Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 09:40 नवीन
लेख एकसुरी वाटला जे काही होत आहे त्यावरचे विवेचन नसून फक्त आप पक्ष फुटतोय असा आसुरी आनंद दिसतोय.
ज्याची त्याची दृष्टी. जे काही होत आहे त्यावरचे विवेचन तुम्हाला कुठेच दिसले नाही? असुरी आनंद तर नक्कीच आहे आणि ते मी स्वतः मान्यही केले आहे. असो. आणि हो १० फेब्रुवारीला मोदीविरोधकांना कसा असुरी आनंद होत होता ते तुम्हाला दिसले नव्हते का प्रतापराव? जर का तुम्ही (व्यक्तिशः तुम्ही नाही तर मोदीविरोधक---काँग्रेससमर्थक, आआपसमर्थक इत्यादी) मोदी कधी चूक करतात यावर टपून बसलेले असाल आणि जरा काही खुट्ट वाजले तर त्याचा सोशल मिडियावर गदारोळ करत असाल तर केजरीवालांच्या विरोधकांनी सोज्वळ वागणूक द्यायचे काही कारण नाही. काही महिन्यांपूर्वी मिडियामध्ये काही बातम्या मोदी सरकारविरूध्द मुद्दामून प्लॅन्ट केल्या होत्या असा माझा दावा आहे. त्यातील एक बातमी म्हणजे यापुढे कुमारी मातांना त्यांच्या मुला/मुलीचा पासपोर्ट बनविण्याच्या फॉर्ममध्ये त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही ही माहिती द्यावी लागणार. कुणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना सुचली कोणाला माहित. पण लगोलग त्यावर "हेच का अच्छे दिन" म्हणून लागोपाठ ८-१० पोस्ट मी फेसबुकवर पाहिले होते.पण नंतर परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीचे खंडन केले त्यानंतर मात्र त्या ८-१० पैकी एकानेही त्यावर अवाक्षर उच्चारले नाही.असो. तेव्हा जर का तुम्ही मोदी कधी चूक करतात त्यावर टपून बसलेले असाल तर केजरीवालांचे विरोधकही ते कधी आणि कोणती चूक करतात यावर टपून बसणारच आणि त्याविषयी तक्रार केल्यास फारसा उपयोग होणार नाही. व्यक्तिशः मी अण्णा-केजरीवाल-आम आदमी पक्ष यांचा अगदी पहिल्या दिवसापासून विरोधक राहिलो आहे.अनेकांनी पहिल्यांदा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण नंतर आआप भाजपची मते खाणार हे लक्षात आल्यावर ते विरोधक झाले.तसेच पहिल्यांदा विरोध करणारे अनेक जण नंतर अण्णा मोदी सरकारविरूध्द उभे राहत आहेत म्हणून ते आता अण्णांना समर्थन देत आहेत त्यापैकी कुठलीच गोष्ट मी केलेली नाही.अशा स्वरूपाच्या moronism ला माझा विरोधच होता आणि राहिल. आणि आम आदमी पक्षाला समर्थन सोडाच त्या पक्षाविषयी कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीने विचार केला पाहिजे असे कुठलेही बंधन माझ्यावर नाही आणि तशी गरजही मला वाटत नाही.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 11:11 नवीन
ही सरकार नवीन आहेत त्यांना वेळ मिळायला हवा. मोदींविरोधात काहीही खुट्ट झाले तर लिहितात म्हणून केज्रीवालान्विरुद्ध्ही तसेच लिहिणे. तुमच्यात नि फेसबुक वरच्या पोस्टी लिहिणार्यांमध्ये फरक काय? ह्या आधीही तुमचे लेख वाचलेत चांगले वाटले परंतु हा मात्र अगदी टाकावू लेख वाटला. दिल्लीतले काही मित्र भेटलेत केजरीवाल सरकारवर तेथील जनता खुश आहे असे त्यांचे म्हणणे ह्याउलट मी लोकसभेत मोदींना मत दिले होते पण त्यांचा एकूण कारभार हा अगदी निष्प्रभ वाटत आहे ..
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 11:28 नवीन
ह्या आधीही तुमचे लेख वाचलेत चांगले वाटले परंतु हा मात्र अगदी टाकावू लेख वाटला.
काहींना लेख आवडणार काहींना टाकावू वाटणार. चालायचेच. लोकशाही आहे.
दिल्लीतले काही मित्र भेटलेत केजरीवाल सरकारवर तेथील जनता खुश आहे असे त्यांचे म्हणणे ह्याउलट मी लोकसभेत मोदींना मत दिले होते पण त्यांचा एकूण कारभार हा अगदी निष्प्रभ वाटत आहे ..
चालायचंच. लोकशाही आहे.
तुमच्यात नि फेसबुक वरच्या पोस्टी लिहिणार्यांमध्ये फरक काय?
अहो मी स्वतः फेसबुकवरही लिहितो-- मिपावर लिहितो त्यापेक्षा बरेच जास्त :) काहींना माझी मते आवडतात तर काहींना आवडत नाहीत. चालायचेच. लोकशाही आहे. पण एक फरक नक्की सांगतो की आआप समर्थक जसे करतात तसे--- प्रश्न विचारल्यास लगेच अंबानी-अडानी समर्थक, भाजपच्या पेरोलवरचा अशा बकवास गोष्टींना मी तरी नक्कीच थारा देत नाही. असो.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ब
बोका-ए-आझम Mon, 04/06/2015 - 16:31 नवीन
हो का? मग मोदींचे समर्थक जेव्हा असंच म्हणतात तेव्हा आपटार्डस् त्याला विरोध का करतात? जर दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशाच्या बाबतीत हे विधान केलेलं आहे तर मोदींकडे तर देशाची जबाबदारी आहे. त्यांना ' अच्छे दिन कहां है ' असा प्रश्न विचारण्यात आपटार्डस् पुढे होते. म्हणजे विरोधक म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारता ते तुम्हाला सत्ताधारी म्हणून विचारलेले चालत नाहीत? याला दुटप्पीपणा अाणि ढोंगीपणा हेच नाव आहे, बाकी काही नाही.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/06/2015 - 17:24 नवीन
ही सरकार नवीन आहेत त्यांना वेळ मिळायला हवा. उत्तम ! १००% सहमत. पण याचा अर्थ असा नाही की नविन आहेत म्हणून लोकशाही संकेत आणि निवडणूकीत दिलेली वचने धाब्यावर बसवायची परवानगी आहे... किंबहुना पहिल्या पासूनच सर्व सरकारांना चांगल्या सवयी लागणे जरूर असते. त्यासाठी सरकारलाला मत दिलेल्या आणि न दिलेल्या अश्या सर्वच जनतेने सजग राहून (केवळ आपला राजकिय मुद्दा जिंकण्यासाठी केलेल्या कांगावाखोरपणे नव्हे, तर) सत्य आणि प्रामाणिकपणाने सरकारवर आणि विरोधी पक्षावर सकारात्मक टीका करून त्याला योग्य दिशेवर ठेवणे जरूरीचे असते... याला सहभागी लोकशाही (पार्टीसिपेटरी डेमॉक्रसी) म्हणतात. हा लोकशाहीचा सर्वात चांगला पर्याय आहे. लोकांनी ४-५ वर्षांतून एकदा मतदान करणे आणि नंतर आपण मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची बाजू आंधळेपणे उचलत राहणे अशी राजकीय अंधश्रद्धा आपल्याकडे बोकाळली आहे आणि तो अत्यंत घातक प्रकार आहे. चूक मग ती मतदाराची स्वत:ची असो (उदा, चूकीच्या नेत्याला/पक्षाला मत दिले, इ) अथवा नेत्याची/पक्षाची असो (उदा, लोकांची केलेली दिशाभूल, चुकीचे निर्णय, इ); तिला चूकच म्हणण्याचे आणि त्यानंतर आपल्यात आणि नेत्यात/पक्षात योग्य तो बदल करवून घेण्याचे धैर्य जनतेने दाखविल्याशिवाय उत्तम लोकशाही हे केवळ एक दिवास्वप्नच राहील. मोदींविरोधात काहीही खुट्ट झाले तर लिहितात म्हणून केज्रीवालान्विरुद्ध्ही तसेच लिहिणे. हे म्हणणे आपसमर्थनाची सीमा ओलांडून आपभक्तांच्या टोळीत सामील झाल्याचे स्पष्ट लक्षण आहे असे वाटत नाही का ?! :) याचा अर्थ, "आमच्या विरोधकावर जरूर टीका करा पण आमच्या नेत्याच्या दिशेकडे बोटही उचलू नका." असा होत नाही काय ?! असे करण्याऐवजी, वर म्हटल्याप्रमाणे, मोदी व केजरीवाल या दोघांवरही (आणि इतर सर्वच नेत्या/पक्षांवर) प्रामाणिक आणि सकारात्मक टीका करून त्यांना योग्य मार्ग सोडणे कठीण करणे, हेच लोकशाहीतील डोळस आणि सजग नागरिकाचे लक्षण आहे.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 11:21 नवीन
केजरीवाल ह्यांच्या बद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे ते जो काही भला बुरा कारभार करत असतील तो स्वताच्या डोक्याने करतात त्यांना नागपूरहून मदत घ्यावी लागत नाही
स
संदीप डांगे Mon, 04/06/2015 - 12:46 नवीन
अरे वा. कुणाला कुठून कशासाठी काय मदत घ्यावी लागते याबद्दल तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे असे दिसते. अभिनंदन!
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 05/13/2016 - 08:48 नवीन
तद्दन टाकाऊ प्रतिक्रिया!!
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ब
बोका-ए-आझम Mon, 04/06/2015 - 12:29 नवीन
क्लिंटन, दिल्लीत हे असेच होणार असं माझंही मत होतं. ज्या पक्षाला राज्यकारभार करायचा सुतराम अनुभव नाही त्यांच्या हातात राज्य दिलं म्हणजे असाच पोरखेळ चालू होणार ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या-आमच्या पिढीला १९७७ च्या जनता सरकारचा अनुभव नव्हता. पण तो थोडाफार असाच असणार याची कल्पना आली.
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 12:47 नवीन
मला वाटते की अनुभव नसण्यापेक्षा परिपक्वता नाही हे या सावळ्यागोंधळामागचे कारण आहे. कुठल्याही नव्या पक्षाला राज्यकारभाराचा अनुभव नसणार हे अपेक्षितच आहे.पण अनुभव नसला तरी परिपक्वता असेल तर 'नया है वह' म्हणून चालून जाऊ शकते.पण ती परिपक्वताच नसेल तर मात्र नक्कीच गोंधळ होईल.
तुमच्या-आमच्या पिढीला १९७७ च्या जनता सरकारचा अनुभव नव्हता. पण तो थोडाफार असाच असणार याची कल्पना आली.
मी जे काही वाचले आहे त्यावरून जनता पक्षात भांडणे नक्कीच होती.पण इतका सावळागोंधळ नव्हता.कदाचित त्याकाळी स्टिंग ऑपरेशन आणि फोनवरील बोलणे टेप करणे हे प्रकार नव्हते म्हणूनही असेल :) पण जनता पक्षाच्या बैठकांना बाऊन्सरना पाचारण केले गेले होते असे वाटत नाही :)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 04/06/2015 - 14:39 नवीन
खरे आहे. १९७९ साली सरकार पाडणार्यात आमचे अनुभवी मराठी नेते आघाडीवर होते रे क्लिंटना: मधु लिमये. त्यांना साथ दिली ती राज नारायण व ईतर नेत्यांनी.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बोका-ए-आझम Mon, 04/06/2015 - 15:06 नवीन
हे कुणा बाऊन्सरपेक्षा कमी होते असं वाटत नाही. विशेषतः राजनारायण! पु.लं.नी ' खिल्ली ' मधल्या ' भाईसाहेबांची बखर ' या अफलातून विडंबन लेखात म्हटल्याप्रमाणे - चरणसिंग जाट आणि त्याचा राजनारायण नामे भाट यांनी फोडाफोडीचा खेळ आरंभला!
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 15:21 नवीन
राजनारायण आणि चरणसिंग हे कुणा बाऊन्सरपेक्षा कमी होते असं वाटत नाही.
हहपुवा. तरीही जनता पक्षाच्या बैठकीत त्यांनी प्रत्यक्ष मारामारी केली असेल असे वाटत नाही. पडद्याआड काही झाले असले तर कल्पना नाही :)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विकास Mon, 04/06/2015 - 16:40 नवीन
राजनारायण यांना राजकीय विदुषक असे संबोधिले जायचे... :)
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विकास Mon, 04/06/2015 - 15:14 नवीन
मी जे काही वाचले आहे त्यावरून जनता पक्षात भांडणे नक्कीच होती.पण इतका सावळागोंधळ नव्हता.कदाचित त्याकाळी स्टिंग ऑपरेशन आणि फोनवरील बोलणे टेप करणे हे प्रकार नव्हते म्हणूनही असेल :) पण जनता पक्षाच्या बैठकांना बाऊन्सरना पाचारण केले गेले होते असे वाटत नाही :) त्या त्या काळाला अनुरूप असे "अ‍ॅडव्हान्स" वागणे हे ७७ साली झाले आणि व्हि पि सिंग जेंव्हा "surprise!" असे म्हणत पंतप्रधान झाले तेंव्हा देखील झाले. ७७ च्या जनता पार्टीचा १९७९ पूर्ण विचका होण्यास अनेक कारणे होती - त्यातील प्रमुख होते ते समाजवादी विरुद्ध जनसंघवादी (तेंव्हा हिंदूत्ववादी म्हणण्याची पद्धत नव्हती! ;) ). पण त्याच बरोबर अजूनही अनेक कारणे होती. एक म्हणजे राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलिटीकल विच हंटींग. त्याला संघाचा (आणि म्हणून जनसंघाचा) "forget and forgive" तत्वानुसार विरोध होता. कारण इतकेच की जनतेने निवडून दिले आहे ते राज्यशकट चालवायला त्याकडे लक्ष देणे महत्वाचे हा मुद्दा. जनता पार्टीच्या काळात स्वस्ताई पण वाढली.(जे आआपच्या दिल्लीत होण्याची शक्यता आहे). "काँग्रेसच्या राज्यातले दिवाळे, आणि जनता पार्टीच्या राज्यातली दिवाळी" म्हणून तुलना वाचल्याचे पुसटसे पण नक्की आठवते. पण ते जमवून आणले गेले ते समाजवादी पद्धतीने (सर्वच जबाबदार असतील त्याला). परीणामी नंतर आर्थिक संतुलन बिघडू लागले. त्याहून अजून एक समान धागा म्हणजे (एका वाक्यात): जनता पार्टीतल्या बहुतेकांना विरोधक म्हणूनच जगायची सवय होती. परीणामी राज्य कसे चालवायचे हे समजले नाही. असो.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 15:26 नवीन
त्या त्या काळाला अनुरूप असे "अ‍ॅडव्हान्स" वागणे हे ७७ साली झाले आणि व्हि पि सिंग जेंव्हा "surprise!" असे म्हणत पंतप्रधान झाले तेंव्हा देखील झाले.
हो त्या काळाच्या मानाने बरेच अ‍ॅडव्हान्सड वागणे जनता पार्टीचे होते.१९७७-१९८९- केजरीवाल अशी प्रगती होत असेल तर भविष्यात पक्षांतर्गत भांडणांतर्गत नक्की काय बघायला लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही :) .
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 15:28 नवीन
एखाद्या पक्षात भांडणे चालू असतील तर जनतेचे नुकसान कसे काय होते? तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो . जर तो पक्ष सत्ताधारी असेल नि आमदार मंत्री ह्यांच्यात वाद होवून सरकारला धोका निर्माण झाला तर तेथे जनतेचा संबंध येतो . मी मागेच एका प्रतिसादात लिहिलेय आप वाले जर एकमेकांच्या उरावर बसले तरी जनतेला त्याचे घेणे देणे नसावे हा मात्र जर मोदी सरकारसारखे शेतकरी नि सर्वसामान्यांच्या उरावर ते बसू लागले तर मात्र जनतेचा संबंध पोहोचतो. जर पक्षात भांडणे असतील तर जनतेचे नुकसान होत असेल तर अडवाणी सारख्या नेत्याला मिटींगला बोलावून बोलू दिले जात नाही तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जातो हा त्या पक्षाचा अंतर्गत वाद आहे कि ह्यानेही देशातील जनतेचे नुकसान होते.
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 15:37 नवीन
पक्षांतर्गत वाद असायचेच त्यात नवल काय अडवाणी ज्यांनी रथयात्रा काढून देशातील वातावरण तापवून २ चे १९० खासदार केले. अख्खी हयात पक्षासाठी वेचली त्यांच्याही घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केलीच ना... राजकारण म्हंटले कि महत्वाकांक्षा येतेच एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतोच. आता आप बाबत म्हणायचे तर केजरीवाल हेच त्याचे सर्वेसर्वा राहणार ह्यात तथ्य्य आहे लोकांनी केजरीवाल कडे बघून मत दिलीत योया नि भूषण कडे पाहून नाही . आणि केजरीवाल ज्याने दिल्लीमध्ये मोदी सारख्या राजकारण्याला उचलून आदळले तो य़ोय़ा नि भूषणला ऐकणार आहे. केजरीवाल प्रामाणिक , स्वच्छ चारित्र्याचा नि भ्रष्टाचारमुक्त आहे कि नाही ते ठावूक नाही पण एक भारतीय राजकारणातील एक धुरंदर राजकारणी आहे हे मात्र खरे..
व
विकास Mon, 04/06/2015 - 15:55 नवीन
केजरीवाल प्रामाणिक , स्वच्छ चारित्र्याचा नि भ्रष्टाचारमुक्त आहे कि नाही ते ठावूक नाही... आय (अँड मेनी आप अपोनंट्स विल) रेस्ट माय केस. ;) पण एक भारतीय राजकारणातील एक धुरंदर राजकारणी आहे हे मात्र खरे.. धुरंदर असले तर हरकत नाही. महत्वाकांक्षा असण्यात पण काहीच गैर नाही. इतर अनेक सोशॅलीस्ट भुक्कड राजकारण्यांपेक्षा त्यांनी किमान प्रयत्न केले आहेत. पण ते कावेबाज आहेत असे मत आहे. स्वत: निर्मल आहोत वगैरे जे काही इमेज तयार केली, ज्या कर्कश्श आवाजात (त्या बाबतीत त्यांना किरण बेदींनी हरवले असेल कदाचीत पण...) जनतेला अवाच्या सवा सांगितले ते सगळे ढोंग आहे असेच वाटते. अजूनही निवडणूक खर्च दिलेला नाही. आता शीला दिक्षितांच्या संदर्भात बोलत देखील नाहीत. स्टींग अ‍ॅप तयार करून सरकारी सर्वर वर जनतेने काढलेल्या चित्रफिती ठेवणार सगळाच भंपक कारभार आहे. तरीदेखील त्यांना दोन वर्षे कामाच्या बाबतीत द्यावीत असे माझे मत आहे. याचा अर्थ बाकीच्या नौ़टंकीबद्दल बोलायचे नाही असा नाही! विशेष करून जेंव्हा आपणच तेव्हढे आदर्श असा आविर्भाव असतो तेंव्हा तर ते आदर्शाचे कातडे बाजूला करणे महत्वाचेच असते. असो.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ब
बोका-ए-आझम Mon, 04/06/2015 - 16:39 नवीन
बरोबर. याचाच अर्थ आम आदमी हा एक मुखवटा आहे आणि मेट्रोने शपथविधीला जाणं हा स्टंट आहे. चांगलं झालं की केजरीवालांचे समर्थकच हे मान्य करत आहेत की त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे Politics with Difference हा आम आदमी पक्षाचा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि समर्थकांनीच ते मान्य केलेलं आहे. फक्त आता ते कितीि आण कुठपर्यंत स्वत:ला फसवणार आहेत तो प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
च
चिंतामणी Wed, 12/23/2015 - 13:05 नवीन
याचाच अर्थ आम आदमी हा एक मुखवटा आहे आणि मेट्रोने शपथविधीला जाणं हा स्टंट आहे. चांगलं झालं आता पुढची पायरी गाठली आहे. एकतरी केजरीगुलाम आमदारांच्या पगार/ भत्तावाढीबद्दल बोलला का? असो. केजरीवाल हा अत्यंत पाताळयंत्री आणि आत्मकेंद्रीत व्यक्ती आहे. पगारवाढ ही फक्त आमदारांसाठी नसुन सर्व राजकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरविण्यासाठी होती. केजरीवालच्या दुर्दैवाने यात यश अजुनतरी आलेले नाही.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गणेशा Mon, 04/06/2015 - 15:50 नवीन
ओह, बर्याच दिवसानी आलो.. आज धागा पाहिला. नेहमी प्रमाणे मुद्देसुद लिहिले आहे. आपच्या पुन्हा बर्याच गोष्टी चुकल्यासारख्या वाटत आहे. तरीही पुन्हा स्वच्छ काम करुन भरारी घ्यावी ही इच्छा. (बाकी इअतर रिप्लाय वाचले नाही, वेळ नसल्याने)
प
प्रतापराव Mon, 04/06/2015 - 18:34 नवीन
चला केजरीवाल ह्यांच्या बाजूने बोलल्याने आम्हीही झालो त्यांचे समर्थक. अहो केजरीवाल दिल्लीत आम्ही महाराष्ट्रात काय संबंध आमी तर मोदीचे मतदार तेही पास्तावलेले. केजरीवाल नि आप जरी मुखवटा आहेत स्टंट करतात असे मानले तरी मोदीही कुठे धड आहेत भ्रष्टाचार होवून देणार नाही म्हणतात नि पक्षाचा उपाध्यक्ष येडीयुरप्पा. मोदीही एक मुखवटाच आहे नि स्टंट करण्यात केजरीवाल ह्यांनाही भारी आहेत तरीही त्यांना लोक मानतातच न पण एक आहे केजरीवाल ह्यांनी निदान दिल्लीच्या जनतेचा भ्रमनिरास तरी केलेले नाही जसा मोदिनी देशाचा केलाय
च
चिनार Tue, 04/07/2015 - 05:32 नवीन
मोदीन्नी भ्रमनिरास केला म्हणजे नक्की काय केलं हे सांगू शकाल का ? मुद्देसूद चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे ! माझ्या मते मोदी सरकार ने बऱ्याच क्षेत्रांमध्ये सकारात्मक पावले उचलली आहे. उदा. विदेश नीती , अर्थव्यवस्था, सरंक्षण, पर्यटन आणि पर्यावरण. पण सुधारणा घडण्यास वेळ नक्कीच लागेल. पण मोदी सरकारच्या काही बेताल खासदारांच्या आणि मंत्र्यांच्या वक्तव्यांचा, वर्तणुकीचा मी सुद्धा जाहीर निषेध करतो
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रदीप Tue, 04/07/2015 - 13:11 नवीन
त्या हरामखोर क्लिंटनने हा धागा सुरू केल्यापासून वाटच बघत होतो, ह्या आपबीतीतून सुटका कशी करून घ्यायची त्याची! काहीच सुचत नव्हते. आता तुम्ही आयतीच संधी दिली आहेत, ती आम्ही अगदी आनंदाने घेऊच... "दोन चर्चेसवर तीन दगड" वगैरे. धन्यवाद, चिनार! (आपटर्ड) प्रदीप
↩ प्रतिसाद: चिनार
क
क्लिंटन Tue, 04/07/2015 - 15:02 नवीन
हहपुवा :)
↩ प्रतिसाद: प्रदीप
आ
आनन्दा Tue, 04/07/2015 - 13:31 नवीन
बाकी मला एका प्रश्नाचे उत्तर द्या - मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून/ आधी पण सामान्यपणे मागच्या ५-७ वर्षात कोणते विवादास्पद वक्तव्य/ काम केले आहे का? राजकीय अपरिहार्यता सगळ्यांना असतात. येडियुराप्पांच्या नेमणूकीचे समर्थन नाहीच. पण जर त्यांना पद दिल्यामुळे जर १०टक्के मते मिळत असतील तर त्यांना बाहुले बनवून पदावर ठेवणे योग्य नाही पण समर्थनीय नक्कीच आहे. नाही का? केजरीवलांवर देखील माझा मुख्य आक्षेप हुकूमशाही आणि त्याहीपेक्षा अतिमहत्वाकांक्षा हा आहे. गेल्यावर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवालांनी जिंकली तेव्हा मला आनंदच झाला. आज नाही पण १० वर्षांनी तरी भारतात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा निर्माण झाली. पण पाठोपाठ जग जिंकल्याच्या आविर्भावात केजरीवल लोकसभेला उभे राहिले आणि भ्रमनिरास झाला. त्या क्षणापासून मी केजरीवालांचा विरोधक झालो. मला अश्या चुटकीसारश्या गोष्टी झालेल्या आवडत नाहीत. पी हळद आणि हो गोरी म्हणे. आणि मी मोदींना मत ते अश्या चुटकीसरशी सुधारणा करतील म्हणून दिलेच नव्हते. मला ज्या अपेक्षा आहेत त्यांवर मोदी सरकार धीम्या गतीने का होईना पावले टाकत आहे. मला फालतू साधेपणा, अतिप्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक पारदर्शकता यांचा मुळीच सोस नाही. मला अपेक्षित आहे ती इच्छा आणि मार्गक्रमणा. सध्यातरी या पातळ्यांवर मोदी काम करत आहेत. केजरीवालांकडूनही अश्याच परिपक्वपणाची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही म्हणून हे सगळे.
↩ प्रतिसाद: प्रतापराव
च
चिनार Tue, 04/07/2015 - 13:36 नवीन
१००% सह्मत !
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नाखु Wed, 04/08/2015 - 07:01 नवीन
लाख मोलाचं बोल ! पी हळद आणि हो गोरी म्हणे. हे सगळं जाहीरातीतल्या परिणामांसारखं झट्पट झालं पाहिजे यावर सगळ्या सु"शिक्षीतांचा आग्रही+आंधळा विश्वास आहे हे कंपनीत वारंवार चर्चेत अनुभवले आहे!!!
↩ प्रतिसाद: चिनार
आ
आनन्दा Wed, 04/08/2015 - 09:32 नवीन
हे सगळं जाहीरातीतल्या परिणामांसारखं झट्पट झालं पाहिजे यावर सगळ्या सु"शिक्षीतांचा आग्रही+आंधळा विश्वास आहे हे कंपनीत वारंवार चर्चेत अनुभवले आहे!!!
हे असे व्हायला आपले नेते आणि त्यांचे तथाकथित अनुयायीच कारणीभूत आहेत. अर्थात मिडियाचा रोल देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळेस व्हाट्स अ‍ॅप वरून फिरणारे मेसेजेस पाहिले असते तर ते सर्वसाधारण सुशिक्षिताला कळेल. बरे या आंधळ्या भक्तांना हे देखील कळत नाही की असे मेसेजेस फिरवून आपण आपल्या नेत्यालाच आणखीन अडचणीत आणत आहोत. असो, परत परत तेच काय बोलणार. लोकसभेच्या वेळेस मी सांगून सांगून दमलो की बाबांनो मला देखील भाजपाच यावे असे वाटते, पण माझ्या तुमच्यासारख्या अतिमहत्वाकांक्षी अपेक्षा नाहीत. मर्यादित अपेक्षा ठेवा, त्याचे योग्य मूल्यमापन करा आणि ठरवा कोण काम करतेय ते. अवाजवी अपेक्षा ठेवायच्या, त्या वर्षभरात पूर्ण होणार असे पण आपणच ठोकून द्यायचे आणि मग अडचणीत आले की "मोदी असे कुठे बोलले होते"?
↩ प्रतिसाद: नाखु
व
विकास Wed, 04/08/2015 - 15:33 नवीन
सहमत...
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विवेक्पूजा Wed, 04/08/2015 - 06:53 नवीन
+११११११११११११११ आनन्दा
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Tue, 04/07/2015 - 16:50 नवीन
भ्रष्टाचार सामान्य जनतेच्या रक्तातच आहे. त्यामुळे तो थांबावा अशी जनतेची अपेक्षा म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. डांगे साहेब एकदम चपखल बोललात क्लिंटन साहेब आपण स्वत: जरी प्रामाणिक नसलो तरी आपल्या लोकप्रतिनिधींनी मात्र प्रामाणिकच असले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते. अगदी बरोबर लोकप्रतिनिधीनी लोकांची कामे करायला पाहिजेत हे जितके सत्य आहे तितकेच त्यांनी लोकांची (LEGITIMATE) रास्त किंवा योग्य कामे करावी हे सत्य आहे . दुर्दैवाने लोकांची अपेक्षा त्यांनी बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कामे करावी अशीच आहे. (नाहीतर अशा माणसांच्या ओळखीचा उपयोग काय? हा जनतेचा विचार आहे)
क
क्लिंटन Wed, 04/08/2015 - 07:10 नवीन
नाहीतर अशा माणसांच्या ओळखीचा उपयोग काय? हा जनतेचा विचार आहे
निदान नगरसेवकाच्या पातळीवर तर नक्कीच हे बघायला मिळते. आमदार-खासदार पातळीवर याचा परिणाम किती हे बघायला हवे. तरीही सगळे नियमांनुसार जायला लागले तर भारत देश स्टॅन्डस्टीलला येईल असे वाटायला लागले आहे. कारण सगळ्यांचेच हितसंबंध नियम मोडण्यामध्ये गुंतलेले आहेत.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेपी Wed, 04/08/2015 - 07:07 नवीन
Image removed.
ज
जयनीत Wed, 04/08/2015 - 22:19 नवीन
काही मर्यादीत अपेक्षांनी मी आप चे समर्थन केले असले तरीही मी त्या पक्षाचा सदस्य कधीच नव्हतो. आजही अगदीच सगळे काही संपले असे वाटत नाही. केजरीवालांनी जे केले त्यात काहीही तथ्य नव्हते. त्यांचे आरोपही अगदीच निराधार वाटले. आपल्याला कुठलाही अडथळा नको म्हणुन त्यांनी सर्व काही घडवुन आणले असेच दिसते. आत एक अन बाहेर एक ह्या आरोपला तर काहीच आधार नव्हता. अॅडमिरल रामदास ह्यांना दूर करण्या करता सोयीचे समर्थन दिले गेले. प्रशांत भूषण ह्यांचे मुद्दे अन नाराजी योग्य वाटली. यादव ह्यांनी पक्षविरोधी काम केले ह्यातही काहीच तथ्य नव्हते. केजरीवालांनी ब-याच लोकांचा अपेक्षाभंग केला. आता त्यांनी कितीही चांगले शासन केले तरीही काही तो वेगळ्या मूळ आपला अपेक्षित राजकारणाचा पर्याय ठरणार नाही. असो. त्यामुळे कुणाला आसुरी आनंद झाल्यास हरकत नाही. त्यात  जगावेगळे काहीही नाही. ते होतेच. पण मला तरी सर्व काही संपले असे वाटत नाही. केजरीवालांनी ज्यांना पक्षातुन काढुन टाकण्या साठी सर्व काही केले ते घरी बसणार नाहीत की एकटे ही नाहीत. कितपत प्रभावी ठरतील तो पुढचा विषय. पण असा एक खुप मोठा वर्ग आहे हे दिसुन आले. हे कमी नाही. उदा. द्यायचे झाल्यास आप ने एवढा मोठा विजय मिळवल्यावरही त्यांचे वर्तन पटले नाही म्हणुन त्यांना काढले नसतांनाही उघड पणे विरोध करत आहेत किंवा पक्ष सोडत आहेत. राहीला प्रश्न केजरीवाल ह्यांच्या गटाचा कारण आज ना उद्या आप फुटणारच. आपला इतके प्रचंड बहुमत मिळाले ते एक केजरीवाल ह्यांच्या मुळे त्यांच्या मागे 30/35 टक्के दिल्लीतील मतदार राहतीलच अन दुसरे म्हणजे यादव, प्रशांत भूषण, प्रो.आनंद कुमार ह्यांच्या प्रतीमे मुळे. तो वर्ग ही कमी नाही. अर्थात ही आकडेवारी कमीजास्त असु शकेल अचुकतेचा दावा नाही पण सदासर्वकाळ अशीच राहील असे नाही. असो. दोन गट वेगळे झालेत ( फुट पडण्याचे नुकसान ही कळुन येईल. उद्या आपआपल्या मर्यादाही कळुन येतिल. ते ही न झाल्यास जग मात्र थांबबणार नाही हे निश्चित ) पण एकाच दिशेने चालले तर बरेच काही घडुन येईल, अन असे घडण्याची काही कमी उदाहरणे नाहीत.
र
रमेश आठवले गुरुवार, 04/09/2015 - 09:10 नवीन
गेले ७००-८०० वर्षे दिल्लीत अशी परंपरा राहिली आहे की एखादा बादशाहां तख्तनशीन झाला की त्याच्या सरदारांनी अथवा मंत्र्यांनी अथवा जवळच्या नातेवाईकांनी कट करून अथवा बंड करून अथवा त्याचा खून करून सत्ता काबीज करायची आणि इतर संभाव्य प्रतिस्पर्धी यांचा काटा काढायचा . स्वातंत्र्या नंतर हीच परंपरा चालू राहिली आहे. मोरारजी देसाई यांच्या विरुद्ध बंड करून चरणसिंग काही महिन्यासाठी पंत प्रधान झाले. नन्तरच्या काळात व्ही पी सिंग यांच्या नेता निवडीस विरोध होईल असे समजल्यावर देवीलाल यांचे बुजगावणे पुढे करून त्यांना बिनविरोध नेता निवडले गेले . त्यानंतर देवीलाल यांनी मी पुरेसा शिक्षित नाही , मला इंग्लिश येत नाही असे बहाणे करून, आधी ठरल्याप्रमाणे, नेतेपदाचा फेटा व्ही पी सिंग याना बांधला . चंद्रशेखर सारखे इतर नेते पहातच राहिले पण काही करू शकले नाहि। नंतर विरोधी पक्षाची मदत घेऊन सिंग यांचे सरकार पाडून चंद्रशेखर औट घटके साठी पंत प्रधान झाले. आता काहीसे तसेच खेळ सुरु आहेत. केजरीवाल यांनी निवडणुकीच्या वेळच्या बरोबरच्या दर्ज्याच्या नेत्यांना दूर केले आहे आणि ते एकछत्री राज्य करण्यास मोकळे झाले आहेत. ह्याच्या पुढची एक संभाव्य खेळी म्हणजे केजरीवाल हे आपणहून किंवा दबावा खाली येउन, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत पाय उतारा होतील आणि दिल्लीत त्यांचे शिसोदिया वंशाचे उपमुख्यमंत्री मनीष हे तख्तनशीन होतील
क
क्लिंटन Fri, 04/10/2015 - 10:31 नवीन
आपल्या युगपुरूषांनी कालच म्हटले की त्यांचे मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे पंतप्रधान मोदींच्या मॉडेल ऑफ गव्हर्नन्सपेक्षा अधिक चांगले आहे . एक समजत नाही की हे युगपुरूष दोन महिन्यांपेक्षा कमी काळ सत्तेत आहेत (दुसर्‍या इनिंगमध्ये). त्यापैकी १०-१२ दिवस बंगलोरला निसर्गोपचार आश्रमात गेले.किमान दोन दिवस योया आणि प्रभू यांना हाकलण्याच्या लठ्ठालठ्ठीत गेले. तरीही जे काही निर्णय घेतले आहेत त्यांची अंमलबजावणी करून त्यांचे परिणाम दिसले तरच "मॉडेल ऑफ गव्हर्नन्स" हे इतर कोणापेक्षा चांगले आहे हा दावा करता येईल. त्यासाठी पाहिजे तितका वेळ उलटला आहे का? हे वक्तव्य मिपा आणि फेसबुकवरच्या 'केजरूच्या गुलामांनी' केले असते तर ते समजू शकतो. पण प्रत्यक्ष अश्वमुखातूनच हे विधान आले याचे आश्चर्य वाटत आहे.हा सत्तेचा अहंकार नाही तर काय आहे? इतरांना 'अहंकार करू नका' अशी लेक्चरबाजी करून दोन महिनेही उलटले नाहीत हो साहेब. कधी नव्हे ते राहुल गांधींबरोबर सहमत व्हावे लागत आहे-- सत्ता ही खरोखरच वाईट आणि विषसमान असते.
ह
हाडक्या Fri, 04/10/2015 - 11:13 नवीन
क्लिंटन भौ.. with all due respect, एका बाजूला तुम्ही फ्री मार्केटची भलामण करताय त्या प्राईम टाईम च्या धाग्यावर आणि मग इथे या आप अन केजरुचा वाजवीपेक्षा जास्तच तिरस्कार करताय असे नाही का वाटत ? नै म्हंजे मार्केट करेल की करेक्ट. नै तर भोगेल फळं. :) जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसर्‍या कोणाबद्दल एकाच चष्म्याने बघत आणि बोलत असते तेव्हा त्याच व्यक्तीच्या मतांबाबतच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो हो. तुमची मते बहुतेक वेळा आवडतात म्हणून सांगतोय. तुमचे विश्वासार्हतेचे क्रेडिट या आपवाल्यांवर इतके पण खर्च नका करु, they don't worth it that much. :)
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 04/10/2015 - 11:18 नवीन
तुमचे विश्वासार्हतेचे क्रेडिट या आपवाल्यांवर इतके पण खर्च नका करु, they don't worth it that much.
लोल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बाकी मी फ्री मार्केटची भलामण करतो म्हणूनच आआपचा तिरस्कार करतो :)
↩ प्रतिसाद: हाडक्या
न
नाखु Fri, 04/10/2015 - 11:57 नवीन
पण कदाचीत "आप्"ल्याच माणसांना दिवास्वप्न्+अफुधुंदीतून नुसते जागे नाही तर खडबडून उभे करण्यासाठी हा प्रमाद (?) करीत असावेत! दोघांनीही आ.ह.घेणे
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ड
डँबिस००७ Sat, 04/11/2015 - 10:16 नवीन
आपल्या युगपुरूषांनी कालच दिल्ली पोलिसांना पत्र लिहुन कुठे कुठे कॅमेरे लावावेत अस विचारलय ? निवडणुकी अगोदर मोजुन १५ लाख कॅमेरे लावणाच्या गमजा करणार्या युगपुरुषाला आता पोलिसाकडुंन सल्ला हवाय. जर कॅमेरे कुठे लावायचे हेच माहिती नव्हते मग १५ लाख कँमेरे कसे मोजले होते ? का तो एक चुनावी जुमला होता ?
न
नांदेडीअन Sat, 04/11/2015 - 10:48 नवीन
थोडी माहिती घेत चला हो टिका करण्याअगोदर.
The Aam Aadmi Party-led government has written a letter to Commissioner of Police, BS Bassi, requesting him to provide a list of dark spots around the city which could be potential places of crime against women. The Delhi Police is requested to provide a list of dark spots considered vulnerable for women so that CCTV cameras installation can be started there.
बाय द वे, दिल्लीमध्ये बर्‍याच ठिकाणी CCTV कॅमेरे लावून झाले आहेत.
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sat, 04/11/2015 - 11:41 नवीन
प्रश्न परत एकदा वाचा !! जर कॅमेरे कुठे लावायचे हेच माहिती नव्हते मग १५ लाख कँमेरे कसे मोजले होते ? जर कॅमेर्यांची संख्या १५ लाख जेंव्हा मोजली होती तेंव्हा कुठे कुठे लावायचे हे पण नक्की असायला पाहीजे. जर माहीत होत मग पोलिसांना का विचारायच ?
ड
डँबिस००७ Sat, 04/11/2015 - 11:55 नवीन
नं २. दिल्ली शहरातील काळोख्या जागा पोलिसाना विचारण्या ऐवजी मोहल्ला कमिटी कडे कस नाही विचारत ? नं ४. पोलिसांना त्वरीत संपर्क करण्यासाठीच पोलिस कंट्रोल रुम असते, त्या कंट्रोल रुमला संपर्कासाठी सा धासा लक्षात रहील असा टेलिफोन नं. असतो. उदा १००. जेंव्हा कोणीही १०० ला संपर्क करतो तेंव्हा कंट्रोल रुम वायरलेस द्वारे त्या बिट जवळ असलेल्या पोलिस व्हॅनला त्वरित कारवाई करण्याचे आदेश देत असतात. अशी व्यवस्था अगोदरच असताना परत बीट वर गस्ती करणार्या पोलिसांचे संपर्क लोकांना कश्यासाठी ? हे गस्तीवरचे पोलिस सुट्टी वर गेलेले असले तर कोणाला संपर्क करणार ? नं ५. हा प्रश्न दिल्लीतील पोलिसांना विचारण्याऐवजी केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना का नाही विचारत ?
ड
डँबिस००७ Sat, 04/11/2015 - 12:39 नवीन
The Delhi government has no intention to support the 181 helpline meant for women in distress. The Delhi government under the Aam Aadmi Party has decided against launching the mobile phone application for 181 which would have helped women to easily seek assistance in times of distress. The application would not require any Internet connection. It was first conceptualised by the previous government of Sheila Dikshit. The proposal for the application was sent to Delhi government six months back after receiving a green signal for the trial run. But, the government did not show much interest in it and refused to launch the application. Officials said the application is quite similar to the application Himmat which was launched by Delhi Police. "A high-level meeting was held last week where it was decided that the application will not be launched. The government is taking no initiative regarding this helpline. This mobile application was designed with an aim to improve the accessibility to 181 helpline," an official said. Read more at: http://indiatoday.intoday.in/story/kejriwal-women-helpline-aap-government-delhi/1/428774.html
क
क्लिंटन Tue, 04/28/2015 - 10:10 नवीन
दिल्लीचे कायदामंत्री जीतेन्द्रसिंग तोमर यांची पदवी बनावट आहे असे भागलपूरमधील विद्यापीठाने म्हटले आहे. याच विद्यापीठातून आपण पदवी घेतली असा त्यांचा दावा होता. उत्तम. चालू द्या.
व
विकास Tue, 04/28/2015 - 15:30 नवीन
त्यांची आम आदमी साठी काम करण्याची तळमळ पहा ना! लोकशिक्षण हे विद्यापिठातल्या ३-४ वर्षाच्या शिक्षणापेक्षा कधिही महान असते... आणि आता तरी देखील केजरीवालांनी तोमर ना खुलासा करण्यास सांगितला आहे. (चला, आधी नेपाळ मग तोमर... त्यात कोण गजेंद्र? कोण त्याला फोन करणारा सिसोदीया आणि कोण तो नक्राश्रू वाला आशुतोष? सगळेच विसरायला झाले आहे. :( )
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
होबासराव Tue, 04/28/2015 - 10:27 नवीन
आआप वाले निलाजरे, नौटंकी आणि अतिकांगावखोर खोटारडे आहेत हे तर त्यानि सिध्द केलच आहे. ४२० सुध्दा आहेत हे आता समोर येत आहे. पिच्चर अभी बाकि है मेरे दोस्त. #पाच साल केजरीवाल
ह
होबासराव Tue, 04/28/2015 - 21:50 नवीन
निवडणुक आयोगाला दिलेल्या affidavits नुसार ह्या भामटयाचे शिक्षण... Educational Details Graduate Professional L.L.B. From Tilkamanjhi Bhagalpur University In 1999 बार कौन्सिल ला सुध्दा हे खोटे दस्तएवज वापरुन रजिस्ट्रेशन केलय... हा तर सराईत भामटा / ठग दिसतोय. जय हो. #पाच साल केजरीवाल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा