मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो.
मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन..