Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

य
यनावाला
Sat, 10/07/2017 - 18:12
🗣 285 प्रतिसाद
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! " " गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?" " अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले. " गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो. मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले, " असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?" " शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला. " शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते. " वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !" ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता." " रागावू नका. मी सत्य तेच सांगितले." " आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले. सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. ****************************************************************
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
89545 वाचन

💬 प्रतिसाद (285)
D
Duishen Sat, 10/14/2017 - 05:30 नवीन
शतश: सहमत... पिरा... सरळ आणि छान मांडणी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आनंदयात्री Mon, 10/30/2017 - 17:34 नवीन
पिलीयन रायडर तुम्ही अगदी परफेक्ट लिहले आहे. शब्दाशब्दाशी सहमत.
पुन्हा आत्मा, पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी असे काही प्रकार असतील असं मला वाटत नाही.
नेमके हे सगळेच खोटे ठरल्याने फार मोठी मौज आयुष्यातून निघून गेली आहे हे मात्र खरे! आता पुढचा जन्म पक्ष्याचा नाही किंवा ८४ लक्ष जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून ईश्वरत्त्वात सामावणे नाही. छ्या बुवा! गंमतीचा भाग सोडला तर बाकी चर्चेत बहुतेक लोकांचा सूर म्हणतोय तसे, तर्ककर्कश नास्तिक आणि तर्ककर्कश आस्तिक, दोघेही, तुमचा फक्त वेळ वाया घालवतात, बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चामुंडराय Tue, 10/10/2017 - 01:13 नवीन
यान्ना वालाल्ला, अहो हे आस्तिक अन नास्तिक (त्यात आता अज्ञेयवादींची भर), मूर्तिपूजक अन मूर्तिभंजक इत्यादी इत्यादी हि त्याचीच लीला आहे हो ! तो मस्त आपल्या मध्ये भांडणे लावून मजेत बघतो आहे. तुम्ही कशाला त्रास करून घेता आणि इतरांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करता? जस्ट चिल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/10/2017 - 08:36 नवीन
तो मस्त आपल्या मध्ये भांडणे लावून मजेत बघतो आहे. तुम्ही कशाला त्रास करून घेता आणि इतरांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करता? जस्ट चिल. त्यांचा दोष नाही. कदाचित, त्यानेच त्यांची (त्यांच्या नकळत) भांडणांचे कॅटॅलिस्ट म्हणून निर्मिती केली असेल. ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चामुंडराय Sat, 10/14/2017 - 15:20 नवीन
यान्ना वालाल्ला कॅटॅलिस्ट कॅटॅलिस्ट हा रिअक्शन चा वेग वाढवतो मात्र तो प्रत्यक्ष त्यात भाग घेत नाही, अलिप्त असतो. या धाग्यावरची यान्ना वालाल्ला यांची अलिप्तता बघता ते नक्कीच कॅटॅलिस्ट असावेत :). त्यांचा, त्यानेच, त्यांची, त्यांच्या च्या गुंत्यात अडकलेला परंतु प्रयत्नपूर्वक अर्थ समजावून घेतलेला चामुंडराय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/14/2017 - 22:29 नवीन
कॅटॅलिस्ट हा शब्द मी हेतूपुर्रसर वापरला होता. कारण यनावाला, नेहमीच, लेखाची काडी टाकून आस्तिक-नास्तिकांत वादविवादाची सुरूवात करून देतात आणि स्वतः मात्र... जर प्रतिसाद वाचत असले तर, अलिप्तपणे मजा पाहत राहतात; प्रतिसाद वाचण्याचीही तसदी घेत नसले तर बहुदा पुढच्या काडीच्या तयारीला लागत असावेत ;) . लेखावरच्या वादविवादाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही असेच त्यांच्या प्रतिसाद न देण्याच्या तटस्थ वृत्तीवरून दिसते =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
न
नाखु Tue, 10/10/2017 - 05:28 नवीन
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.+++१११ इतकं मुद्देसूद मांडणी करून लिहायला कधी येणार कुणास ठाऊक? व्यक्तिगत आयुष्यात​ कठीण प्रसंगी देव भले करेल म्हणुन कायम प्रयत्नशील असलेला भोट. (दिवंगत सहचरीचा देवावर असिम श्रद्धा होती आणि माझा तिच्यावर ठाम विश्वास)
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 10/17/2017 - 06:45 नवीन
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही ... +१ काम्य भक्ती किंवा अडचणीच्या काळात आर्ततेने केलेली उपासना ही गौंण मानली जाते. अडचणीत असलेले लोक मार्केटिंगच्या भूलथापांना सहज बळी पडतात, त्यामुळे 'अमुक दिवशी अमुक तत्व जास्त असते' अशा प्रकारचे मार्केटिंग अलीकडेच सुरू झाले असावे. हा थोडासा इतर मुलांपेक्षा अमुक एका ब्रँडचे फूड सप्लिमेंट घेणारा मुलगा उंच, चपळ, हुशार वगैरे असतो असे दाखवण्यासारखा किंवा अमुक एका संस्थळावरून ठराविक उत्सवी कालखंडात वस्तु खरेदी केल्याने त्या स्वस्तात मिळतात असा आभास निर्माण करण्यासारखा काहीतरी प्रकार आहे. अशा गोष्टी फारश्या सत्य नसल्या तरी बर्‍यापैकी निरूपद्रवी असतात. व्यक्तीपरत्वे ज्या धारणा असतील त्याप्रमाणे त्या कुणाला कमीअधीक प्रमाणात खटकू शकतात. टोकाच्या धारणा असलेल्या एखाद्या साम्यवाद्याचा/ समाजवाद्याचा एखाद्या ईकॉमर्स संस्थळाच्या इन्डियन फेस्टिवल सेलवर अशाच धाटणीचा लेख आला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मूकवाचक Tue, 10/17/2017 - 06:45 नवीन
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही ... +१ काम्य भक्ती किंवा अडचणीच्या काळात आर्ततेने केलेली उपासना ही गौंण मानली जाते. अडचणीत असलेले लोक मार्केटिंगच्या भूलथापांना सहज बळी पडतात, त्यामुळे 'अमुक दिवशी अमुक तत्व जास्त असते' अशा प्रकारचे मार्केटिंग अलीकडेच सुरू झाले असावे. हा थोडासा इतर मुलांपेक्षा अमुक एका ब्रँडचे फूड सप्लिमेंट घेणारा मुलगा उंच, चपळ, हुशार वगैरे असतो असे दाखवण्यासारखा किंवा अमुक एका संस्थळावरून ठराविक उत्सवी कालखंडात वस्तु खरेदी केल्याने त्या स्वस्तात मिळतात असा आभास निर्माण करण्यासारखा काहीतरी प्रकार आहे. अशा गोष्टी फारश्या सत्य नसल्या तरी बर्‍यापैकी निरूपद्रवी असतात. व्यक्तीपरत्वे ज्या धारणा असतील त्याप्रमाणे त्या कुणाला कमीअधीक प्रमाणात खटकू शकतात. टोकाच्या धारणा असलेल्या एखाद्या साम्यवाद्याचा/ समाजवाद्याचा एखाद्या ईकॉमर्स संस्थळाच्या इन्डियन फेस्टिवल सेलवर अशाच धाटणीचा लेख आला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
R
Ram ram Tue, 10/10/2017 - 09:55 नवीन
ओरिजिनल पेक्षा बाटगे कट्टर असतात, व त्यांनीच हिंदू धर्म सुधारायचा ठेका घेतलाय. तिरंगा मधला ठराविक भाग यांनी वेगळा वाटून घेतलाय.
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Tue, 10/10/2017 - 15:59 नवीन
भावना मूर्तीमध्ये नसतात, माणसात असतात. त्या माणसाच्या भावनेला आडून हात घालण्याने त्याला दुखावण्यापेक्षा काहीही सध्या होत नाही. देवत्वसुद्धा त्या मूर्तीत नाही तर त्या व्यक्तीच्या मनात, त्याने त्या देवाला मनोमन बहाल केलेल्या स्थानात असते. श्रद्धांबद्दल म्हणाल तर खुपश्या श्रद्धा आपण सगळेच बाळगून असतो मग तो आस्तिक असो कि नास्तिक. भारताची बॉर्डर, चलन, (इव्हन बिटकॉईन्स ) घड्याळाच्या काट्यावर मोजलेली वेळ, विषुववृत्त- कर्कवृत्त -मकरवृत्त हे सगळे श्रद्धेवरच आधारलेले आहेत अर्थात ते मान्यता मिळलेले असल्यामुळे आपण त्याला ''डोळस श्रद्धा '' म्हणू शकतो. भारतातील लोकांना बांधव मानणे (इतर देशवासियांना नाही?) हे पण तर श्रद्धेवरच तर आधारलेले आहे. एखादा भाऊ मानतो त्याचप्रमाणे इतर काही देव मानतात. (खरं तर इथे मानणे हा शब्दच 'मानणे आणि असणे' यातला फरक सांगतोय). वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि फीलिंग्स / beliefs चा तर फारसा संबंधच नाही. काही नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना . शास्त्रीय दृष्ट्या असे काही (देव वगैरे ) सिद्ध व्हायची शक्यता आजच्या घटकेला तर जवळजवळ नाहीचे, कधीच तो सिद्ध झाला नाही. मग जे सध्या नाहीये किंवा कधीच नसणार आहे असे वाटण्याच्या आजच्या फीलिंग्समुळे त्याच्या भूत-भविष्य-वर्तमानकाळातील असण्या-नसण्यावर भाष्य करण्यापेक्षा देव मानणे किंवा न मानणे हे फक्त लोकांच्या (आस्तिकांच्या आणि नास्तिकांच्या) फीलिंग्स आणि beliefsशी निगडित आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. जेंव्हा हे नास्तिकाला आस्तिक (किंवा vice-versa) व्हावेसे वाटेल तेंव्हा त्याने ते स्वतः विचार करून व्हावे. आस्तिकता असो किंवा नास्तिकता (किंवा मधले काही ) कोणावरही लादले जाऊ नये आणि इतरांच्या स्टॅन्ड मुळे दुसऱ्यावर ते मानायचे बंधन येऊ नये असे मला वाटते. मात्र आस्तिक लोकांची कर्मकांडे खूपदा दुसर्यांना त्रासदायक ठरतात यावर त्यांनी नक्कीच विचार करावा. जैन- बुद्ध धर्मात देवपूजा नाही तरी ते आंबेडकरांना , गौतम बुद्धांना दैवत्व बहाल करतात, म्हणजे त्यांचे विचार follow करतच नाहीत. देवाच्या नावाचा business वेगवेगळ्या प्रकारे सुरूच राहतो, कोट्यवधी देव आणि त्याची मंदिरे यांचा अवाढव्य खर्च. एवढे करून एका तरी ठिकाणी त्यांना शांती मिळते का याचा विचार करावा. धर्माच्या नावावर सुरु असलेल राजकारण, बुवाबाजी, प्रथा-रीती , गुरु करणे आणि दहशतवाद वगैरे जगजाहीरच आहे, हा सगळाच भावनेचा business आहे. तो बदलायला हवा पण त्याचबरोबर नास्तिकांचा वादासाठी घातलेला वाद हाही अट्टाहासच दर्शवतो. अर्थात नास्तिकांपेक्षा आस्तिक विचारसरणीच्या अतिधार्मिक लोकांचा त्रास आपल्याला नेहमीच जास्त होत आला आहे हे मान्य. त्यामुळे आपली आस्तिकता किंवा नास्तिकता आपल्या स्वतःपुरतीच असणेच इष्ट. त्यामुळे : '' स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.'' हे तुम्ही सांगितलेले सर्व ज्याच्या त्याच्या इचछेनुसार कुवतीनुसार घेतील, घ्यावे.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/12/2017 - 06:42 नवीन
पहिले दोन परिच्छेद सोडून उरलेला प्रतिसाद पटला.
काही नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना .
यात जरा गोंधळ आहे. उद्या मी म्हणालो मी एका नवीन मूलद्रव्याचा शोध लावलाय. हे मूलद्रव्य पाहिजे तो आकार धारण करू शकते. त्याला मर्यादा नाही. त्याचा एक अणू हा कधी एका आकाशगंगे इतका विशाल असू शकतो तर कधी न मोजता येण्याइतका लहान असतो. या मूलद्रव्याचे नाव मी "अराजक" ठेवतो. तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील. मी का मानतो हे मूलद्रव्य आहे आणि कशा प्रकारे त्याची सिद्धता करतो हे प्रयोगाने सिद्ध करावे लागेल. आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये. उद्या कोणी समाज "वांग" आमच्यासाठी देवासमान आहे म्हणाले आणि ते खाणारे सगळे आमच्या भावना दुखावत आहेत म्हणाले तर तुम्ही काय कराल? भावना वांग्यात नाही पण त्याला देव मानणाऱ्या लोकात आहेत म्हणून सोडून द्याल? वांग्याला देव मानणे वेडगळ वाटत असेल ना? मग दगडाला देव मानण्याबाबत काय म्हणाल? टीप: मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते. मंदिरे नसावीतच असे माझे म्हणणे नाही पण तिथेच देव आहे म्हणून जावे किंवा माझ्या इच्छा आकांशा पूर्ण करून घ्याव्यात म्हणून जावे असे पण नाही. त्यामुळे ठराविक दिवशीच जावे असे काही करावे लागत नाही. पण पुढच्याची उपेक्षा केल्याने त्याची अशा गोष्टींवर विचार करण्याची इच्छा देखील मरू शकते, त्यामुळे तुच्छ कोणाला लेखू नये वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 14:25 नवीन
मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते.
तुम्हाला केळाचा रंग आवडतो. भूक नसताना तुम्ही ते खाता. त्यातलं आहारतत्त्व तुम्हाला मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 14:28 नवीन
आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये.
एखादी गोष्ट आहे असं, तुमच्या पद्धतीप्रमाणे कधी/कसं/कशाच्या आधारावर्/कसोटीवर मानतात, म्हणतात? मंजे अस्तित्व कसं सिद्ध करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 14:32 नवीन
तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील.
विज्ञानात या अराजक तत्त्वाला सिंग्यूलॅरिटी म्हणतात. तुम्ही म्हटलेत तेच गुण आहेत त्याचे. (तसे त्याही पेक्षा वाह्यात आहेत पण ते असो.) त्याचा काहिही पुरावा नाही. शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते. त्यामानाने अस्तिक "विरोधाभासांबद्दल" इतके विसंगत आणि आग्रही नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 10/13/2017 - 21:04 नवीन
वांगे आणि दगड हे सोडून बरे लिहिलंत, असो!
शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते.
मनू नका ना मग, सोप्प आहे! पण मग ते नक्की काय आहे हे तुम्ही शोधू शकता आणि नवे नियम सिद्ध करू शकता कोण अडवतंय! गंमत म्हणजे इथे तुम्हाला जे वाटलं ना तेच बऱ्याच लोकांना देवाच्या बाबतीत पण वाटत आणि मग बुद्धी नको म्हणते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मारवा Sat, 10/14/2017 - 16:18 नवीन
तुमचे सर्वच प्रतिसाद अतिशय सुंदर आहेत. त्यातील तर्कयुक्तता तर भावतेच पण ते मजेदारही आहेत. असे क्वचितच जुळुन येते. शिवाय तुमच्या आयडी नावाच्या फ़ारच विरोधी ही पण एक गंमतच आवडले तुमचे सर्व प्रतिसाद ब्रिलियंट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Mon, 10/16/2017 - 08:11 नवीन
धन्यवाद मारवाजी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सप्तरंगी Tue, 10/24/2017 - 13:48 नवीन
मूलद्रव्य सिद्ध करून पुराव्यासकट दाखवावे लागेल. नुसते आहे म्हणून चालणारच नाही. अर्थातच ते सिद्ध होईपर्यंत ते अस्तित्वात नव्हतेच असेही म्हणता येणार नाही, मूलद्रव्य असण्याचा पुरावा नव्हता एवढेच म्हणता येईल. देवाच्या बाबतीत लोक तेवढे हुशार आहेत, किमान आस्तिक माणूस तरी पुरावा शोधायच्या फंदात पडणार नाही. आजतादात निरनिराळ्या ताकदी, गुणवैशिष्ट्ये देत त्या त्या काळातील गरजांनुसार माणसाने नव-नवीन देवांची , धर्मांची निर्मिती केली आहे. उद्याच्या अजून वेगळ्या गरजेनुसार अजून नवीन देव निर्माण होऊच शकतात. अस्तित्वात असलेल्या वांग्याला बहुतेक कोणी मानणार नाहीत कारण पण त्याची पॉवर दाखवताना अडथळे येतील. देव मान्यता मिळालेला आहे , सध्यातरी वांगे त्याची बरोबरी करू शकत नाही:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 13:51 नवीन
देवाच्या नावाचा business वेगवेगळ्या प्रकारे सुरूच राहतो, कोट्यवधी देव आणि त्याची मंदिरे यांचा अवाढव्य खर्च. एवढे करून एका तरी ठिकाणी त्यांना शांती मिळते का याचा विचार करावा. धर्माच्या नावावर सुरु असलेल राजकारण, बुवाबाजी, प्रथा-रीती , गुरु करणे आणि दहशतवाद वगैरे जगजाहीरच आहे, हा सगळाच भावनेचा business आहे.
देव नावाचा बिझनेस नगण्य आकाराचा आहे. "अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी Tue, 10/24/2017 - 13:34 नवीन
याबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा. लिंक्स द्या.
"अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 14:10 नवीन
भावना मूर्तीमध्ये नसतात, माणसात असतात.
भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
सप्तरंगी Tue, 10/24/2017 - 13:35 नवीन
तुम्ही काहीही म्हणा रसायन किंवा भावना मूळ अर्थ बदलत नाही. काहीही पाहून, वाचून, समजून घेऊन वगैरे जे भाव, विचार create होतात त्या भावना. त्या भावना नसल्याशिवाय तुम्ही इतके सगळे रिप्लाय देणार नाही, यावर अजून एक नवीन धागा / विडंबन वगैरे नक्कीच करणार नाही.
भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 10/24/2017 - 17:19 नवीन
https://experiencelife.com/article/emotional-biochemistry/ नास्तिक झाल्यावर भौतिकतेच्या पलिकडे काहीही नाही असं मानावं लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
D
Duishen गुरुवार, 10/19/2017 - 18:50 नवीन
सप्तरंगी जी, आपल्या सबंध लिखाणाशी सहमत आहे! योग्य आणि चांगले मत मांडले आहेत. जैन- बुद्ध धर्मात देवपूजा नाही तरी ते आंबेडकरांना , गौतम बुद्धांना दैवत्व बहाल करतात, म्हणजे त्यांचे विचार follow करतच नाहीत. व्यक्तीचे दैवतीकरण विचारांना संपवणारे असते आणि हे समाजासाठी खूप त्रासदायक ठरणार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
स
समर्पक Tue, 10/10/2017 - 17:44 नवीन
नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना +१ नास्तिक असणे मान्य आहे पण आस्तिकद्वेष्टेपण हे करंटेपण अजून काय ! आस्तिकांच्या भावविश्वाची कधीच बरोबरी होऊ शकणार नाही. त्यांचे विशेषतः कला क्षेत्रातील योगदान केवळ ते आस्तिक होते म्हणूनच इतके महान आहे. कलात्मक मंदिरे, संगीत रचना, काव्य, नृत्य, पाकशास्त्र, हस्तकला, अलंकार यात असलेले असीम वैभव यांचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर या भावविश्वात बुडी मारणे हा एकच मार्ग आहे. क्षणभर का होईना 'भावाने' ओले व्हावे, मग जा हवे तर आपल्या जगात. स्वबुद्धीला मान्य नसेल तरी काही गोष्टी करून पाहाव्यात मी तर म्हणेन...आपल्यासारखे नसणाऱ्यांविषयी मद आणि मत्सर मूलक भावना केवळ स्वतःचेच नुकसान करतील. किंवा फायदा तरी नक्कीच चुकवतील...
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/12/2017 - 09:09 नवीन
नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना +१
याविषयी कुठेतरी ऐकले होते की आपल्या नास्तिकतेवर अशा लोकांची इतकी श्रध्दा असते की त्यापुढे हजारो आस्तिकांची श्रध्दा फिकी पडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
ग
गामा पैलवान Tue, 10/10/2017 - 22:15 नवीन
श्रीगुरुजी,
असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे.
Sad but true. पूर्वी या विधानाशी मी असहमत होतो. पण आधुनिक विज्ञान आणि पुंजवाद यासंबंधी यनावालांचं मौन कानठळ्या बसवणारं आहे. इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही. डोळ्यांस दिसेल ते खरं समजणं ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 13:37 नवीन
इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही.
विज्ञानाचं अज्ञान असणं नास्तिक असण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/11/2017 - 07:39 नवीन
अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते.
ही त्यांची श्रद्धा झाली. तसे अन्य दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्ट ( डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन) ला पुरोगामी विज्ञानवादी विवेकवादी व समविचारी लोकांची ताकद सहस्त्रपटींने वाढते हे देखील खरे आहे अशी आमची श्रद्धा? आहे
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Fri, 10/13/2017 - 02:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/12/2017 - 09:16 नवीन
मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal).
लेखकांनी बहुदा डॅनिएल कॅनेमन आणि डॅन एरिअली यांची पुस्तके वाचलेली दिसत नाहीत :)
श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते.
साफ अमान्य. आपण समजतो तितके तर्कनिष्ठ आपण (म्हणजे सगळेच-- त्यात आस्तिक आणि नास्तिक दोन्ही गट आले) अजिबात नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर्कनिष्ठतेचा अभाव आपल्याऐवजी इतरांमध्ये आहे हे आपल्याला लगेच जाणवते :) आणि मग त्यामागचे कारण श्रध्देचा भडीमार वगैरे दिले जाते. त्यात अगदी अजिबात अर्थ नाही. पण असले काहीतरी बोलले की आपण फार मोठे शास्त्रीय दृष्टीकोन असलेले किंवा विज्ञानवादी असा आव मात्र आणता येतो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/12/2017 - 12:16 नवीन
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यनावालांसारखे कठोर नास्तिक लोक समाजात आवश्यक देखील असतात. त्यामुळे समाजाला एक गती येते. कठोर सश्रद्धतेतुन सामूहिक वेडाचार करणारे लोक कायद्याला वेठीस धरतात. त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि. अशा धारणेतून ते लिहित असतात. प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे त्यांना शक्य नाहि हे आपणही जाणतो. त्यामुळे ते ब्रॉडकास्ट स्वरुपाचे लेखन करतात. त्यांच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद पहाता हे लेखन अनेकांना किमान विचार करायला तरी भाग पाडते असे म्हणता येईल. टोकाचे सश्रद्ध आहेत म्हणून त्याला समायोजित करायाला टोकाचे अश्रद्ध आहेत, नमो भक्त व नमोद्वेष्टे जसे आपण सोशल मिडियावर पहातो तसे. जणु काही मधलि काही भानगड नश्शे! असो
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/13/2017 - 10:50 नवीन
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यनावालांसारखे कठोर नास्तिक लोक समाजात आवश्यक देखील असतात. त्यामुळे समाजाला एक गती येते. कठोर सश्रद्धतेतुन सामूहिक वेडाचार करणारे लोक कायद्याला वेठीस धरतात. त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि. अशा धारणेतून ते लिहित असतात. प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे त्यांना शक्य नाहि हे आपणही जाणतो. त्यामुळे ते ब्रॉडकास्ट स्वरुपाचे लेखन करतात. त्यांच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद पहाता हे लेखन अनेकांना किमान विचार करायला तरी भाग पाडते असे म्हणता येईल. टोकाचे सश्रद्ध आहेत म्हणून त्याला समायोजित करायाला टोकाचे अश्रद्ध आहेत, नमो भक्त व नमोद्वेष्टे जसे आपण सोशल मिडियावर पहातो तसे. जणु काही मधलि काही भानगड नश्शे! असो कठोर किंवा मृदुमुलायम नास्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले नास्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत. कोणत्याही नास्तिकांमुळे समाजाला गती आल्याचे पाहण्यात नाही. समाज आपल्या गतीने हालचाल करीतच असतो. जेव्हा हालचाल करायची असते तेव्हा समाज हालचाल करतो आणि जेव्हा स्वस्थ बसायचे असते तेव्हा समाज स्वस्थ बसतो. त्याला नास्तिकांची किंवा आस्तिकांची गरज नाही. सामूहिक वेडाचार हा कठोर सश्रद्धतेतूनच येतो असे नाही. तो अश्रद्धतेतून सुद्धा येतो. सामूहिक वेडाचार हे सामूहिक गुन्हेगारीचे कृत्य आहे. त्याचा श्रद्धेशी संबंध नाही. यनावालांच्या लेखातून कठोर प्रहार वगैरे काही नसून फक्त आस्तिकांची हेटाळणी व स्वतःची लाल केलेली आहे. असले लेख कायमच बूमरँग होतात. हा लेखसुद्धा बूमरँग झाल्यामुळे यनावाला कोणालाही उत्तर न देता निघून गेले आहेत. जर प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे शक्य नसेल तर असले लेख लिहून स्वतःची लाल करण्याची गरज काय? आस्तिक नास्तिकांना पटेल असा देवाचा अनुभव देऊ शकत नाहीत. मग आस्तिक व नास्तिकांमध्ये फरक काही नाही कारण दोघेही एकमेकांचे समाधान करू शकत नाहीत. त्यांचा धागा वाचून कोणीही विचारात पडले असेल असे मला वाटत नाही कारण हा लेख म्हणजे कोणतेही वैचारिक लेखन नसून निव्वळ दांभिकपणा आहे. ज्यांनी हा लेख लिहिला त्यांनी आधी स्वत:च्या आयुष्यात विज्ञानवादी व्हावे आणि नंतर जगाला फुकटचे सल्लामृत पाजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
D
Duishen Sat, 10/14/2017 - 05:52 नवीन
कठोर किंवा मृदुमुलायम नास्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले नास्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत. वरचे वाक्य मी बदल करून लिहून वाचतो.. (जरी मला वाक्य पटत नसले तरीही...) जिथे नास्तिक शब्द वापरला तिथे आस्तिक वापरावा आणि जिथे आस्तिक शब्द वापरला तिथे नास्तिक वापरून पाहावा.. म्हणजे खालीलप्रमाणे - कठोर किंवा मृदुमुलायम आस्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले आस्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत... भारतात साधारणत: ४० च्या आसपास टीव्ही चॅनल्स २४*७ देव आणि धर्म यावर आधारित आहेत. शिवाय १-२ अपवाद वगळता न्यूज चॅनल्स कोणत्याना कोणत्या देवाची आरती दाखवत असतात.. त्यानंतर आजचे भविष्य सांगणाऱ्याची रीघ! हे सर्व आस्तिकजन इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे मास लेवलवर सल्ले देत आहेत असे मानायचे का? आस्तिक नास्तिकांना पटेल असा देवाचा अनुभव देऊ शकत नाहीत. .....दोघेही एकमेकांचे समाधान करू शकत नाहीत. तुमच्या सर्व प्रतिक्रियांपैकी (प्रतिसादांपैकी नव्हे..) केवळ या प्रतिक्रियेचा मात्र मी मनापासून आदर करतो. तुमचे वरील वाक्य पटण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Sat, 10/14/2017 - 11:36 नवीन
भारतात साधारणत: ४० च्या आसपास टीव्ही चॅनल्स २४*७ देव आणि धर्म यावर आधारित आहेत. शिवाय १-२ अपवाद वगळता न्यूज चॅनल्स कोणत्याना कोणत्या देवाची आरती दाखवत असतात.. त्यानंतर आजचे भविष्य सांगणाऱ्याची रीघ! हे सर्व आस्तिकजन इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे मास लेवलवर सल्ले देत आहेत असे मानायचे का?
आपला देश चालवणे = शेजारच्या देशावर हल्ला करणे असं श्रीगुरुजी म्हणत नाहियेत. हा लेख दुसर्‍या देशाचं आक्रमण या स्वरुपातला आहे, असं म्हणायला लागणारे निकष इथे लागू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 12:58 नवीन
त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि.
कठोर नास्तिकांच्या कळपात कठोर अस्तिक अमान्य असतो. त्याला कुत्र्यासारखं हुस्कावून लावतात. रेडीट वरचा अथेइझम सबरेडिट गरजूंनी ट्राय करावा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत ववले गुरुवार, 10/12/2017 - 15:16 नवीन
यनावाला महाशयांना काहीतरी सकारात्मक बदल करायचा आहे. वैज्ञानिक दृष्टीकोण , असे काहीतरी करायचे आहेत म्हणताहेत ते. त्यांना असे का वाटते की असे केल्याने जगाचे कल्याण होईल? खरतर जगात कुणी काही ही कितीही केले तरी चांगले आणि वाईट यांचे द्वंद्व म्हणजे द्वैत सदोदीत असणारच. नव्हे ते आहेच. वाईट नष्ट करता येणार नाही. कारण मुलतः वाईट, वाईट नसतेच. ते आपण म्हणतो , मानतो म्हणुन वाईट. वाईट सापेक्ष आहे. चांगले नसेल तर वाईट नसणारे. आणि वाईट नसेल तर चांगले नसणारेय. म्हणजेच काय तर दोन्ही ही अस्तित्वात होते, आहेत आणि असणारेत. इतिहास पहा. तथाकथित पुराणे पहा. रामकृष्ण ही आले गेले...पण जग बदलले का? नाही बदलले. बरोबर ना? चला तुम्हा नास्तिकांना राम कृष्ण नकोयेत तर तुम्ही सांगा एखादे नाव की ज्यामुळे जग बददले आहे. सर्वत्र सुख शांती समाधान आले आहे. आठवा ....आणि सांगा.. . . . . . . नाही ना सांगता येत? इतिहासाचे अवलोकन करा..तर्क वापरा आणि सांगा समाज बदलला आहे का कधी? . . . . . . नाही बदलला. समाज बदलला नाही हे चिरंतन सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे तरी तुम्ही का म्हणुन समाजास बदलण्यासाठी एवढा आटापिटा करताय? तुम्ही हा उपदव्याप करताय कारण तुम्हाला आशा आहे की समाज बदलेल. प्रयत्न करने तुम्ही सोडीत नाही कारण तुमची श्रध्दा आहे समाज बदलेल. श्रध्दावंत ते दत्त भक्त असतील नसतील माहीत नाही. पण तुम्ही पक्के श्रध्दावंत आहात. झणभर असे मानले की तुम्ही समाज बदलण्यासाठी लिहित नाही, तर मग लिहिताय कशासाठी? दत्तभक्त किती अज्ञानी आणि मी किती ज्ञानी असे काही तरी मिरविण्यासाठी? की तुमच्या सारख्याच अन्य नास्तिक लोकांकडुन शाब्बाशीची थाप पाठीवर मारुन घेण्यासाठी? की तर्क फक्त तुम्हालाच माहीती आहे, भक्तांना तर्क माहीत नाही हे दाखवण्यासाठी? तीन पैकी कारण काही ही असले तरी ही तुम्ही श्रध्दावंतच ठरता...म्हणजेच काय तुम्ही श्रध्दावंतच आहात. आणि तुमची श्रध्दा अशी आहे की तुम्ही समाजामध्ये चांगले (चांगले - वाईट सापेक्ष आहेत, सुरुवातीची वाक्ये पुन्हा वाचा.) बदल करणार आहात. अस्तु...
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 10/12/2017 - 19:29 नवीन
जग बदलणे इतकी मोठी उडी यनावालांची नसावी बहुतेकं. ( वर श्री घाटपांडे काकांनी म्हटल्याप्रमाणे) काही थोड्या चालीरीती/रूढीमध्ये बदल होणे इष्ट आहे हे brodcast करण्याइतपतच त्यांचा इरादा दिसतो. आणि बदल तर होतच आले आहेत. कालची संस्कृती, रीतीरिवाज, भाषा, बोलणे - वागणे, पेहराव आज नाहीत. बदल हा निसर्गनियम आहे. तो घडतोच . कोणी अडवू शकत नाही त्याला. फक्त थोडासा nudge दिला तर तो सुरळीत आणि लवकर घडतो. आणि हो, ' त्याविण जग का ओसचि पडले?' असे म्हटले तरी रामकृष्णांचे अवतारकार्य थांबत नाहीं. आपल्याविना जग ओस पडत नाही हे जाणूनही त्यांचे अवतारकार्य थांबत नाही. (इथे यनावाला आणि राम कृष्ण यांना समान मानण्याचा अजिबात उद्देश नाही. गैरसमज नसावा. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत ववले
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 15:16 नवीन
जग बदलणे इतकी मोठी उडी यनावालांची नसावी बहुतेकं.
पण असल्या एकूण उड्यांची संख्या महत्त्वाची आहे. ============ स्वतःचा पाय न मोडून घेणे, कोणाच्या अंगावर पडून त्याला न दुखवणे, काही न तोडणे, हे ही महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 15:09 नवीन
तुम्ही हा उपदव्याप करताय कारण तुम्हाला आशा आहे की समाज बदलेल. प्रयत्न करने तुम्ही सोडीत नाही कारण तुमची श्रध्दा आहे समाज बदलेल. श्रध्दावंत ते दत्त भक्त असतील नसतील माहीत नाही. पण तुम्ही पक्के श्रध्दावंत आहात.
जग बदलणार नाहीच हि एक श्रद्धा आहे. म्हणून यनावाला श्रद्धावंत नाहीत. - इति त्यांचे वकील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत ववले
ए
एम.जी. Fri, 10/13/2017 - 13:24 नवीन
मी आस्तिक का नास्तिक हे मला ठाऊक नाही. मी ते जाणून घ्यायच्या फंदातही पडत नाही. बरेचसे लोक मला नास्तिक म्हणतात.. काही लोकांना हे माहितेय की मी वर्षातून एकदातरी आमच्या कुलदैवताला जातोच जातो... ते लोक हा धागा पकडून मला आस्तिक 'म्हणतात... मी सगळ्यांनाच " यू आर राईट " म्हणतो... " मी आस्तिक आहे.. " असं बोंबलणार्‍यांइतकेच " मी नास्तिक आहे " असं बोंबलणारेही गोंधळलेले असतात.....
  • Log in or register to post comments
D
Duishen Sat, 10/14/2017 - 01:10 नवीन
तुमचा लेख मायक्रो पातळीवरून मॅक्रो पातळीकडे जातो. या सर्व बाबी आंतरसंबंधित आहेत. यातील मला शेवट महत्त्वाचा वाटला .... माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. मला तरी असे जाणवले की हा शेवट गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मुळातून आणि व्यक्ती(गत) पातळीवर बदल घडवणे आवश्यक आहे असे आपल्याला मनापासून वाटते. खूप जणांना पचवण्यासाठी अवघड आहे कारण व्यक्ती(गत) पातळीवर अनेक संस्कारांचे मिश्रण वागणुकीतून दिसते. शिवाय धर्म आणि देव या संकल्पना खाजगी असूनही त्या सार्वजनिक पद्धतीने मिरविण्याची संस्कृती रुजली आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये जे विविध निकष लावले जातात (आरोग्य, शिक्षण, जीवनमान इ.) - त्यात असे दिसून आले आहे की ज्या देशात (उदा. नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड इ.) नास्तीकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे मानवी विकास निर्देशांक पण (इतर देशांच्या तुलनेत) चांगला आहे. देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदात संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 10/14/2017 - 12:26 नवीन
देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात.
जागतिक महायुद्धं युरोप चर्चच्या अधिपत्याखाली होता तेव्हा झाली कि सेक्यूलर , धर्मनिरपेक्ष सत्तांखाली होता तेव्हा झाली? ज्या रेसेसना युरोपिय लोकांनी संपवलं, मिलियन्सनि मारलं त्यांना न मारता ख्रिश्चन करून घ्यावं अशी चर्चची भूमिका होती. ==================== लोकांचा गैरसमज वाढेल अशी विधानं करू नयेत. ====================================== देव धर्माच्या कत्तलींमधे राजकारण्यांनी केलेले हायजॅकिंग वजा करायला पाहिजे. मंजे अगदी २००२ चे दंगे पण अधार्मिक मानावे लागतील काही विभक्तांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
A
arunjoshi123 Sat, 10/14/2017 - 12:52 नवीन
(उदा. नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड इ.)
सोयीच्या उदाहरणाचं उदाहरण. अमेरिका आणि चीन याच जगात आहेत. त्यांच्यात जास्त लोक आहेत म्हणून ती जास्त सुयोग्य उदाहरणे असतील. ---------------- यांच्यातला सर्वात मोठा ऑस्ट्रेलिया, आणि त्यांची लोकसंख्या = भारताची १ वर्षाची लोकसंख्यावाढ. ----------------------------- सौदी अरब समोर देखिल हे देश टुच्चे आहेत. एच डि आय मधे सौदी अरब खूप अग्रगण्य आहे. ============================== सर्वात जास्त श्रद्धा आणि विकास यांचा ग्राफ प्लॉट केलात तरी कोरिलेशन तेच येतं. तो प्लॉट करणारा कोण ते महत्त्वाचं!!! ================================================
शिवाय धर्म आणि देव या संकल्पना खाजगी असूनही त्या सार्वजनिक पद्धतीने मिरविण्याची संस्कृती रुजली आहे.
देव आणि धर्म खाजगी आहेत? कसं ठरलं म्हणे हे? =================================================
किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
घटनाकारांना विज्ञानाच्या मर्यादा माहित नव्हत्या. असत्या तर त्यांनी एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगून दुसरिकडे सर्वांना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
D
Duishen गुरुवार, 10/19/2017 - 22:32 नवीन
नास्तिकता ही लोकसंख्येची मोजतात शासन व्यवस्थेची नाही...त्यामुळे चीनचे उदाहरण लागू पडत नाही.तरीसुद्धा माहितीस्तव चीन एच. डी.आय. च्या एकूण १८८ देशात ९१ व्या क्रमांकावर आहे. अमेरिका ही नास्तिकांची आहे हा मोठा अपसमज आहे.. तरीसुद्धा माहितीस्तव ... अमेरिकेत पश्चिकडील राज्यात नास्तिकता वाढत आहे आणि तिथे एच. डी.आय. चांगला आहे जेंव्हा की दक्षिणेकडील राज्यातील एच. डी.आय. त्यांच्या इतर राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. सौदी 3८ व्या क्रमांकावर आहे. देव आणि धर्म खाजगी आहेत? कसं ठरलं म्हणे हे? जर देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल, स्थितप्रज्ञता मिळवणे असेल तर ते एकांतात होऊ शकते, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन शक्य आहे. एकांत सामाजिक कसा असू शकतो!? स्व-देव आणि स्व-धर्म विधी सामाजिक बनवून कदाचित इतरांवर श्रेठत्व गाजवता येऊ शकते पण स्थितप्रज्ञता मिळू शकत नाही. मला देवाशी लीन व्हावयाचे म्हणून मी उपवास करणे योग्य / ध्यान करणे योग्य पण मी करतोय म्हणून घरातल्यांनी केलेच पाहिजे / समाजातील लोकांनी केलेच पाहिजे या भूमिकेत काही देवपण राहत नाही. एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगून दुसरिकडे सर्वांना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले नसते. कदाचित 'वैज्ञानिक दृष्टीकोन' या शब्दाची व्याख्या आपण खुप अगम्य / वेगळ्या पद्धतीने करीत असणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 10/24/2017 - 13:44 नवीन
नास्तिकता ही लोकसंख्येची मोजतात शासन व्यवस्थेची नाही.
असं मानूनच उत्तर दिलं आहे. शिवाय मोर नंबर ऑफ टूच्चड पॉप्यूलेशन्स लाइक नॉर्वे डोन्ट मेक सेन्स. प्लॉट बिग नेशन्स, तिथले नास्तिक टक्केवारी आणि विकासांक टूगेदर.
देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल
हा एक हेतू असेल. एकमात्र नाही. शिवाय हा एक हेतू कंपल्सरी अजिबातच नाही.
जर देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल, स्थितप्रज्ञता मिळवणे असेल तर ते एकांतात होऊ शकते, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन शक्य आहे. एकांत सामाजिक कसा असू शकतो!?
समाजात एकांत नसतो म्हणजे समाज नास्तिक आहे? --------------- आदिवासी धर्म जास्त चांगले अध्यात्मिक असतात का? ------------------- शास्त्रज्ञ देखील जंगलात गेले पाहिजेत. त्यांना पण लागणारा एकांत समाजात कसा मिळेल? एकांत आणि समाज हे विरोधी शब्द ना!?
स्व-देव आणि स्व-धर्म विधी सामाजिक बनवून कदाचित इतरांवर श्रेठत्व गाजवता येऊ शकते पण स्थितप्रज्ञता मिळू शकत नाही.
वारकरी संप्रदायाबद्दल आहे का हे? सुफी संतांबद्दल?
मला देवाशी लीन व्हावयाचे म्हणून मी उपवास करणे योग्य / ध्यान करणे योग्य पण मी करतोय म्हणून घरातल्यांनी केलेच पाहिजे / समाजातील लोकांनी केलेच पाहिजे या भूमिकेत काही देवपण राहत नाही.
केलेच पाहिजे असे नको या तत्त्वाला अपवाद फक्त यनावाला सारख्या नास्तिकांचा! ========================================== लोक धार्मिक असण्याचा आग्रह अत्यंत सुयोग्य आणी आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
D
Duishen Wed, 10/25/2017 - 01:19 नवीन
शिवाय मोर नंबर ऑफ टूच्चड पॉप्यूलेशन्स लाइक नॉर्वे डोन्ट मेक सेन्स. प्लॉट बिग नेशन्स, माफ करा! हे इंग्रजी वाक्य मराठीत दिल्यामुळे अर्थ लागत नाहीये! कदाचित शब्दोच्चार पद्धती वेगवेगळी असू शकेल... हा एक हेतू असेल. एकमात्र नाही. शिवाय हा एक हेतू कंपल्सरी अजिबातच नाही. इतर हेतूबाबत जाणून घ्यायला आवडेल. समाजात एकांत नसतो म्हणजे समाज नास्तिक आहे? माझे असे मत नाही. एकांताची संकल्पना ऋषी-मुनींनी व्यक्तिगत उदाहरणातून समोर ठेवली. एकदा ज्ञान प्राप्ती झाली की यातील बरेच समाजात परतले आहेत पण तत्पूर्वी त्यांनी एकांत मिळवला आहे हे नक्की! आदिवासी धर्म जास्त चांगले अध्यात्मिक असतात का? अध्यात्मिक असतात की नाही हे माहिती नाही पण धर्माच्या नावाने तिथे गोंधळ आणि श्रेष्ठत्व आणि हिंसा नाही हे नक्की. पण बदलत्या काळात त्यांचे जीवन आपण मनात असलेल्या धर्म आणि संकृतीने ढवळून निघते आहे. वारकरी संप्रदायाबद्दल आहे का हे? सुफी संतांबद्दल?. माझ्या डोळ्यासमोर ९० च्या दशकातील रस्त्यावरचे नमाज आणि रस्त्यावरच्या महाआरत्या अशा प्राथमिकतेने समोर होत्या. तुम्हाला याची खात्री आहे का असे स्पर्धात्मक वागून दोघांनाही इच्छित अल्लाह किंवा देवाची प्राप्ती झाली असेल! ...आणि जेंव्हा कुणीही आणि कुठल्याही धर्मातील आस्तिक त्याला / तिला वाटणाऱ्या देवाशी लीन होऊ इच्छितो त्याला/तिला कर्मकांडांची गरज भासत नाही. रोजच्या जगण्यातील उदाहरणे पण देता येतील! वारकरी आणि सुफी हे संप्रदाय अश्या कर्मकांडांच्या विरोधातून जन्मले आणि पुन्हा वारकरींची वाटचाल हळूहळू कर्मकांडांकडे होत आहे. लोक धार्मिक असण्याचा आग्रह अत्यंत सुयोग्य आणी आवश्यक आहे. तुमची धार्मिक असण्याची व्याख्या काय?... कदाचित मी धार्मिक असण्याची जी व्याख्या करतोय आणि तुम्ही जी व्याख्या करताय त्यात मुलभूत फरक असू शकेल कारण तुम्ही तुमच्या अनुभवातून बोलताय आणि मी माझ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 10/25/2017 - 08:34 नवीन
आपले सारे प्रतिसाद वाचले. आपण सत-हेतूप्रेरित नास्तिक आहात. म्हणजे निष्कारण सज्जन आहात. असल्या नास्तिकपणाचा विरोध करायची अजिबात गरज नाही. त्याचं (म्हणजे सज्जनपणाचं) लॉजिक विचारायची पण गरज तशी नाही. जोपर्यंत आपण सज्जन आहात, अस्तिक असा नैतर नास्तिक, फरक पडत नाही. पण कोणी दुर्जन असेल तर: १. दुर्जन अस्तिक बांधलेल्या गुंडासारखा असतो. २. दुर्जन नास्तिक सैराट अधमासारखा असतो. दुर्जन नास्तिकाचं डॅमेज पोटेंशिअल दुर्जन अस्तिकापेक्षा हजारो पट असतं. का हा वेगळा विषय आहे. एकूणातच नास्तिक वाढले तर दुर्जन नास्तिक पैदा व्हायची शक्यता वाढते.
इतर हेतूबाबत जाणून घ्यायला आवडेल.
ईश्वर आणि धर्म यांचं काम मनुष्याच्या सिविलाईज्ड, नागरी/सुसंस्कृत जीवनात एक ओवर-आर्किंग, सर्वस्पर्शी फ्रेमवर्क उपलब्ध करून देणे हे आहे.
तुम्हाला याची खात्री आहे का असे स्पर्धात्मक वागून दोघांनाही इच्छित अल्लाह किंवा देवाची प्राप्ती झाली असेल!
ईश्वरप्राप्तिसाठी स्पर्धा करण्यात काय चूक आहे?
वारकरी आणि सुफी हे संप्रदाय अश्या कर्मकांडांच्या विरोधातून जन्मले
धर्मातून , धर्मासाठी जन्मले.
तुमची धार्मिक असण्याची व्याख्या काय?
तुमची नास्तिक असण्याची व्याख्या सोय म्हणून मला द्या. तितकीच परिपूर्ण वा त्रुटी असलेली धार्मिकतेच्ची व्याख्या मी देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
श
श्रीगुरुजी Sat, 10/14/2017 - 17:27 नवीन
देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदात संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत. काहीही. पूर्ण नास्तिक असलेल्या चीनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली, पूर्ण नास्तिक असलेल्या रशियातील स्टॅलिनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली या देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने केलेल्या कत्तलीपेक्षा कमी होत्या का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा