Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
र
राही Fri, 12/11/2015 - 05:32 नवीन
फोटो छानच आहेत. पण त्यातल्या एकाची कॅप्शन पहा : "My nephew and niece enjoy the sunset with their grandfather in Siridona, Goa, earlier this month. Theirs will be the last generation able to partake in these pleasures before Goa is fully concretized and overrun by Indians."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुनील Fri, 12/11/2015 - 06:33 नवीन
before Goa is fully concretized and overrun by Indians
आणि हा ब्लॉग कुणा किरिस्तावाचादेखिल नाही!! बादवे, थोडे सरसकटीकरण वाटेल पण गोव्यातील किरिस्ताव आणि उच्चवर्णिय हिंदू हे एकाच पद्धतीने विचार करतात हे वेळोवेळी दिसले आहे. विलीनीकरणाचे सार्वमत असो की राजभाषा आंदोलन, बहुजन हिंदू एका बाजूला आणि किरिस्ताव (बहुजन + उच्चवर्णिय) अधिक उच्चवर्णिय हिंदू दुसर्‍या बाजूला, हेच चित्र दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 12/11/2015 - 07:47 नवीन
गेल्या आठ-दहा वर्षांपासून जाणवतंय की उच्चवर्णीय हिंदू थोडेसे कडवे आणि बहुजनांप्रति थोडेसे अनुदार होत आहेत. अर्थात इथेही सरसकटीकरण करायचे नाही. पण महाराष्ट्रातल्या एका कट्टर संघटनेने गोव्यात चांगलेच हातपाय पसरले आहेत. बहुजन हिंदू अलग पडून त्यांचे पोलराय्ज़ेशन होणे एकंदर समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने फायद्याचे नाही. शिवाय याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातीलच पण विरुद्ध बाजूची तशीच कडवी संघटना गोव्यात मूळ धरू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पिशी अबोली Fri, 12/11/2015 - 06:58 नवीन
या मानसिकतेबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण तरीही सरसकटीकरण होऊ नये असे वाटते. स्वातंत्र्यानंतर कितीतरी काळाने मुक्ती मिळालेल्या सगळ्याच ठिकाणी अशी मानसिकता काही प्रमाणात असावी का? महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र सीमेवर अनेक वृद्ध लोक अजून जुन्या काळातच रमलेले दिसले होते. नवीन पिढीला कम्पल्सरी भारताशी जुळवून घ्यावंच लागतं, कारण त्यांची शेती, नोकर्‍या सगळं भारतावरच अवलंबून आहे, आणि दारिद्र्यामुळे त्यांना जुळवून घेणं भाग आहे. पण तसं नसतं, आणि तिथेही (किंवा अन्य ठिकाणीही) गोव्यासारखी समृद्धी असती, तर काय घडलं असतं? १९६१ला मुक्त झालेल्या गोव्यात अचानक सगळीकडून देशभक्ती उफाळून यावी, ही अपेक्षाही चूक आहे ना..अन्य भारतासोबत एक शेअर्ड इतिहास असा फारसा नाही, त्यामुळे तेवढ्या प्रखर प्रमाणात राष्ट्राभिमान वगैरे गोष्टी ५४ वर्षांत अगदी सरसकट सगळ्यांमधे कशा काय निर्माण व्हाव्यात बरं? पोर्तुगीजप्रेमी जनता ही मागच्या पिढीत जास्त होती. आताच्या माझ्या पिढीत अशा घरांमधून आलेल्या अनेकांमधे भारताबद्दल विशेष प्रेम नाहीये, पण विशेष द्वेषही नाही. हळूहळू बदलेल हे सगळं.. 'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची मानसिकता हाही भाग या थोड्याशा नकारात्मक दृष्टिकोनामधे येतो. गोवा म्हणजे धिंगाणा या एकाच भावनेने बहुसंख्य देशी पर्यटक तिथे येतात. गोवेकरांच्या रक्तातच आतिथ्यशीलता आहे. पण सगळ्या जागा घाण करून ठेवणे, अचकट-विचकट वागणे, जिथे आहोत त्या लोकल संस्कृतीचा काहीही आदर न करणे या गोष्टी परदेशी पर्यटकांपेक्षा भारतीयांच्या नजरेत फार भरतात यावर कुणाचाच आक्षेप नसावा. (परदेशी पर्यटकांचे प्रश्न वेगळे आहेत, पण ते सामान्य माणसाच्या नजरेत भरत नाहीत). गोवेकरांकडे बघण्याचाही अन्य भारतात दृष्टिकोन थोडा विचित्र आहेच. 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी जेव्हा बदलते, तेव्हा मनात अढी बसतेच..असो. तेव्हा या मानसिकतेला सरसकट नावं ठेवण्याआधी (तुम्ही केलेलं नाही, मी जनरल बोलतेय) त्यामागच्या कारणांचाही विचार व्हावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 12/11/2015 - 07:52 नवीन
प्रतिसाद आवडला. गोवा म्हणजे अधिकृतपणे कसेही सैल वागायला मिळण्याचे ठिकाण अशीच गोव्याची प्रतिमा इतर भारतीयांच्या मनात असते आणि त्याप्रमाणेच वागून ते उर्वरित भारताची प्रतिमा मलीन करतात. या विषयी अनेक किस्से ऐकले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 08:29 नवीन
पर्यंटकांनी सिव्हीक सेन्स दाखवावा या बाबीशी सहमत आहे, दुर्दैवाने बहुतांश भारतीय स्वतःच्या घराबाहेर पडतो तेव्हा स्वतःच्या गल्लीतील सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीतही उदासीन असतो, हे निश्चीतपणे बदलावयास हवे या बद्दल वाद नाही. पण असे विश्लेषण करताना अगदी टोकासही जाण्यात पॉइंट नाही, बेशीस्तीची संधी मिळाल्या नंतर जगातील कोणताही मानवप्राणी बेशीस्त होऊ शकतो, एरवी टापटीप असलेला आमेरीकन माणूस ४ जुलैला अगदी स्वातंत्र्य दिवसाच्या रात्री सार्वजनिक स्वच्छतेची शिस्त गुंडाळून ठेवतो. १) तरुणांसाठी अ‍ॅडव्हेंचर टुरीझमचा अद्यापही भारतात पुरेसा विकास न झाल्यामुळे २) स्वतःच्याच शहरात/गावात मोकळे होण्याची संधी कमी असल्यामुळे असेल भारतीय तरुण पर्यटक बाहेरच्या ठिकाणी जाण्याची संधी गोंधळ करण्यासाठी मोकळेपणाची संधी म्हणून पहातो. त्यांना अ‍ॅडव्हेंचर टुरीझमचे अधिक पर्याय उपलब्ध आणि पर्यटनाचे अधिक ऑप्शन उपलब्ध होऊन गर्दी विखुरली गेल्यास हा पर्यटकवर्गाचा गोंधळ कदाचित कमी जाणवेल. पण इथेही भारतीय आणि परदेशी असा खूपसा फरक करण्यात पॉइंट नाही. पर्यटनास बाहेर पडलेली मंडळी भारतीय गोव्यातली असोत अथवा परदेशी स्वतःच्या घरापासून माणूस बाहेर पडतोच ते स्वातंत्र्य मनमोकळेपणाने उपभोगण्यासाठी अर्थात यात सिव्हीक सेन्स हरवावयास नको परकीय पर्यटक ड्रग्समध्ये गुंग होऊन पडला आवाजाचा गोंधळ नाही केला तरीही स्थानिक जनतेस आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तेवढेच तयार होतात. पर्यटक पुरुष व्हर्सेस पर्यटन स्थलीय-स्थानिक स्त्री यातही पर्यटक पुरुषांनी सिव्हीक सेन्स बाळगावयास हवा, आपण जेव्हा आमेरीकन पुरुष पर्यटंकांचे थायलंडमधील उदाहरणे बघतो, किंवा इंग्लंडचा राजपुत्र लासवेगास मध्ये जाऊन जे काही करतो ते पाहता या विषयात भारतीय पुरुष व्हर्सेस परकीय पुरुष हे लॉजीक सुसंगत ठरणारे नसावे. हा प्रतिसाद संपवताना एक मह्त्वाच 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी बदलते वगैरे हा कदाचित तुमचा व्यक्तीगत अनुभव नाहीना आपणही या विषयी सरसकटीकरण करत नाही आहात ना ? कारण मी जेवढ्याकाही भारतीय मुलांना ओळखतो त्यांच्यात मुलगी म्हटलेकी खोडसाळपणा होत असेल पण गोव्याची आहे म्हणून खोडसाळपणा होतो हे सरसकटीकरण अनुभवास न आलेले आणि पटणारे नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Fri, 12/11/2015 - 09:00 नवीन
'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी बदलते वगैरे हा कदाचित तुमचा व्यक्तीगत अनुभव नाहीना आपणही या विषयी सरसकटीकरण करत नाही आहात ना ?
सरसकटीकरण नाही, 'असंही होतं कधी कधी' हे म्हणायचं होतं. इन्फॅक्ट मी 'मुलाची' म्हटलं ते चुकलंच. गोव्याची म्हटलं की कुणाचाही दृष्टिकोन थोडासा बदलतो. मला माझा अनुभव हायलाईट करायचा नाहीये. किंवा काय योग्य/ काय अयोग्य त्याची चर्चाही नाही. एका सामान्य गोवेकराचा या गोष्टीबद्दलचा विचार कसा असेल, ते मांडायचा प्रयत्न केला एवढंच. गोवेकर अगदी कट्टर देशप्रेमी का नसू शकतात ते दाखवायचं होतं फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 09:20 नवीन
गोव्याच्या मुलांना स्त्रीयांचे आकर्षण वाटत नाही ? शुकाचार्यांचे जीन्स आपोआप नैसर्गिकपणे येतात काय त्यांच्यात ? गोव्यातल्या मुलांनी केलेल्या अशीष्ट वर्तनांची माहिती अधिकारातून माहिती घ्या किती स्त्रीयांशी ते वाईट वागले आहेत ? एक व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते कारण त्यांचे विचार अथवा वर्तन त्यांच्यापुरते चुकीचे आहे. त्यावरून सरसकट भारतीय पुरुषचुकीचे वागतात हा निष्कर्ष बेजबादारपणाचा आहे. बहुतांश भारतीय परस्त्रीकडे आदराने बघतात, भाऊ म्हणून हाक घातलीतर त्या मुलीकडे सहसा बहुतांश भारतीय पुरुष पुन्हा वळून पण बघत नाही. वस्तुतः केवळ भैय्या म्हटले किंवा राखी बांधली की त्या नात्याचा आदर करणारी भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नाही. गोव्यातले पुरुष चुकीचे वागले म्हणून गोव्यातील स्त्रीया गोव्यावर प्रेम नाही करणार का ? तसेच आहे भारतीय पुरुष चुक वागले म्हणून भारतीय स्त्रीयांनी भारतावरच्या देशप्रेमाशी तडजोड करणे मुर्खपणाचे आणि बेजबाबदार नाही का ? देशप्रेमही कोणत्याही अटीं शिवाय करावयाची गोष्ट आहे देशप्रेमात सौम्य असे काही नसावे ते कट्टरच असले पाहीजे, माझ्याशी माझे आईवडील बायको मिपाकर चांगले वागले नाही हे माझे देशावरील प्रेम न करण्याचे कारण असू शकत नाही असा विचार तर्कसुसंगत असू शकत नाही. माझ्यावर हजार अन्याय झालेतरीही माझे देशप्रेम तसुभरही कमी होणार नाही हिच भूमिका सुयोग्य ठरते; नाहीतर माझे ज्या देशावर प्रेम नाही त्या देशातील लोकांवर मीही अन्याय करण्यास मोकळा होतो असे प्रत्येकाने विचार केला तर अशी भूमिका भिती दायक आणि असुरक्षीतता वाढवणारी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Fri, 12/11/2015 - 09:35 नवीन
माहितगारजी, तुम्हाला आज मला बेजबाबदार असं ठरवायचंच आहे का? :) अहो, मी किती स्पष्टपणे लिहिलंय की 'मुलांचा' म्हटलं हे माझं चुकलं म्हणून.. आणि हे सरसकटीकरण नाही असंही? तुम्हाला मला बेजबाबदारच ठरवायचं असेल तर ठरवा. बहुतेक मला मराठी नीटशी येत नसावी म्हणून माझ्या वाक्यांचे अनर्थ होत आहेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 09:45 नवीन
भाषेचाच प्रश्न असेल तर, तुम्हाला माझे मत पोहोचावे म्हणून उर्वरीत चर्चा मी पैसाताईंंना विनंती करून त्यांच्यावर सोडतो आहे. मला तुमचे लेखन आक्षेपार्ह वाटले तरीही मनात राहण्या पेक्षा मांडलेत हे बरे त्यामुळे एकमेकांचे गैरसमज दूर करण्याची संधी मिळते म्हणून धन्यवाद आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पैसा Fri, 12/11/2015 - 10:37 नवीन
थोडा गैरसमजाचा प्रकार दिसतो आहे. माहितगार यांचा मुद्दाही लक्षात आला आहे आणि पिशी म्हणते आहे तेही समजते आहे. तिने काही प्रश्न विचारले आहेत. "असे असू शकेल का?" अशा स्वरूपाचे. ती सगळी तिची विधाने नाहीत. त्यात आलेला "इंडियन्स" शब्द ती राजन पर्रीकरांच्या ब्लॉगवर उच्चालेला त्याचा संदर्भ घेऊन लिहिते आहे. सर्व गोंयकरांना त्यांचा उर्वरित भारताबरोबर शेअर्ड इतिहास आहे याची आठवण, कल्पना असतेच असे नाही. याची काही कारणे आहेत. १) मी लिहिले तसा मराठे आणि त्यापूर्वीचा इतिहास पोर्तुगीजांनी सिस्टिमॅटिकली पुसला आहे. आम्हाला "आमचें गोंय" हे सगळे एकत्रित करताना सरदेसाई, सातोसकर, बाळशास्त्री हरदास इ. इतिहासकारांची अनेक पुस्तके खणून काढावी लागली. काही कथा तर केवळ मौखिक परंपरेत चालत आलेल्या आणि मूठभर लोकांच्या स्मरणात असलेल्या ऐकायला मिळतात. यादव आणि कदंबांचा इतिहास गोव्याला अक्षरशः मुळातून शोधून काढून पुनर्प्रस्थापित करावा लागला आहे. तर शिवाजी महाराजांचा मर्दनगड, ज्याच्यासाठी वार्षिक एक युद्ध लढले गेले, फोंड्यात नेमका कुठे आहे/होता याचं उत्तर मिळायला मला गोव्यात फोंड्यात १५ वर्षे जावी लागली. २) आताच्या पिढीतल्या मुलांना संपूर्ण भारताचा इतिहास शिकायला मिळतो. मात्र त्यांच्या कदाचित आईबापांनाही फार मर्यादित स्वरूपाचे शिक्षण मिळाले असावे. ३) उर्वरित भारतासोबत असलेली गोव्याची नाळ तोडण्यासाठी पोर्तुगीज राजवटीत पद्धतशीर प्रयत्न झाले. जुन्या पोथ्या पुस्तके अक्षरशः जाळली गेली. कृष्णदास शाम्याच्या एका पुस्तकाची ४ पाने मला आंतरजालावर बघायला मिळाली तेव्हा काय आनंद झाला होता! अशाच जेवढ्या पोथ्या पुस्तके लपवून ठेवली तेवढीच वाचली. परंतु आताही पंढरीच्या वारीला नेमाने जाणारे अनेक गोंयकार मला माहीत आहेत. ४) सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे १९६१ पर्यंत गोव्यातून उर्वरित भारतात जायचे तर व्हिसा पासपोर्टची भानगड होती. अगदी बेळगावहून आलेल्या वस्तूनासुद्धा आयात निर्यात असल्या भानगडी होत्या. आपल्याला हे चमत्कारिक वाटते. पण तेव्हाच्या आठवणी असलेले अनेक लोक अजून हयात आहेत. त्यांना हा बदल मोठा आहेच. काहीजणांनी ते सहज स्वीकारले तर काहीजण ज्यांना त्या राजवटीचे काही फायदे होते त्यांना ते स्वीकारणे जड गेले. ५)स्वतःला पोर्तुगीजांचे वंशज समजणारे काही लोक अजून गोव्यात आहेत. त्यांना पोर्तुगालमधे चालते व्हा हे बाकीचे गोंयकारच सांगत असतात! माहितगार म्हणाले तसा माणूस देशभक्त असतो किंवा नसतो. तसे दोन्ही प्रकारचे लोक सर्व भारतात बघायला मिळतात. गोवाही त्याला अपवाद नाही. तिचा एक मुद्दा मात्र मलाही सूक्ष्मरीत्या जाणवणारा आहे. गोव्यातली मुलगी म्हणजे लोक पटकन "गोवेकरीण" असे म्हणून गेलेले मी ऐकले आहेत. ज्यांना जुने रीतीरिवाज माहित आहेत त्यांना "गोवेकरीण" शब्द ऐकताच गोव्यातून मुंबईला येऊन स्थायिक झालेल्या गाणार्‍या देवदासींची आठवण सहज होते. तरुण तेजपालने गोव्यातल्या महिलांबद्दल जे उद्गार काढले होते त्यावरून बर्‍याच लोकांचे गोवा आणि तिथल्या लोकांबद्दल बरेच गैरसमज आहेत याची मनात कुठेतरी सहजच नोंद होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 10:56 नवीन
गोव्यातली मुलगी
जो पर्यंत गोव्यात हिंदूच बहुसंख्य आहेत हे माहित नव्हते त्या वयात चित्रपटांमुळे फारतर गोव्यातल्या मुली ख्रिश्चन असतात या पलिकडे डोक्यात काही नकारात्मक प्रतिमा होती असे वाटत नाही. गोवा म्हणजे धमाल एवढेच बर्‍याचजणांच्या डोक्यात असते परंतु त्यात गोव्यातील मुलींचा विचारही होत नाही. फारतर पाश्चात्य तरुणींना बघण्याचे आकर्षण असू शकेल (मी त्याचेही समर्थन करत नाही). मी महाराष्ट्रातल्या ज्या भागातून येतो तेथे गोव्याची मुलगी म्हणून कोणताही वेगळा विचार कुणाही स्त्री पुरुषांच्या मनात आलेला पाहिलेला नाही, किंवा भारतात मला जिथे फिरण्याचे सौभाग्य प्राप्त झाले तेथेही असे कधी ऐकण्यात आले नाही. उर्वरीत भारतातील काही लोक समुहामध्ये तुम्ही म्हणता तसे असेल तर नक्कीच चुकीचे आहे तसा विचार कुठे असेल तर त्याचे प्रबोधन झालेच पाहिजे - देशप्रेमाशी तडजोड करण्याचा तो एक्सक्युज असू शकणार नाही हे माझ्या एवढ्या चर्चे नंतर सर्वांनी स्विकारलेच असेल- पण असे लोकसमुह भारतात सबंध भरतात खुप असतील का या बद्दल साशंक आहे. बाकी गोवा स्वतंत्र होऊन एवढी वर्षे झाली त्यांच्या स्थानिक शाळातून तसेच टिव्हीसारख्या माध्यमातूनही पूर्ण इतिहासाची पुर्ण माहिती दिली जावयास हवी असे तुमच्या प्रतिसादावरुन वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप Fri, 12/11/2015 - 15:52 नवीन
बहुतांश भारतीय परस्त्रीकडे आदराने बघतात, भाऊ म्हणून हाक घातलीतर त्या मुलीकडे सहसा बहुतांश भारतीय पुरुष पुन्हा वळून पण बघत नाही. वस्तुतः केवळ भैय्या म्हटले किंवा राखी बांधली की त्या नात्याचा आदर करणारी भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नाही. हे वाचून डोळे पाणावले.नक्की कुठल्या ग्रहावरील भारताविषयी लिहीले आहेत तुम्ही, हे समजले तर मी आपला आजन्म उपकृत राहीन, साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/12/2015 - 06:41 नवीन
@प्रदीप साहेब, वस्तुनिष्ठता, संस्कृती, सांख्यिकी, तर्कसुसंगतता, काँटेक्स्ट यांचा अभ्यास वाढवावा. भारतात स्त्री सन्मानाच्या दृष्टीने समस्या नाहीत असे नाही, 'पिशी अबोली' यांनी जी एक समस्या मांडली तिचे स्वरुप वैश्वीक आहे ती केवळ गोवेकरांसाठी मर्यादीत नाही -या समस्येचा देशप्रेमाशी संबंध नाही, खरे देशप्रेम बाळगणार्‍या अनेक व्यक्ति अशा समस्या निराकरणात साहाय्यभूत ठरु शकतात, खरे देशप्रेमी देशवासीयांना आपले बंधू आणि भगिनीसारखा आदर करतात/करावा हि शिकवणूक याच भारत भूमीत दिली जाते, हि शिकवणूक कुठे कमी पडत असेल तर देशप्रेमाचा आग्रह धरावयास हवा की देशप्रेमास तुडवावयास हवे ?- त्या समस्येचा निषेध करणारा विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध आपल्या या प्रतिसादाच्या पाच तास आधी काढला आहे तेव्हा तेवढी समज आणि संवेदना असलेला मीही एक भारतीय महाराष्ट्रीय आणि मराठी आहे; परस्त्रीला माते समान मानणारा शिवाजी महाराजांसारखा आदर्श याच मातीत घडतो, केवळ राखी बांधल्यावरुन स्त्रीला बहिणी समान वागणूक मनावर बिंबवणारी संस्कृती याच मातीत निर्माण झाली, काळानुसार या सास्कृतीक मुल्यात कुठे कमी होत असेल तर ते मुल्य नवीन पिढीत बिंबवावयास हवे. अन्य्याय वागणूकीचा जसा निषेध केला पाहीजे तसेच चांगले वागणार्‍यांना चांगले वागण्याचे क्रेडीट दिल्याने कुठली हानी पोहोचते असे वाटत नाही. आता सांख्यिकीकडे येऊ, (हे मी आकडेवारी अभ्यासून लिहितो आहे) गोव्यातल्या स्त्रीयांना उर्वरीत भारतापेक्षा स्त्री विषयक गुन्हेगारीस कमी तोंड द्यावे लागते हे खरे पण गोव्यात जी काही स्त्री विरुद्ध गुन्हेगारी होते ती त्यांच्या परिचीत स्थानिकांकडून होते; गोव्या पेक्षा उर्वरीत भारतात स्त्रीयांवर अधिक अन्याय्य होतो हे खरे पण प्रति १,००,००० लोकसंख्येचे गुन्हेगारी प्रमाण घेऊन आकडेवारी मोजली जाते तेव्हा भारतात भारतातील आकडेवारी ०.४ प्रति एक लाख आहे (हे ०.४ सुद्धा असू नये हे खरे), पोर्तुगाल मध्ये प्रति एकलाख तेच प्रमाण ४ चे आहे म्हणजे भारताच्या सरळ सरळ दहापट अधीक, तेच आमेरीका (USA) चे प्रमाण २७.३ आहे. शैक्षणिक परिसरातील स्त्री विरुद्ध गुन्हेगारी आमेरीकेत भारतापेक्षा अधिक आहे. ज्या काही गोष्टीत भारत स्त्रीयांसाठी बरा आहे त्यात फुल न फुलाची पाकळी क्रेडीट भारतीय संस्कृतीतील काही चांगल्या परंपरांना जात असावे आणि वाईट प्रथांचे निर्मुलन करताना चांगल्या प्रथांना त्यांचे क्रेडीट देऊन जोपासणे स्त्रीयांच्या भारतातील स्थानास पोषक असेल का याचा सारासार विचार होणे गरजेचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Sat, 12/12/2015 - 08:15 नवीन
वगैरे जाऊदेत, मला ते झेपले नाही कधीच आणि ह्यापुढेही झेलेल असे वाटत नाही. भारतातील पुरुषांपुढचे आदर्श काय आहेत व काय नाहीत, ही एक बाब झाली. प्रत्यक्ष ते कसे वागतात ही दुसरी बाब. म्हणजे idealism विरूद्ध reality ह्यांतील फरक लक्षात घेणे जरूरीचे नाही का? दुसरे "वस्तुतः केवळ भैय्या म्हटले किंवा राखी बांधली की त्या नात्याचा आदर करणारी भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नाही" हे तुम्ही स्वतः कुठल्या अभ्यासाच्या आधारावरून लिहीताहात? ह्या अगोदरच्या तुमच्या एका अशाच रँबलिंग प्रतिसादात तुम्ही " बेशीस्तीची संधी मिळाल्या नंतर जगातील कोणताही मानवप्राणी बेशीस्त होऊ शकतो", असे निक्षून सांगताहात, तेव्हा आता ह्या दोन्ही विधानांसाठी तुम्ही स्वतः कायकाय अभ्यास केलात,जगातील कुठल्याकुठल्या संस्कृतिंची सखोल माहिती करून घेतलीत (आणि मग ते 'सांख्यिकी' वगैरे अजून पुढेच राहिले)? मी ड्रिव्हेल लिहीत नाही, लिहू शकत नाही. थोडक्यात इतकेच म्हणतो, मी पृथ्वी नामक ग्रहावरील भारत ह्या देशाचा नागरीक आहे, आयुष्याची बरीच वर्षे तेथे घालवल्यावर गेली काही वर्षे त्याच ग्रहावरील दुसर्‍या एका देशात मी रहातो. येथे त्याच माझ्या भारत देशांतील अनेक पुरुष येतात, त्यांचे स्त्रीयांशी वागणे कसे असते, स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने पहाणे, घोळका करून नाक्यावर उभे राहणे, आजूबाजूने एखादी स्त्री गेली की अश्लील काहीबाही बडबडणे, इत्यादी अनेक गोष्टी इथे सर्वश्रूत आहेत, अगदी माझ्या निकटच्या स्त्रीयांकडून ह्याविषयी अनेकदा ऐकले आहे, स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे. तसेच शहराच्या एका विशीष्ट विभागात, जेथे ह्यांचे विशेष संख्येने वास्तव्य आहे, तिथे रस्तोरस्ती पान खाऊन थुंकलेले असते, पानाच्या पिचकार्‍या रस्त्यांवर, भिंतीवर सर्वत्र नजरेस पडतात, हेही आता अंगवळणी पडले आहे! तुम्ही वर्णन करताहात तो आदर्श भारत नक्कीच दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर असावा. तेथील बहुतांश पुरूष स्त्रीयांशी अत्यंत आदरयुक्त वर्तन करत असावेत. तसेच आमच्या शालेय पुस्तकातील वर्णनाप्रमाणे तेथील खेडेगावांत रम्य पहाट उगवत असाव्यात. एकंदरीत अतिशय आदर्श जीवन असलेला हा भारत ज्या कुठल्या दुसर्‍या ग्रहावर आहे, तेथे जाण्याची संधी मला माझ्या ह्या जन्मी मिळण्याची शक्यता आता दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे, पुढील जन्मी तेथे जाईन म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/12/2015 - 08:38 नवीन
reality सुधारण्यासाठी idealism ऊपयूक्त ठरु शकतो का ? जेथे idealismच नसेल तेथे reality कशाच्या बळावर सुधारणार? राखी बाधंणे हा भारतीय सणच आहे आणि भारतातच साजरा होतो. हवे तर आपणास याचे हवे तेवढे संदर्भ उपलब्ध करतो. बाकी reality अंध दृष्टीकोण सुद्धा बाळगलेला नाही जे चुक आहे ते चुक म्हणणारा निषेधाचा धागालेख सुद्धा लिहिला आहे तेव्हा माझा दृष्टीकोण समतोल आहे. 'बेशीस्तीची संधी' हा विषय आमेरीकेतील ४ जुलैच्या कचरा विखुरण्याच्या संदर्भाने दिला आहे -संदर्भ हवे असतील तर देता येतील- तसे करताना भारतातील सिव्हीक सेन्सच्या अभावाचीही निंदाच केली आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
र
राही Sun, 12/13/2015 - 14:14 नवीन
प्रतिसाद आवडला आणि शंभर टक्के पटला. "इथे(भारतात) वखवखीत नजरा असलेल्या पुरुषांचे एकूण भारतीय लोकसंख्येशी असलेले प्रमाण हे इतर काही देशांतल्या तशाच प्रमाणाहून अधिक असते, असे म्हणता येईलच येईल. युरोपीय देश, अमेरिका, अगदी स्रीलंका आणि भुटान् सारखे चिमुकले देश इथेसुद्धा हे प्रकर्षाने जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
य
यशोधरा Fri, 12/11/2015 - 08:40 नवीन
'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची मानसिकता हाही भाग या थोड्याशा नकारात्मक दृष्टिकोनामधे येतो. गोवा म्हणजे धिंगाणा या एकाच भावनेने बहुसंख्य देशी पर्यटक तिथे येतात. गोवेकरांच्या रक्तातच आतिथ्यशीलता आहे. पण सगळ्या जागा घाण करून ठेवणे, अचकट-विचकट वागणे, जिथे आहोत त्या लोकल संस्कृतीचा काहीही आदर न करणे या गोष्टी परदेशी पर्यटकांपेक्षा भारतीयांच्या नजरेत फार भरतात यावर कुणाचाच आक्षेप नसावा. (परदेशी पर्यटकांचे प्रश्न वेगळे आहेत, पण ते सामान्य माणसाच्या नजरेत भरत नाहीत). गोवेकरांकडे बघण्याचाही अन्य भारतात दृष्टिकोन थोडा विचित्र आहेच. 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी जेव्हा बदलते, तेव्हा मनात अढी बसतेच..असो.
अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 08:59 नवीन
'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची मानसिकता...
हा शब्दप्रयोग नजरचुकीने अनवधानाने झाली आहे का ? यात राहींनी योजला तसा 'उर्वरीत' हा शब्द यो़जणे अभिप्रेत होते का ? कारणही आपला एकुण प्रतिसाद अभ्यासता हे वाक्य अत्यंत आक्षेपार्ह म्हणावे असे आहे. गोव्यातले लोक स्वतःला भारतीय समजत नाहीत का ? असा प्रश्न या वाक्यातून निर्माण होतो हे आपण लक्षात घेतले आहे का ? युरोपीयन वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळवताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीय उपखंडाच्या इतिहासाचे जे परिशिलन केले त्यात १) छोट्या छोट्या स्वतंत्र राजवटींमुळे भारतीयांना जाचक अन्याय्य परकीय आक्रमणांना सातत्याने सामोरे जावे लागले २) छोट्या छोट्या सार्वभौम सत्ता सर्वसामान्य नागरीकांच्या प्रती जबाबदार राहण्या एवजी सातत्याने अंतर्गत आणि बाह्य संघर्षात घेरलेल्या राहतात ३) भारतीय उपखंडातील संस्कृतीत एक समानता आहे आणि आज भारतीय घटना जी स्वातंत्र्ये देते ती नेहमीच भारतीयांना अनुस्यूत/अभिप्रेत राहीलेली आहेत जसे की भारतात कुठेही येण्या जाण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे भारतीय उपमहाद्वीपाची जिथपर्यंत नैसर्गीक सिमा आहे म्हणजे उत्तरेस पर्वत रांगा आणि दक्षिणेस समुद्र तो सर्व भौगोलीक प्रदेश एकच एकसंघ देश असावा हि भारतास स्वातंत्र्य मिळतानापासूनचा विशीष्ट दृष्टीकोण राहीला आहे.
....१९६१ला मुक्त झालेल्या गोव्यात अचानक सगळीकडून देशभक्ती उफाळून यावी, ही अपेक्षाही चूक आहे ना..अन्य भारतासोबत एक शेअर्ड इतिहास असा फारसा नाही, त्यामुळे तेवढ्या प्रखर प्रमाणात राष्ट्राभिमान वगैरे गोष्टी ५४ वर्षांत अगदी सरसकट सगळ्यांमधे कशा काय निर्माण व्हाव्यात बरं?
आपले उपरोक्त वाक्य सर्वाधिक आक्षेपार्ह आहे. १) पै ताईंनी पुर्ण रामायण सांगीतल्या नंतर रामाची सिता कोण म्हणावे ? गोवा राज्य अब्जावदीवर्षांपासून भारतीय उपखंडाचा अविभाज्य भाग असताना " ..अन्य भारतासोबत एक शेअर्ड इतिहास असा फारसा नाही," हे वाक्य अत्यंत अज्ञानमुलक आणि बेजबादार स्वरुपाचे आहे. पण पै ताईंनीच त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांचे अज्ञान दुर करणे अधिक सयूक्तीक ठरावे. २) आपले वाक्य १९४७ला मुक्त झालेल्या भारतात अचानक सगळीकडून देशभक्ती उफाळून यावी, ही अपेक्षाही चूक आहे ना.. असही लिहिल जाऊ शकेल किंवा कसे ? किंवा भारतात निजामासहीत असंख्य संस्थानांचे संस्थाने विलीन करुन घेतली गेली त्या सर्व संस्थानिकातील प्रजांनी अशाच प्रकारच्या वाक्य रचना अथवा विचार बाळगून पुन्हा एकदा भारताचे पुन्हा तुकडे तुकडे करण्याचा विचार करावयाचा काय ? ३) एक उदाहरण म्हणून गोव्याच्या मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्री केलेले आहे त्यांच्यात देशभक्ती आहे का नाही हे तपासण्याची गरज आहे का असा प्रश्न आपल्या उपरोक्त वाक्यामुले पडू शकतो. (माझा मनोहर पर्रिकरांवर पूर्ण विश्वास आहे-केवळ तुमच्या बेजबादार विचारांमुळे कसे अनर्थ होऊ शकात या कडे लक्ष वेधतो आहे.) आपण जे लिहिले आहे त्यामुळे आपण समस्त गोवेकरांना बदनामीत आणि त्यांच्या बद्दल उर्वरीत भारतीयात अधिक गैरसमज निर्माण होऊन अधिक दुरावा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन आपल्या विचारांचा आपण पुर्नविचार करावा हि नम्र विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
य
यशोधरा Fri, 12/11/2015 - 09:05 नवीन
प्रश्न पिशीला आहे पण एक भारतीय आणि मूळ गोयंकार म्हणून आणि इतर अनेक गोवेकरांची माअहिती असल्याने मी हे नक्कीच सांगू शकते की गोव्याचे लोक स्वतःला भारतीयच समजतात, भारतीय कायदे कानून मानतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पिशी अबोली Fri, 12/11/2015 - 09:32 नवीन
'इंडियन्स' हे कोट्स मधे टाकल्यावर त्याचा अर्थ वेगळा होतो असं मला वाटतं. या धाग्यावर एकूणच भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्यातून हा सूर दिसला की गोवेकरांना भारतीयत्वाचं काही देणंघेणं नाही. त्या पार्श्वभूमीवर हा शब्दप्रयोग मुद्दाम केलेला आहे. दुसर्‍या परिच्छेदातून तुम्ही माझा प्रतिसाद नीटसा वाचला नसावा असं मला वाटलं.
भारतीय उपमहाद्वीपाची जिथपर्यंत नैसर्गीक सिमा आहे म्हणजे उत्तरेस पर्वत रांगा आणि दक्षिणेस समुद्र तो सर्व भौगोलीक प्रदेश एकच एकसंघ देश असावा हि भारतास स्वातंत्र्य मिळतानापासूनचा विशीष्ट दृष्टीकोण राहीला आहे.
कुणाचा? हा प्रश्न महत्वाचा आहे. गोवा पोर्तुगीज अंमलाखाली आला तेव्हा ही 'भारत' म्हणून आयडेंटिटी होती का? माझं उदाहरण अगदीच विचित्र आहे, पण दुसरं काही सुचत नाही म्हणून सांगते. एखाद्या मुलाला त्याचे आई-वडील काही ना काही कारणांसाठी त्याच्या जन्मापासून दूर ठेवतात. त्या मुलाला त्यांची नीटशी स्मृतीही नाही. आणि अचानक एका जाणत्या वयात त्याला त्याचे आई-वडील परत क्लेम करतात. त्या मुलाला आनंद तर अर्थात होईलच. पण जन्मापासून आई-वडिलांसोबत राहिलेल्या मुलांना जेवढी आपुलकी असते, तेवढी लग्गेच निर्माण होईल का? त्याला काही काळ तर जावा लागेलच.. गोवा मुक्तीसंग्रामातील अन्य भारतीयांचे योगदान इतिहास जाणणार्‍यांना नक्कीच माहीत आहे. पण सर्वसामान्य माणसाला इतिहासाचे सगळे पदर उलगडून पहायला वेळ असतो का? असो. पुढे १. ठीक आहे. तुमचे मत. २. पुन्हा एकदा, तुम्ही माझा प्रतिसाद वाचलात तर त्यात पहिलाच मुद्दा या गोष्टीबद्दल आहे. तुकडे वगैरे परिस्थिती कुठे हो, उलट मी तर आताच्या पिढीत हा द्वेष कमी कसा होत चाललाय हे लिहिलंय. असो, तर तुम्हाला माझ्या प्रतिसादात एवढं आक्षेपार्ह काय वाटलं ते मला खरंच अजूनही समजत नाहीये. तरीही, माझ्या वाक्यरचना, शब्दप्रयोगांमधून काही गैरसमज होण्यासारखी परिस्थिती असल्यास तसा करून घेऊ नये, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 09:41 नवीन
....एखाद्या मुलाला त्याचे आई-वडील काही ना काही कारणांसाठी त्याच्या जन्मापासून दूर ठेवतात. त्या मुलाला त्यांची नीटशी स्मृतीही नाही. आणि अचानक एका जाणत्या वयात त्याला त्याचे आई-वडील परत क्लेम करतात. त्या मुलाला आनंद तर अर्थात होईलच. पण जन्मापासून आई-वडिलांसोबत राहिलेल्या मुलांना जेवढी आपुलकी असते, तेवढी लग्गेच निर्माण होईल का? त्याला काही काळ तर जावा लागेलच..
उर्वरीत भारतही पारतंत्र्यात होता,- उर्वरीत भारत आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यात केवळ १४ वर्षांचे अंतर आहे- स्वातंत्र्य सैनिकांना पारतंत्र्यात असतानाही भारतीयत्वाची जाणीव झाली, आम्ही आमचा देश विसरलो आहोत असे स्वातंत्र्य सैनिकांनी म्हटले असते तर भारतीय उपमहाद्वीपास वसाहतवादातून कधिच स्वातंत्र्य मिळाले नसते. गोवा उर्वरीत भारतापेक्षा अधिककाळ वसाहतवादी देशाच्या पारतंत्र्यात राहीला असेल तर देशप्रेम अधिक जाणवावयास हवे कमी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
र
राही Fri, 12/11/2015 - 10:03 नवीन
आपल्या प्रतिसादात थोडी टोकाची भूमिका दिसली. अस्सम, मणिपूर वगैरे ईशान्येयकडील राज्ये, लद्दाख, अगदी केरळसुद्धा, ही भारताचा भाग आहेत आणि भारताशी एकनिष्ठ आहेत. पण म्हणून त्यांना भारतातील सर्व प्रथापरंपरांची माहिती अथवा त्यांविषयी आपुलकी आणि अभिमान असू शकेल का? इथे भूभाग अब्जावधी वर्षे सलग असणे ही गोष्ट कमी महत्त्वाची ठरते. युरोपही तसा सलग आहे पण त्यांच्या प्रांतीय (आता कित्येक ठिकाणी राष्ट्रीय) अस्मिता नेहमीच अलग होत्या. आपणही फेडेरॅलिटी तत्त्वतः मान्य केली आहे. आपल्याला केरळचे हीरोज़ किंवा मानबिंदू माहीत नसतात तसेच केरळीयांनाही आपले हीरोज माहीत नसतात. तसेच हे आहे. गोव्यातले लोक नेहमीच हॅपी-गो-लकी असे, थोडे लॅटिन अमेरिकन स्वभावाचे राहिले आहेत. या बाबतीत एकेकाळच्या कोंकणातील बहुजनांशी त्यांचे नाते सांगता येईल. भाकरी-भात-मासळी खावी, झाडामाडांची देखभाल करावी आणि त्याच झाडामाडांच्या सावलीत सुखाने झोपून जावे इतक्याच माफक अपेक्षा असत त्यांच्या. आणि अगदीच खोलात जायचे तर सामान्य भारतीय माणूस तरी कुठे देशभक्त आहे? देशाच्या प्रगतीस, प्रतिमेस आणि सुव्यवस्थेस बाधा येईल अशा कितीतरी गोष्टी त्याच्या हातून अजाणता आणि जाणूनबुजूनसुद्धा होत असतात. मला वाटते की महाराष्ट्र (सरकार नव्हे) हा गोव्याला आपले, हक्काचे समजतो. ह्या अतिआपलेपणातून थोडा पझेसिव्नेस आला आहे. मनोहर पर्रीकरांचे उदाहरण तितकेसे चपखल नाही. एकेका माणसाची देशभक्ती मोजायची आवश्यकता नाही. तसा रोखही मूळ प्रतिसादात नाही. त्या प्रतिसादामुळे असा काही अनर्थ होण्याची शक्यता मला तरी जाणवली नाही. गोव्याचे लोक भारतदेशभक्त नसतात असे त्यांच्या प्रतिसादातून निष्पन्न होत नाही त्यामुळे जोरदार खंडनाचीही आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पिशी अबोली Fri, 12/11/2015 - 10:18 नवीन
धन्यवाद राहीजी. मला इतकं नेमकं सांगता येत नव्हतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 10:23 नवीन
@पिशी अबोली; राहींचा अयोग्य समर्थन प्रतिसादात स्वत:च्या चुकीच्या विचारांचे समर्थन शोधणे सुयोग्य कृती नव्हे. जेव्हा एखादी चुक होते ती कबुलकरून सुधारणाकरणे अधिक उचित असावे का या बद्द्ल विचार करावा हि नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 10:20 नवीन
अगदी माझ्या घरातल्या/गल्लीतल्या/शहरातल्या/जिल्ह्यातल्या/राज्यातल्या माणसाने जरी देशप्रेमाविषयी चुकीचे बेजबाबदार विचार अथवा विधान केले तर मी एवढ्याच खणखणीतपणे टिका करेन. देशप्रेम देशप्रेम असते ते टोकदारच असावे लागते. तुमच्याकडेही देशप्रेम असेल तर माझा टोकदारपणा टोचणार नाहीच उलट माझ्यासारखी टोकदारपणा असलेले देशभक्तही आहेत याचा अभिमान वाटेल. एकाच्या चुकीमुळे दुसर्‍याच्या चुकिचे समर्थन होऊ शकत नाही. सगळ्याच व्यक्ती कुठे देशप्रेमी असतात हे कारण देऊन तिसर्‍या देशप्रेम नसलेल्या व्यक्तीच्या देशप्रेम नसण्याचे समर्थन होऊ शकत नाही. हेही चुक आणि तेही चुक चुक ते चुक. स्थानिक अस्मिता संस्कृती देशप्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्थानिक संस्कृती जोपासण्याचे व्यक्ती आणि समुह पुरेसे स्वातंत्र्य भारतीय घटना सर्व राज्ये आणि सर्व व्यक्तींना देते आणि जोपासते. एखादी गोष्ट अयोग्य अथवा अन्याय्य असेल तर त्यासाठी शांततामय मार्गाने प्रयत्न करण्याचे पुरेसे ऑप्शन्स भारतात उपलब्ध आहेत त्यासाठी देशप्रेमाशी तडजोड करण्याची भूमिका तर्कसुसंगत नाही. गोव्याचा आणि भारतीय संस्कृती आणि राजकीय सहसंबंध दाखवून देण्याचे मी पै ताईंवर सोपवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुनील Fri, 12/11/2015 - 10:31 नवीन
देशभक्तीची ठेकेदारी डोक्यात जाऊ लागली आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 10:43 नवीन
हे माझ्यासाठी आहे का ? माझी देशभक्तीची भूमिका अत्यंत डोळस आहे. देशभक्तीच्या भूमिका ज्यांच्या डोक्यात जातात त्यांनी अवश्य आत्मपरिक्षण करावे. आम्ही आमच्या देशभक्तीवर ठाम आहोत आमच्या देशभक्तीचा आम्हाला पुर्ण अभिमान आहे. ज्यामुळे अतिरेक्यांना मदत पोहोचवली जाऊ शकते, देशद्रोही कारवाया होऊ शकतात अशा देशभक्ती नसलेल्या डोक्यांचे काय करावे हा वेगळा चिंतेचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 12/11/2015 - 11:00 नवीन
माझा प्रतिसाद पुन्हा वाचावा. देशभक्ती नव्हे, देशभक्तीची ठेकेदारी डोक्यात जाते, असे म्हटले आहे. असो, आपण सूज्ञ आहातच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/11/2015 - 11:19 नवीन
सुस्पष्ट व्याख्येचा अभाव असेल तर, देशप्रेम असो वा ठेकेदारी शब्दांचा वापर सब्जेक्टीव ठरू शकतो. इन एनी केस देशप्रेम हि व्यक्तीगत आणि सामुहीक जबाबदारी असल्यामुळे वेळोवेळी लोक आपले देशप्रेम व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेत असू शकतात. देशप्रेम हे तडजोड न करता टोकदारपणे केलेच पाहिजे. पण अर्थात सुयोग्य आत्मपरि़क्षण, आत्मभान आणि डोळसपणाची साथ असणे केव्हाही चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्पार्टाकस Fri, 12/18/2015 - 23:06 नवीन
ये वाको-दी-गामा की गन है! किसके मामा की गन है? वास्को-दी-गामा वाचून हेच आठवलं!
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 12/20/2015 - 01:41 नवीन
चला तर. आता स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र मराठवाडा, स्वतंत्र खान्देश, स्वतंत्र कोंकण मिळवण्याच्या कामाला लागू या. विदर्भ तर स्वतंत्र राज्य होणारच. मग बाकीच्याही मागण्यांना जोर येईल आणि कदाचित पुढच्या पाचपंचवीस वर्षात त्या मान्यही होतील. मग सिंधुदुर्गसुद्धा गोमंतकात विलीन करून गोव्याचे एक (सध्याच्या अगदीच इटुकल्या आकारापेक्षा) थोडे मोठे राज्य बनवता येईल. कुणी सांगावे? जाता जाता : या पैकी प्रत्येक प्रदेशात राजधानी होऊ शकतील अशी शहरे आहेत, काही विकसित होऊ घातली आहेत. कोंकणाकडे मात्र मुंबईशिवाय असे दुसरे राजधानीयोग्य शहर दिसत नाही. ते लोक मुंबईच मागणार. पण मुंबईचेच एक बृहन्मुंबई राज्य झाले तर? सांप्रत या सगळ्या रम्य कल्पना आहेत हे खरे, पण कल्पना करायला तर हरकत नाही? चुनावी जुमले असू शकतात मग स्वप्नातले इमलेसुद्धा चालून जातीलच. नाही का?
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/21/2015 - 05:00 नवीन
सिंधुदुर्गसुद्धा गोमंतकात विलीन करून गोव्याचे एक (सध्याच्या अगदीच इटुकल्या आकारापेक्षा) थोडे मोठे राज्य बनवता येईल. कुणी सांगावे?
गोव्यात, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कर्नाटकातील कारवार आणि बेळगाव भाग मिळून एक 'विशाल गोमंतक' असे राज्य बनवावे, अशी कल्पना कुणीतरी (बहुधा बाळ ठाकरे यांनी) मांडली होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुनील Mon, 12/21/2015 - 05:00 नवीन
सिंधुदुर्गसुद्धा गोमंतकात विलीन करून गोव्याचे एक (सध्याच्या अगदीच इटुकल्या आकारापेक्षा) थोडे मोठे राज्य बनवता येईल. कुणी सांगावे?
गोव्यात, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कर्नाटकातील कारवार आणि बेळगाव भाग मिळून एक 'विशाल गोमंतक' असे राज्य बनवावे, अशी कल्पना कुणीतरी (बहुधा बाळ ठाकरे यांनी) मांडली होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा