श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" दत्त मंदिरात जात आहे."
" पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे."
" अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! "
" गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?"
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले.
" गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो.
मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले,
" असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?"
" शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला.
" शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"
ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता."
" रागावू नका. मी सत्य तेच सांगितले."
" आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले.
सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो.
हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते.
समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.
देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते.
यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ?
यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही.
पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो.
"आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."
हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
****************************************************************
बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही.हे सुद्धा मी माझ्या वरच्या प्रतिसादात म्हटलेल्या...आपल्याला जे "वाटते", त्याची शहानिशा न करता त्यालाच पूर्ण सत्य समजणे यापेक्षा मोठा वैचारिक समतोलपणा व शास्त्रिय विचार यांचा अपमान असू शकत नाही. मात्र, हे बर्याच तथाकथित विचारवंत लोकांकडून कळत-नकळत होते, हे सतत दिसते.या वाक्याच्या समर्थनार्थ उत्तम उदाहरण होईल ! तेथे लोक केवळ रस्त्यांवरच आलेले नाहीत तर त्यांनी कोर्टात जाऊन "क्रिएशनिस्ट संकल्पना" शाळांत शिकवणे कायद्याने आवश्यक केलेले आहे ! अशी कायदेशीर कारवाई जर आज भारतात कोणी करण्याचा प्रयत्नही केला तरी (अ) भारतातले इतर बहुसंख्य लोक अश्या लोकांना वेडे समजतील, (आ) कोर्ट त्यांना पायरीवरही उभे करणार नाही आणि (इ) भारतातल्या तथाकथित विचारवंतांना फेफरे येऊन ते माध्यमांत महिनो नी महिने थयथयाट करतील, यात जरा तरी संशय आहे का ? म्हणजे त्यामानाने भारतिय आस्तिक फार परवडले, नाही काय ? पश्चिमेच्या दिशेला अनेक विकसित गोष्टी आहेत यात वाद नाही. पण, तिकडे जे काही आहे ते सर्वच उदात्त, उन्नत, विशाल, विकसित, आधुनिक आहेच असे नाही... हे समजण्यासाठी पश्चिमेकडे डोळे उघडून समतोलपणे पाहणे आणि "अ, आ, इ, ई च्या बाबतित विकास आहे म्हणजेच क, ड, इ, फ च्या बाबतित विकास असेल" हे धोपट आणि अत्यंत अशास्त्रिय समिकरण मनातून दूर करणे आवश्यक आहे. तथाकथित नास्तिक विचारवंत ही चूक वारंवार करतात आणि त्या पायावर "आपले म्हणणे (जे सत्य नसते)" दडपून सांगतात असेच वारंवार दिसते. त्याच प्रतिसादात दिल्याप्रमाणे, गुगलवर creationists and US educational system असा शोध घेतला असता तर क्रिएशनिस्ट लोकांचा (पक्षी : डार्विन आणि एकंदरीत आधुनिक शास्त्र चुकीचे आहे आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाने ७ दिवसांत मानवासकट सर्व जग बनवले असे म्हणणारे) अमेरिकेतील शिक्षणपद्धतीवर किती प्रभाव आहे आणि किती राज्यांत हे प्राथमिक शाळांत शिकवणे त्या त्या राज्यांनी पास केलेल्या कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे हे सहज समजले असते... धोपट अंदाज करून त्यावरून मत बनवायची गरज पडली नव्हती... कारण तसे करणे शास्त्रिय विचार करणे होत नाही. हे काम सोपे करण्यासाठी काही दुवे.... १. https://en.wikipedia.org/wiki/Creation_and_evolution_in_public_education_in_the_United_States (थोडक्यात, सद्यकाळापर्यंतचा क्रियेशनिस्ट इतिहास) २. 14 states use tax dollars to teach creationism in public schools ३. A Map Showing Which U.S. Public Schools Teach Creationism to Kids ४. US states consider laws allowing Creationism to be taught by science teachers अ) A 2014 Gallup poll found that 42 per cent of Americans believe humans were created by God 10,000 years ago. A further 31 per cent believe in evolution, but under God’s guidance. आ) Only 19 per cent believe God has nothing to do with evolution. ५. The Evolution of Teaching Creationism in Public Schools ही केवळ वानगी आहे. गुगलवरची विचारणा अनेक डझनांनी / शेंनी दुवे देते. समाजातल्या उत्तम शास्त्रज्ञांच्या, प्रशासनतज्ज्ञांच्या, व्यवस्थापनतज्ज्ञांच्या आणि प्रकल्पतज्ज्ञांच्या, "काहीतरी उत्तम कार्य करून त्यात साभिमान भरून पावल्याचे मानण्याच्या" आंतरिक प्रेरणेने भौतिक विकास होतो... त्यामागे, ते तज्ज्ञ किंवा समाजातले इतर किती लोक आस्तिक किंवा नास्तिक आहेत याचा अर्थाअर्थी संबंध (डायरेक्ट रिलेशनशिप) असत नाही.बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही.हे तुमच्या प्रतिसादातून उद्धृत केलेले वाक्य आहे, त्यासंबंधीचा प्रतिसाद त्या वाक्याला अनुसरून आहे... ते वाक्य लिहिताना मी माझ्या प्रतिसादात उल्लेखिलेले दुवे पाहिले असतेत तर पाश्चिमात्य देशातल्या भारतिय अंधश्रद्धाळूना लाज वाटेल इतक्या तद्दन उघड इतकेच नव्हे तर कायदेशीररित्या शाळांत शिकवल्या जाण्यार्या अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष झाले नसते ?! त्याकरिताच मला अजून स्पष्टपणे त्यातील काही दुवे देऊन त्या अंधश्रद्धा अमेरिकेत (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून) आजही किती खोलवर रुजलेल्या आहेत हे सांगावे लागले. आजही, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत गर्भपात हा महत्वाचा मुद्दा असतो आणि उमेदवारांना त्यांचे मत (प्रो-लाईफ / अंटी-लाईफ) स्पष्ट करावे लागते... आणि याचे मुख्य कारण शास्त्रिय नाही, तर बायबल गर्भपाताला निषिद्ध समजते हे आहे... हा प्रश्न भारतिय निवडणूकीत कधी चर्चिला गेलेला आठवतो काय ?! यासंबंधात, आयर्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी, वैद्यकीय कारणासाठीही गर्भपाताला परवानगी न दिल्याने एका भारतिय वंशाच्या महिलेचा झालेला मृत्यु माध्यमांत बराच चर्चिला गेला होता, हे आठवत असेलच... ती केस पाण्यातल्या हिमनगाचे केवळ टोक होते, हे सांगायला नकोच. उडत्या तबकड्या केवळ पाश्चिमात्य देशांतच दिसतात, तेथिल लोकांना परग्रहवासी पळवून नेतात आणि त्यातले काही परत येऊन त्यांच्या कहाण्या सांगतात. असे कोणी जर भारतात म्हटले तर त्याची कशात गणना होईल हे सांगायला नकोच. ही मोजकीच उदाहरणे, "बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही." हे किती अंधश्रद्ध विधान आहे हे सिद्ध करत नाही काय ?! :)