पुढच्यासाठी
कुणास ठाउक बाग कुणाची
कुणी शिंपली हिरवी झाडे
तारुण्याचे मोल, कुणाच्या
हाडांची अन झाली काडे
हिरवळ दिसते, पानोपानी
मंजुळ किलबिल मंद स्वरांची
जागोजागी खूण सापडे
चराचरातिल अद्वैताची
विश्वाचा हा जरी कोपरा
कोप-यातले विश्व सुखाचे
भय- क्रोधाला इथे न थारा
इथे न वाढे तण्य फुकाचे
आनंदाने भोग दान हे
घाल तशी भर अपुली काही
किंवा केवळ पाही इतुके
कीड- वाळवी लागत नाही
ठेव आठवण त्या पहिल्याची
झाड लावले येथे ज्याने
आपसूक मग सुचेल तुजला
पुढच्यासाठी ठेवुन जाणे
-- अमेय
मिसळपाव