अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पर भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो.... केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार.