध्याला शास्त्रीय वर्तुळांत वाद आहे. https://www.psychologytoday.com/articles/200501/full-moon-crazy अजूनही मानसशास्त्रात याबद्दल बरीच चर्चा आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 10/08/2017 - 00:07 नवीन
"जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते.
तशा बायका जुन्या काळात बाहेर जात नसत, पण गेल्याच, तर केवळ त्याची चर्चा आल्यावरच होत असे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 10/08/2017 - 00:12 नवीन
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"
मला पटलं नाही. शून्य काही नैसर्गिक अंक नाही. तो पूर्णांक आहे. अर्थात संज्ञांचा ढिसाळपणा सोडला तर शून्यने गुणणे, भागणे संशयास्पद आहे. ज्या संख्येने भागणे "व्याख्यिता येत नाही"* ती संख्याच मला मान्य नाही. ================================================= हा भागाकार अनंत नसतो. असा भागाकारच नसतो. का नसतो ते विचारायचं नाही. तो मानला तर सगळं बीजगणित बोंबलतं म्हणून विचारयचं नाही. बस्स.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 10/08/2017 - 00:17 नवीन
मी सत्य तेच सांगितले.
सत्य कशाशी खातात हे वैज्ञानिकांना कळेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/08/2017 - 02:56 नवीन
अभिजीत अवलिया, आ.न. गामा पैलवान, arunjoshi123 छानच उत्तरे दिली आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 10/08/2017 - 05:32 नवीन
"कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न फक्त श्रद्धाळूंनाच नव्हे, तर इतर कोणासही केव्हाही विचारू नये. अशा चांभारचौकश्या करणाऱ्यांना 'भोचक' असे विशेषण आहे. समर्थांनी अत्यंत व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत (उदा. सांगे बापाची कीर्ति तो येक मूर्ख किंवा क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे). ही त्यातलीच एक. हा एक साधा व्यावहारिक शिष्टाचार आहे. त्याच्याशी अध्यात्माचा किंवा श्रद्धेचा ओढूनताणून संबंध लावणे हा खोडसाळपणा आहे.
  • Log in or register to post comments
D
Duishen Sat, 10/14/2017 - 03:51 नवीन
गुरु तों सकळांसी ब्राह्मण | जऱ्हीं तो जाला क्रिया-हीन | तरी तयासीच शरण | अनन्यभावें असावें ||६|| सकळांसि पूज्य ब्राह्मण | हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण | वेदविरहित तें अप्रमाण | अप्रिये भगवंता ||१०|| ------संदर्भ: दशक ५ समास १ : गुरुनिश्चय || दशक पांचवा : मंत्रं || ५.० || समास पहिला : गुरुनिश्चय || ५.१ || ब्रह्मज्ञानाचा विचारू | त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू | वर्णानां ब्राह्मणो गुरुः | ऐसें वचन ||३०|| ........... संदर्भ दशक १४ समास ७ : युगधर्म निरूपण समास सातवा : युगधर्म निरूपण || १४.७ || नरदेहीं विशेष ब्राह्मण | त्याहीवरी संध्यास्नान | सद्वासना भगवद्‍भजन | घडे पूर्वपुण्यें ||२|| .........संदर्भ - समास चवथा : भक्तिनिरूपण || २.४ || वरील दासबोधातील नमूद विचार एक साधा व्यावहारिक शिष्टाचार आहे का असा प्रश्न पडतोय. श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे तशी पाळावीत का? ...केवळ संतानी सांगितले म्हणून किंवा देवाच्या नावाने सांगितले म्हणून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Sat, 10/14/2017 - 13:21 नवीन
श्रद्धाळूनी वरील वाक्ये आहे तशी पाळावीत का?
समलैंगिकाबद्दल घटनेत लिहिलं आहे (१४ ऑक्ट २०१७ रोजी) ते तुम्ही आहे तसं पाळता का? पाळावं का? ============================================================================= दासबोधात ब्राह्मणांना केलेले उपदेश, बंधने, शिक्षा, इ इ यांचं देखिल संकलन कराल काय? मंजे शेवटी ते सगळं जशास तसं पाळणाराच शेवटी ब्राह्मण उरतो. एवढ्या ओव्यांपुरतं असं लिहिलेले नाही कि Notwithstanding anything else written anywhere else in this Dasbodh, this will supersede. अशा प्रकारे काही ओव्या टाकणं कि अन्यत्र सर्वत्र ब्राह्मणांना फक्त माज करायला सांगीतला आहे याला काय अर्थ आहे? उदा. त्यांनी ब्रह्मचर्याची लै तारिफ केली आहे. पण अशानं त्याच पिढीत ब्राह्मण संपून गेले असते. ======================== एकूण धार्मिक साहित्य, त्यांच्यातले घोळ, विरोध, विसंगती हे खूप फ्लेक्सिबल असतं. ते सद्य भारतीय प्रशासनव्यवस्थेसारखं नसतं. खूप जाडजूड. खूप घोळ असणारं. खूप विसंगती असणारं. भयंकर रिजिड. आणि व्यवस्था ठप्प करणारं. ===================== "आजच्या" ब्राह्मणाचा दिवस कसा असावा याबद्दल काही वर्षांखाली एका शंकराचार्याने एक २-३ पानी मार्गदर्शन पत्र काढलं होतं. अर्ध्या ब्राह्मणांना तर ते वाचूनच हार्ट अ‍ॅटॅक आला असता. तुम्ही वर जे काय प्रिविलेज्स कोट केलं आहे त्याच्याकरता काय काय किंमत द्यायची रामदासांची आयडिया आहे, आणि इतर तसल्या लोकांची आहे हे देखिल पाहणं गरजेचं आहे. यात समतोल आहे का याचं उत्तर सब्जेक्टिव आहे. यात विचित्रपणा नक्कीच आहे पण आजच्या व्यवस्थांच्या विचित्रपणाच्या तुलनेत किती आहे हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते ब्राह्मणांनी कसं वागावं आणि इअतरांनी त्यांचेशी कसं वागावं याची रामदासाची एकूण अपेक्षा फार विक्षिप्त नसेल. (त्यांचे साहित्य वाचणारे अंध नसलेले लोक काय म्हणतात यावरून. मी वाचलेलं नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
D
Duishen गुरुवार, 10/19/2017 - 17:40 नवीन
राज्यघटनेचे प्रथम पान (प्रस्तावना) सोडली तर पूर्णत: लवचिक आहे. प्रस्तावना ही मूल्यांबाबत वक्तव्य करते. त्या मुळ मुल्ल्याना धक्का न लावता त्यात अधिकची भर टाकता येते. वेद हे सनातन मानल्या जातात आणि त्यात बदल संभवत नाही. आणि खुद्द स्वामी रामदासांनी म्हटल्या प्रमाणे - सकळांसि पूज्य ब्राह्मण | हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण | वेदविरहित तें अप्रमाण | अप्रिये भगवंता ||१०|| तेंव्हा भगवंताला अप्रिय होईल असे वेदविरहित (जे स्वामी समर्थांना मानतात त्या) आस्तीकांकडून वागण्याचा संभव आहे असे वाटत नाही... आणि असे अप्रिय वर्तन झाल्यास आस्तिकतेवर शंका घेण्यास जागा आहे, असे मानावे का? सर, मी अतिसामान्य माणूस आहे, आपण विचारले की "दासबोधात ब्राह्मणांना केलेले उपदेश, बंधने, शिक्षा, इ इ यांचं देखिल संकलन कराल काय?". हे संकलन आधीच अनेक मोठ्या व्यक्तीने करून ठेवले आहे आणि ते सर्वत्र उपलब्ध आहे. या सर्व व्यक्तींचे आभार मानले पाहिजेत कारण असे सर्व धार्मिक साहित्य वाचतांना नास्तिकतेकडे प्रवास सुरु झाला. "एकूण धार्मिक साहित्य, त्यांच्यातले घोळ, विरोध, विसंगती हे खूप फ्लेक्सिबल असतं. ते सद्य भारतीय प्रशासनव्यवस्थेसारखं नसतं. खूप जाडजूड. खूप घोळ असणारं. खूप विसंगती असणारं. भयंकर रिजिड. आणि व्यवस्था ठप्प करणारं". घोळ / विसंगती धार्मिक साहित्यात नाही... आपण भारतीय समाज म्हणून जे समजून घेत आहोत त्यात घोळ आहे. आपली समज बदलणे आवश्यक आहे. ३५०० पेक्षा अधिक जातीसमूहांचा बनलेला देश, प्रत्येक जातीने निर्माण केलेला देव/ देवी आणि त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य (ज्याला धार्मिक साहित्य असे साधारणत: समजल्या जाते) हे परस्पर विरोधी आणि विसंगत वाटणारच! त्या सर्वांना एकाच धर्माच्या एकाच धाग्यात गुफन्याचा प्रयत्न केल्यास विरोधाभासच दिसणार! माझ्या दृष्टीने हे धार्मिक साहित्य हे तत्कालीन परिस्थितीत समाजाने स्वत:चा आरसा निर्माण केला यापलीकडे काहीही नाही. पण हे साहित्य तत्कालीन समाजमानस समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे हे नक्की! "आजच्या" ब्राह्मणाचा दिवस कसा असावा याबद्दल काही वर्षांखाली एका शंकराचार्याने एक २-३ पानी मार्गदर्शन पत्र काढलं होतं. अर्ध्या ब्राह्मणांना तर ते वाचूनच हार्ट अ‍ॅटॅक आला असता...." आपल्याला शंकराचार्यांचे मत अमान्य आहे असे दिसते. कदाचित अमान्य वाटणे योग्यही असू शकेल. पण मग परिस्थितीसापेक्ष बदलण्यापेक्षा मुळातून स्व-बदल कुठल्याही व्यक्तीच्या स्वहिताचा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मामाजी Sun, 10/08/2017 - 06:04 नवीन
'मी नास्तिक आहे व तार्किक दृष्ट्या मी ते सिद्ध करू शकतो' या आपल्या भूमिकेवर आपली श्रद्धा आहे का?
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sun, 10/08/2017 - 08:59 नवीन
पण आस्तिकांच्या भावना का दुखवताय
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 10/08/2017 - 09:11 नवीन
त्यांनी फक्त त्यांचे मत व्यक्त केले आहे. तुम्हाला त्यांचे मुद्दे पटत नसतील तर त्यांचे मत खोदून काढा राणाप्रताप साहे. बाय द वे, चॉकलेट खायला केव्हा बोलावताय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
R
Ranapratap Sun, 10/08/2017 - 12:05 नवीन
आपलं स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ध
धर्मराजमुटके Sun, 10/08/2017 - 09:14 नवीन
"गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ?
नाही. बट आय डोन्ट केअर. मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास असल्या विचारांची आवश्यकता नसते. अशा धाग्यांवर नेहमी लिहितो तेच पुन्हा लिहितो. एकतर श्रद्धाळू (किंवा अंधश्रद्धाळू म्हणा हवे तर) असा किंवा नास्तिक असा. पण देवात / धर्मात आणि त्यातील कर्मकांडांमधे विज्ञान शोधणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. विज्ञान अपनी जगह आणि धर्म अपनी जगह !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 10/08/2017 - 10:03 नवीन
लेखक साहेब असं कधी कुणा मुस्लिमाला विचारलयं का? शुन्य गुनिले शुन्य? शुक्रवारीचं का? तुम्ही नाही विचारू शकत. कारण तिथे जिवाशी गाठ.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/10/2017 - 10:34 नवीन
ह्याच प्रश्नासाठी बोट दुखेस्तोवर केलं होतं स्क्रोल!!!!!! शेवटी आलाच, धाग्याचे घोडे गंगेत न्हाले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
न
नेत्रेश Sun, 10/08/2017 - 10:46 नवीन
१०० गणवेशातील मुलांपैकी दोघांचा वाढदीवस आहे. ती दोन मुले कोणती हे तुम्हाला निरीक्षण करुन, ह्हात लाउन वगैरे ओळखता येतील का? नाही? कारण त्यांचात इतर कोणते दृष्य बदल त्या दीवशी झालेले नाहीत. मग त्यांचा वाढदीवस साजरा करु नये का? त्यांना त्याच दीवशी शुभेच्छा व भेटवस्तु देण्यात काय अर्थ आहे असे तुम्ही त्यांचा आईवडीलांना विचारु शकता का? नेत्या पुढार्‍यांच्या वाढदीवसाला अलोट गर्दी होते, त्यांना काही बोलता येत नसेल तर मग देवाच्या दीवशी देवळात गर्दी करणार्‍यांवर कशाला बोलायचे? देव विचारायला येत नाही म्हणुन?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 07:17 नवीन
याला म्हणतात इन काइंड रिटर्न गिफ्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
श
श्रीगुरुजी Sun, 10/08/2017 - 11:37 नवीन
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. स्वतःचा मुद्दा मांडण्यासाठी लेखकाने ओढूनताणून एक काल्पनिक प्रसंग व कथा रचलेली दिसते. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे नक्की काय हे लेखकाला समजले आहे का याविषयी शंका आहे. कोणतीही गोष्ट/दावा विज्ञानाच्या सहाय्याने तपासून नंतरच ते सत्य आहे का असत्य हे ठरविणे याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे स्वतः प्रयोग करून स्वतः अनुभव घेतल्यानंतर निष्कर्ष काढणे हाच वैज्ञानिक दृष्टीकोन. परमेश्वर नावाचे काहीतरी अस्तित्वात आहे किंवा नाही हे प्रयोग केल्याशिवाय किंवा स्वतः शोध घेऊन स्वानुभव घेतल्याशिवाय कसे ठरविता येईल? परमेश्वर नावाची कल्पना माझ्या मनाला पटत नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही व या कल्पनेवर विश्वास ठेवणारे निर्बुद्ध असा अंधअविश्वास बाळगणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. हा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक दृष्टीकोन आहे. आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात अंधश्रद्धाळूच असतो. उदाहरणार्थ आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ श्रद्धेपोटीच. किती व्यक्ती प्रयोगशाळेत जाऊन ज्यांना आपण आपले आईवडील मानतो तेच आपले खरे जैविक जन्मदाते आहेत याची चाचणी करून घेतात? तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले सुद्धा अशी चाचणी करून घेत असल्याचे ऐकिवात नाही. कोणी म्हणेल की गुणसूत्रांची चाचणी करून आपण आपल्या जन्यदात्यांविषयी खात्री करून घेऊ शकतो. हा दावा बरोबर वाटतो. परंतु गुणसूत्रांची चाचणी बरोबर आहे व ती चाचणी अगदी अचूकपणे जन्यदात्यांची खात्री करून देते यावर आपण स्वतः त्या चाचणीचा अभ्यास न करता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही का? आणि समजा ती चाचणी खरी असली तरी आजतगायत किती जणांनी आपण ज्यांना आईवडील मानतो त्यांच्या व आपल्या गुणसूत्रांची चाचणी करून हेच आपले जन्मदाते याची वैज्ञानिकदृष्ट्या खात्री करून घेतली आहे? रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात आपण डोळे झाकूनच दुसर्‍यांवर विश्वास ठेवत असतो व त्या गोष्टी आधी सिद्ध करा असे आव्हान देत नाही. परंतु परमेश्वर असा काही उल्लेख झाला की लगेच देव आहे हे सिद्ध करून दाखवा अशी मागणी सुरू होते. भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत. गणेशोत्सव साजरा करणे, सत्यनारायण पूजा इ. = अंधश्रद्धा मोहर्रम, ईद, ईस्टर इ. = घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य जत्रेत बळी = अंधश्रद्धा बकरी मारणे = कुर्बानी देशद्रोही घोषणा = अभिव्यक्ती स्वातंत्र्य वंदेमातरम् = बळजबरीने लादलेला राष्ट्रवाद देशद्रोही घोषणांना विरोध = अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळणे वंदेमातरमला विरोध = अल्पसंख्याकांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य हिंदूंच्या बाजूने बोलणे = जातीयवाद हिंदूंच्या विरूद्ध बोलणे = धर्मनिरपेक्षता मांसाहार करणे = पुरोगामी शाकाहारी असणे = प्रतिगामी हुसेनने काढलेली चित्रे = कलंदर कलावंताच्या कलेचा उस्फूर्त आणि अमूर्त आविष्कार चार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे = मुस्लिमांना डिवचण्यासाठी केलेला खोडसाळपणा हुसेनच्या चित्रांना विरोध = फॅसिस्टांची सांस्कृतिक दडपशाही चार्ली हेब्दोमधील व्यंगचित्रांना विरोध = डिवचलेल्या समाजाची उस्फूर्त व स्वाभाविक प्रतिक्रिया १९८४ मधील दंगली = इंदिरा गांधींच्या हत्येमुळे आलेली जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया २००२ मधील दंगली = पूर्वनियोजित वांशिक हत्याकांड अगदी तसेच "आस्तिक" आणि "नास्तिक" असे दोन शिक्के ठरलेले आहेत. आस्तिक = अज्ञानी, स्वतःच्या बुद्धीने विचार न करणारा, कॉमनसेन्स न वापरणारा, शब्दप्रामाण्य/ग्रंथप्रामाण्य इ. मानणारा, प्रतिगामी इ. दुर्गुणांची खाण नास्तिक = वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा, बुद्धीप्रामाण्य मानणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करणारा, कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेला समजा परमेश्वर नावाचे काही अस्तित्वातच नसेल तर निदान आस्तिकांना काही काळाने का होईना पण हे लक्षात येऊ शकते आणि त्यामागे त्यांचा स्वानुभव असेल कारण त्यांनी त्या मार्गाने स्वतः जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. असलेले समजणे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 10/08/2017 - 12:30 नवीन
आयला या शेवटच्या वाक्यासाठी गुरुजींना माझ्याकडून दंडवत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभिजीत अवलिया Sun, 10/08/2017 - 13:20 नवीन
भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत.
· · · ·
कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेला
असहमत. मनगढंंत प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा