Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण जिंकणार दिल्ली?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/29/2015 - 16:13
🗣 452 प्रतिसाद
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
149616 वाचन

💬 प्रतिसाद (452)
र
राघवेंद्र गुरुवार, 01/29/2015 - 16:45 नवीन
माझ्या मते भा. ज. पा. ला थोडा फायदा, लोकसभेतील बहुमता मुळे होईल. खरे काय हे लवकरच कळेल.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 01/29/2015 - 16:47 नवीन
मिडियावाल्यांच्या भाषेत सांगायच झाल तर ये दिल्ली की जनता की जीत होगी, लोकशाही की जीत होगी !
  • Log in or register to post comments
ब
बटाटा१ गुरुवार, 01/29/2015 - 16:49 नवीन
आआप कसा वाईट्ट वाईट्ट अगदी...
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 01/29/2015 - 17:36 नवीन
हा हा हा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बटाटा१
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/29/2015 - 17:16 नवीन
बेदी बाईंना भाजपात आणुन शहा-मोदी द्वयीने उत्तम चाल खेळली हे खरं, पण ओळखपत्र प्रकरणी बाई अडचणीत येणार असं दिसतय. निकाल काय लागेल माहित नाहि, पण आम आदमे पार्टीचं स्पष्ट बहुमताचं सरकार बनावं असं वाटतं.
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 01/29/2015 - 17:28 नवीन
केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास निश्चितच दिल्लीकरांना फायदा होईल! वीजेचे दर कमी करणे, मोफत पाणी देणे ,बेघरांसाठी रैन बसेरा' असे चांगले उपक्रम त्यांनी ४९ दिवसात राबवले.... या उलट नरेंद्र मोदीचे सरकार येऊन वर्ष होत आले तरीही दिलेल्या आश्वासनांपैकी एकही पुर्ण केलेले नाही, जनतेच्या पैश्यावर मोदींच्या भपकेबाज परदेशवार्या सुरु आहेत. स्वतःच्या प्रतिमेवरही आता विश्वास न राहिल्याने किरण बेदीला पुढे केले आहे ,एकंदर आपचे पारडे जड आहे. दिल्लीकर आपलाच निवडुण देतील तर खरंच त्यांच्यासाठी केजरीवाल काही ठोस निश्चितच करतील.मागच्या वेळेस जनलोकपाल यावा यासाठी त्यांनी राजीनामा दिला,त्यात गैर काहिच नाही. लाल बहादूर शास्त्रीजींनंतर प्रामाणिकपणा असलेले सध्यातरी केजरीवाल एकमेव आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या गुरुवार, 01/29/2015 - 18:31 नवीन
केजरीवाल परत सत्तेत येतील असे तरी वाटत नाही. कारण केजरीवालांनी " राजीनामा " देउन स्वताची व पक्षाची प्रतिमा खराब केली असे मला वाटते.त्यामुळे दिल्लीकर परत त्यांना संधी देतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/29/2015 - 18:50 नवीन
लाल बहादूर शास्त्रीजींनंतर प्रामाणिकपणा असलेले सध्यातरी केजरीवाल एकमेव आहेत असे वाटते.
मोदि समर्थकांनी कितीही आदळापट केली, उपहास केला तरी आप ची ताकत कमि होणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/29/2015 - 19:09 नवीन
@दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला>> इतकी घाण भाषा का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ब
बटाटा१ गुरुवार, 01/29/2015 - 19:51 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/29/2015 - 20:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/30/2015 - 03:18 नवीन
इतकी घाण भाषा का बरे?
+१ असेच लोक मग ''मी तर माझे (स्पष्ट,प्रामाणिक वगैरे वगैरे) मत मांडले होते. मग आय्डी. बॅन का झाल ब्वॉ?" असे विचारत बसतात. मूळ धागा लेखकाला 'दिल्लीत असाल तर भाजपाला मत द्या' असे सांगून धागा थोडक्यात संपवता आला असता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
H
hitesh Fri, 01/30/2015 - 05:00 नवीन
मोदी भये कोतवाल अब काहे का डर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:10 नवीन
वा माई! तूच आयडी बॅन होण्याविषयी बोलावंस! आपले यापूर्वी किती आयडी बॅन झालेत आणि सांप्रतचा आयडी हा कितवा आयडी आहे हे विसरलास काय रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:09 नवीन
त्यात घाण काहीही नाही. हा नेहमी वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. केजरीवालांसंदर्भात एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील लेखात हा वाक्प्रचार वापरलेला होता. तो अत्यंत चपखल वाटल्याने मी माझ्या धाग्यात वापरला. अर्थात संपादक मंडळाला तो अयोग्य वाटल्यास त्यांनी ते वाक्य काढून टाकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:06 नवीन
>>> लाल बहादूर शास्त्रीजींनंतर प्रामाणिकपणा असलेले सध्यातरी केजरीवाल एकमेव आहेत असे वाटते. तुमच्या विनोदबुद्धीला सलाम! हा विनोद नसेल तर निदान उपहास तरी असेल असं वाटतंय. बादवे, समाजसेवेसाठी आपल्या महसूल खात्यातल्या प्रशासकीय सेवेतून २ वर्षांची रजा घेताना केजरीवालांनी रजा संपल्यावर आपण परत सेवेत रूजू होऊ व रूजू न झाल्यास दंड भरू असे करारपत्र दिले होते. या करारपत्राच्या आधारावरच त्यांना रजा मिळाली होती. २ वर्षानंतर रजा संपल्यावर कामावर हजर न झाल्यामुळे त्यांना महसूल खात्याने करारपत्राच्या अटीनुसार ६-७ लाख रूपये भरायला सांगितल्यावर केजरीवालांनी आपण भ्रष्टाचाराच्या विरूद्ध आंदोलन करत आहोत म्हणून मुद्दाम सरकार आपल्याला पैसे भरायला सांगत आहे असा माध्यमांकडे कांगावा करायला सुरूवात केली होती व पैसे भरण्यास नकार दिला होता. नंतर करारपत्रानुसार आपल्याला पैसे भरावेच लागतील हे त्यांच्याच वकील मित्रांनी लक्षात आणून दिले तेव्हा निमूटपणे पैसे भरले होते. वा रे प्रामाणिकपणा! लाल बहादूर शास्त्रींच्या नंतर प्रामाणिकपणात अखेरचा शब्द असलेल्या याच प्रामाणिक व्यक्तीने मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर कित्येक महिने सरकारी निवासस्थान बळकावून ठेवले होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:20 नवीन
>>> केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास निश्चितच दिल्लीकरांना फायदा होईल! वीजेचे दर कमी करणे, मोफत पाणी देणे ,बेघरांसाठी रैन बसेरा' असे चांगले उपक्रम त्यांनी ४९ दिवसात राबवले.... टोपी फिरविलीत की नाना. हा तुमचाच मागील वर्षीचा प्रतिसाद बघता का जरा. http://www.misalpav.com/comment/547008#comment-547008
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/29/2015 - 17:49 नवीन
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली.
बाई ग श्रीगुरुजी, भाजपावल्यांनी तर अशा टोप्या अनेक्वेळा फिरवल्यात.महाराष्ट्राच्या निवडणूकीत भाजपेयींनी किती कॉन्ग्रेस्,राष्ट्रवादीच्या लोकांना पावन करून घेतले याची भली मोठ्ठी यादी तयार होईल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/29/2015 - 19:03 नवीन
बाई ग श्रीगुरुजी >> =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बॅटमॅन Fri, 01/30/2015 - 08:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:17 नवीन
अरे माई, भाजप बोलूनचालून टोपी फिरविणार्‍यांचा पक्ष. त्यांनी टोपी फिरविली यात नवल ते काय. पण केजरीवालांसारख्या अखंड भारतात एकमेव प्रामाणिक, स्वच्छ व शब्दांचा पक्का असलेल्या महात्म्याने टोपी फिरविणे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
स्वामी संकेतानंद Fri, 01/30/2015 - 03:38 नवीन
आप जिंकेल दिल्ली. २ महिन्यांआधी अजिबात वाटत नव्हते तसे होईल म्हणून. जनमत केजरीवालविरोधात होते. एक किस्सा सांगतो. पटेल नगर मेट्रो खाली असलेल्या बस स्टेशनवर एक बिल बोर्ड लागले होते. 'जो बोला सो किया, ४९ दिन में बिजली बिल कम किया' असे लिहीले होते. सोबत केजरीवालचा मोठा फोटो. एकाने तिथे फोटोशेजारी मार्करने 'महाठग' लिहून ठेवले होते. मोबाइल घरी ठेवून बाहेर पडलो होतो नाहीतर फोटो काढला असता. दुसर्‍या दिवशी गेलो तेव्हा कोणीतरी ते खोडले होते. कोणी म्हणेल हे भाजपेयींचे काम असावे. पण मला तसे वाटत नाही. दुकानात, चौकात लोक याच लाइनवर बोलत. किरण बेदींना आणून चूक केली की काय असे वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/30/2015 - 03:55 नवीन
खुप मोठी चूक केली आहे भाजपाने बेदींना आणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/30/2015 - 03:52 नवीन
या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत.
नक्की?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:23 नवीन
नक्कीच. कालच द वीक-आयएमआरबी च्या सर्वेक्षणाचे आकडे प्रसिद्ध झालेत. त्यांच्या अंदाजानुसार भाजप ३६, आआप २९ व काँग्रेस ५ अशी परिस्थिती असेल. आतापर्यंत जी अनेक सर्वेक्षणे प्रसिद्ध झालीत त्यात काँग्रेस पूर्वीच्या ८ जागांपेक्षाही कमी जागा मिळवेल यावर एकमत आहे. आआप व भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होईल यावरही एकमत आहे. पण बरीचशी सर्वेक्षणे आआपला भाजपच्या तुलनेत थोड्या जास्त जागा दाखवित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/30/2015 - 08:27 नवीन
मला व्यक्तिशः क्लिंटनसायबाच्या विश्लेषणावर विश्वास वाटतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विटेकर Fri, 01/30/2015 - 05:13 नवीन
कोलिन्ग क्लिन्ट्न .....
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 05:50 नवीन
काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले.
सरकार स्थापन करण्याअगोदर आम आदमी पक्षाने जागोजागी सभा घेऊन जनतेला हा प्रश्न विचारला होता. जनतेने स्वतःहून ‘आप’ला सरकार स्थापन करण्याबद्दल सांगितले होते. त्या जनसभांचे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. दिल्लीमध्ये कुणाला ओळखत असाल तर त्यांना विचारा.
अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे
- पोलिसांकडे कित्येक वेळा तक्रार करूनसुद्धा काहीच साध्य न झाल्याने खिरकी एक्स्टेंशनची जनता रात्री उशिरा सोमनाथ भारती यांच्या घरी गेली. त्यांनीच निवडून दिलेला एक आमदार आणि मंत्री म्हणून म्हणून सोमनाथ भारती त्यांच्या मदतीसाठी त्या जागेवर गेले. व्हिडिओ पाहिला असेल तर कळाले असेल की पोलिस एका मंत्र्याचे म्हणणे ऎकून घेत नाहीयेत, मग त्या सामान्य लोकांचे तर विचारूच नका. खिडकीमध्ये राहणार्‍या लोकांचे काय रिऍक्शन्स आहेत जरा जाणून घ्या. आणि युगांडाच्या त्यातल्या काही स्त्रीयांनी नंतर स्वतःहून कबूल केले आहे की तिथे ड्रग्स आणि सेक्स रॅकेट चालायचे. - केजरीवालच्या धरण्यामुळे जनतेला त्रास झाला असेल तर यावेळी ते त्यांना निवडून देणारच नाहीत. हाय काय नाय काय... - जनलोकपालसाठीच ते राजकारणात आले होते. असंवैधानिक काहीही नव्हते त्यात. त्या दिवशी सदनात नेमके काय झाले हे पाहायचे असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्युबवर.
वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला
लेख लिहिणारा कोण असू शकतो याचा अंदाज येतोय. समजून घ्यायला सोप्पे केल्याबद्दल धन्यवाद.
आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.)
आपच्या या ‘मुख्य’ नेत्यांना भाजपने सामिल करून घेतले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपच्या किमान २ सिट तरी पक्क्या झाल्या आता. शाझिया मावशिंचे जुने व्हिडिओज किंवा ट्विट्स देऊ का ? की माहित आहेत ? बिन्नी बाबूंबद्दल काय बोलणार ? रेकॉर्डब्रेक २ तासांचे आमरण उपोषण केले होते त्यांनी ५०-६० लोकांच्या प्रचंड जनसमुदायासमोर.
भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली.
मुखी किंवा उपाध्याय हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार कधीच नव्हते हे दिल्लीतल्या भाजप कार्यकर्त्यांना समजून सांगा ना प्लिज. तिकिट न मिळालेल्या काही स्थानिक नेत्यांनासुद्धा समजून सांगा. विनाकारण भाजपच्या ऑफिसवर मोर्चे काढत आहेत, अमित शाह यांच्या विरोधात नारे लावत आहेत, राजिनामा देत आहेत, पक्ष सोडून जात आहेत.
आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
याबद्दलसुद्धा भाजपचे खूप खूप आभार. बर्‍याच दिवसांपासून राहूल गांधींना मिस करत होतो, पण किरण बेदी राहूल बाबांची उणीव भासू देत नाहीयेत. उलट राहूल बाबा खूष आहेत आणि प्रार्थना करत आहेत की किरण बेदी दर ५ मिनिटाला कॅमेर्‍यापुढे याव्यात आणि माझे सगळे रेकॉर्ड तुटावेत. अगोदर स्वतः केजरीवालला चर्चेचे आवाहन दिले आणि मग ते केजरीवालने स्विकारले तर मॅडम चर्चा करणार नाही म्हणत आहेत. तसा मी कोणत्याही पोल किंवा सर्वेला मानत नाही, पण काल-परवा एका वेबसाईटवर (बहुतेक FirstPost) वाचले की दस्तुरखुद्द किरण बेदींना त्यांच्याच मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागेल. (इतकी सेफ सिट घेऊनसुद्धा !) किरण बेदींचेसुद्धा अनेक ट्विट्स आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत, हवे असल्यास मिळवून देतो. असो, इतका भयंकर मास्टरस्ट्रोक खेळल्याबद्दल भाजपचे मनःपूर्वक आभार.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील
पूर्ण पोस्टमध्ये ‘आप’ला इतके घालून पाडून बोललात, तरी तुम्हाला आपचे पारडे जड वाटते ? कमाल आहे ब्वा !
जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
तुमचे खूप कन्फ्युजन होत आहे असे दिसतंय. तुम्ही पूर्ण पोस्टमध्ये आपवाले कसे चुकीचे होते, आहेत हे दाखवलंय. ते जर खरे असेल तर स्पष्ट बहुमत तर सोडाच, ५ सिट सुद्धा येणार नाहीत आपच्या. थंड घ्या. १० दिवस राहिलेत फक्त.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 01/30/2015 - 07:15 नवीन
पूर्ण पोस्टमध्ये ‘आप’ला इतके घालून पाडून बोललात, तरी तुम्हाला आपचे पारडे जड वाटते ? कमाल आहे ब्वा !
+१ अगदी हेच म्हणणार होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:44 नवीन
>>> सरकार स्थापन करण्याअगोदर आम आदमी पक्षाने जागोजागी सभा घेऊन जनतेला हा प्रश्न विचारला होता. तेच तर नाटक होतं. एसेमेस मागविताना फक्त दिल्लीकरांकडूनच एसेमेस येतील किंवा एका क्र्मांकावरून एकच एसेमेस येईल असे कोणतेच फिल्टर नव्हते. प्रचाराच्या काळात "मी काँग्रेसचा कधीही पाठिंबा घेणार नाही" अशी शपथ घेणार्‍या केजरीवालांची काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यावर एकदम पंचाईत झाली. घेतलेली शपथ मोडली तर नाचक्की होईल हे ओळखण्याइतके धूर्त ते नक्कीच आहेत. पण सत्तासंपादनाची घाईही झाली होती. त्यामुळेच एसेमेस चे नाटक करून सत्ता मिळविली होती. जनमताचा इतकाच आदर होता तर मुख्यमंत्रीपद सोडून पलायन करण्याआधी का नाही जनतेचे मत जाणून घेतले? >>> पोलिसांकडे कित्येक वेळा तक्रार करूनसुद्धा काहीच साध्य न झाल्याने खिरकी एक्स्टेंशनची जनता रात्री उशिरा सोमनाथ भारती यांच्या घरी गेली. जर मंत्रीच नियमांचे किंवा कायद्याचे पालन करू शकत नसतील तर मग कोण ते करणार? >>> जनलोकपालसाठीच ते राजकारणात आले होते. असंवैधानिक काहीही नव्हते त्यात. त्या दिवशी सदनात नेमके काय झाले हे पाहायचे असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्युबवर. अण्णांबरोबर दुसर्‍यांदा उपोषण करताना अण्णा निर्भय होते तर केजरीवालांना ते झेपत नव्हते व कधी एकदा उपोषण संपते असे झाले होते. अण्णांसारखे प्रदीर्घ उपोषण त्यांना जमलेच नसते. अशा प्रसंगी "नुसते उपोषण करत बसण्यापेक्षा राजकारणात येऊन व्यवस्था बदला" असे कोणीतरी आवाहन केल्याचे निमित्त करून ते उपोषणातून बाहेर आले व नंतर राजकारणात आले. सदनात काय झाले हे मी सुद्धा पाहिले आहे. राज्यपालांची परवानगी नसताना दिल्ली विधानसभेत कोणतेही विधेयक मांडता येत नाही. तरीसुद्धा जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट ते धरून बसेल. खरं तर राजकारण त्यांना झेपत नव्हते व मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपण हुतात्मा झालो हे दाखविण्याची त्यांची योजना होती. म्हणूनच राजीनामा देउन त्यांनी सुटका करून घेतली. >>> मुखी किंवा उपाध्याय हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार कधीच नव्हते हे दिल्लीतल्या भाजप कार्यकर्त्यांना समजून सांगा ना प्लिज. हे खरं तर केजरीवालांना समजायला हवे होते. हे दोघे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत अशी आधी केजरीवालांचीच समजूत झाली होती. >>> तिकिट न मिळालेल्या काही स्थानिक नेत्यांनासुद्धा समजून सांगा. विनाकारण भाजपच्या ऑफिसवर मोर्चे काढत आहेत, अमित शाह यांच्या विरोधात नारे लावत आहेत, राजिनामा देत आहेत, पक्ष सोडून जात आहेत. कोणत्याही पक्षाच्या बाबतीत तिकीटवाटपाच्या बाबतीत नाराजी ही असतेच. बादवे, कोणते भाजपचे नेते राजीनामा देऊन पक्ष सोडून गेले आहेत? >>> बर्‍याच दिवसांपासून राहूल गांधींना मिस करत होतो, पण किरण बेदी राहूल बाबांची उणीव भासू देत नाहीयेत. उलट राहूल बाबा खूष आहेत आणि प्रार्थना करत आहेत की किरण बेदी दर ५ मिनिटाला कॅमेर्‍यापुढे याव्यात आणि माझे सगळे रेकॉर्ड तुटावेत. केजरीवाल कोणाचीच उणीव भासू देत नाहीत. >>> अगोदर स्वतः केजरीवालला चर्चेचे आवाहन दिले आणि मग ते केजरीवालने स्विकारले तर मॅडम चर्चा करणार नाही म्हणत आहेत. केजरीवाल प्रत्येकालाच चर्चेचे आव्हान देतात आणि समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले की तो मला घाबरला म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक पूर्ववेळ न घेता व कोणाला न कळविता ते थेट गुजरातमध्ये मोदींच्या निवासस्थानी गेले आणि गुजरात मॉडेलविषयी मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे असे सांगून मोदीभेटीचा आग्रह धरला. मोदींच्या सचिवांनी त्यांना वेळ ठरवून भेटण्यास सांगताच लगेच मोदी मला घाबरले असा डंका केजरीवालांनी पिटला होता. >>> तसा मी कोणत्याही पोल किंवा सर्वेला मानत नाही, पण काल-परवा एका वेबसाईटवर (बहुतेक FirstPost) वाचले की दस्तुरखुद्द किरण बेदींना त्यांच्याच मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागेल. (इतकी सेफ सिट घेऊनसुद्धा !) त्या हरतील सुद्धा. ते अशक्य नाही. राजकारणात तशाही त्या नव्या आहेत. दिल्लीत काहीही होऊ शकते. केजरीवालसुद्धा हरू शकतात. >>> असो, इतका भयंकर मास्टरस्ट्रोक खेळल्याबद्दल भाजपचे मनःपूर्वक आभार. हा मास्टरस्ट्रोक होता का फुसका बार होता ते १० फेब्रुवारीला कळे. >>> पूर्ण पोस्टमध्ये ‘आप’ला इतके घालून पाडून बोललात, तरी तुम्हाला आपचे पारडे जड वाटते ? कमाल आहे ब्वा ! मी सद्यस्थिती आणि माझी मते यात गल्लत करीत नाही. >>> तुमचे खूप कन्फ्युजन होत आहे असे दिसतंय. ते कसं काय? >>> तुम्ही पूर्ण पोस्टमध्ये आपवाले कसे चुकीचे होते, आहेत हे दाखवलंय. ते जर खरे असेल तर स्पष्ट बहुमत तर सोडाच, ५ सिट सुद्धा येणार नाहीत आपच्या. माझे व्यक्तीगत मत हे जगातील प्रत्येक व्यक्तीचे मत आहे या भ्रमात मी नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 09:13 नवीन
राज्यपालांची परवानगी नसताना दिल्ली विधानसभेत कोणतेही विधेयक मांडता येत नाही. तरीसुद्धा जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट ते धरून बसेल.
+१. दिल्ली विधानसभेत विधेयक मांडण्यापूर्वी उपराज्यपालांची परवानगी लागते.उपराज्यपालांनी ते विधेयक राष्ट्रपतींकडे रिफर केले तर राष्ट्रपतींची परवानगी असल्याशिवाय दिल्ली विधानसभेत कोणतेही विधेयक मांडता येत नाही.याचे कारण दिल्ली अजूनही १००% राज्य नाही.हे योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा झाला.जोपर्यंत बदलले जात नाहीत तोपर्यंत हे खेळाचे नियम आहेत आणि सर्व खेळाडूंनी खेळाचे नियम मानलेच पाहिजेत.त्यामुळे "मला वाटले" म्हणून मी विधेयक असे सगळे नियम न पाळताच मांडणार वगैरे गोष्टी अयोग्य आहेत. आता तर असे पुढे आले आहे की केजरीवालांनी ते विधेयक उपराज्यपालांकडे परवानगीसाठी पाठवलेच नव्हते.तरीही भाजप आणि काँग्रेस आपल्याला लोकपाल बिल मांडू देत नाहीत म्हणून राजीनामा देऊन पळ काढला.एकूणच काय पळून जायला ते कोणतातरी मुद्दा शोधत होते तो त्यांना लोकपालच्या रूपात मिळाला. पण हे फेसबुकवरील आणि मिपावरील केजरीवाल भक्तांना कोण सांगणार? (स्पष्टीकरणः मला कोणाही राजकारणाच्या समर्थकांना भक्त म्हणायला खरे म्हणजे आवडत नाही.पण गेल्या वर्षा-दीड वर्षात 'मोदी भक्त' हे बिरूद मला इतक्या लोकांनी लावले आहे की मी पण केजरीवाल समर्थक ऐवजी केजरीवाल भक्त म्हणायचे पोएटिक लायसेन्स घेतले :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 11:51 नवीन
http://delhiassembly.nic.in/constitution.htm यातल्या 229AA मधले (3) (c) वाचा. आणि माझा काही गैरसमज झाला असेल तर कृपया दूर करा. If any provision of a law made by the Legislative Assembly with respect to any matter is repugnant to any provision of a law made by Parliament with respect to that matter, whether passed before or after the law made by the Legislative Assembly, or of an earlier law, other than a law made by the Legislative Assembly, then, in either case, the law made by Parliament, or , as the case may be, such earlier law, shall prevail and the law made by the Legislative Assembly shall, to the extent of the repugnancy, be void; Provided that if any such law made by the Legislative Assembly has been reserved for the consideration of the President and has received his assent such law shall prevail in National Capital Territory ; Provided further that nothing in this sub-clause shall prevent Parliament from enacting at any time any law with respect to the same matter including a law adding to, amending, varying or repealing the law so made by the Legislative Assembly. हेसुद्धा वाचा. http://timesofindia.indiatimes.com/india/Soli-Sorabjee-says-no-need-for-Centres-prior-consent-on-Jan-Lokpal/articleshow/30077795.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 14:48 नवीन
Government of National Capital Territory of Delhi Act, 1991 मधील कलम २२(३) प्रमाणे "A Bill which, if enacted and brought into operation, would involve expenditure from the Consolidated Fund of the Capital shall not be passed by the Legislative Assembly unless the Lieutenant Governor has recommended to that Assembly the consideration of the Bill." लोकपाल ही नवीन यंत्रणा तयार करून त्याला पगार देण्यासाठी आणि इतर खर्चांसाठी जी रक्कम खर्च होणार त्यामुळे केजरीवालांचे जनलोकपाल बिल हे मनी बिल होते म्हणून अशी उपराज्यपालांची पूर्वपरवानगी हवी असे केंद्र सरकारचे (सॉलिसिटर जनरलेचे) आणि सुभाष कश्यप यांच्यासारख्या घटनातज्ञांचे मत होते. दुवा . त्यामुळे उपराज्यपालांची पूर्वसंमती गरजेची होती.कायदा पास करण्यात केजरीवालांना इंटरेस्ट असेल तर जी काही पध्दत ठरली असेल त्याप्रमाणेच जायला हवे.सॉलिसिटर जनरलचे मत घेतल्यानंतर उपराज्यपालांची संमती गरजेची होती.अशी संमती गरजेची नाही असे दिल्ली सरकारचे मत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकलेच असते.न्यायालयाने निर्णय दिला असता तर तो मान्य करणे सगळ्यांवरच बंधनकारक असते. दुसरा मतप्रवाह हा की केजरीवालांचे जनलोकपाल बिल हे २०१३ मध्ये संसदेने पास केलेल्या लोकपाल बिलापेक्षा अधिक कडक होते (संसदेच्याच लोकपाल कायद्याला जोकपाल की काहीसे म्ह्टले गेले होते). पण राज्यघटनेच्या कलम २३९ अअ ३(क) प्रमाणे: "If any provision of a law made by the Legislative Assembly with respect to any matter is repugnant to any provision of a law made by Parliament with respect to that matter, whether passed before or after the law made by the Legislative Assembly, or of an earlier law, other than a law made by the Legislative Assembly, then, in either case, the law made by Parliament, or, as the case may be, such earlier law, shall prevail and the law made by the Legislative Assembly shall, to the extent of the repugnancy, be void Provided that if any such law made by the Legislative Assembly has been reserved for the consideration of the President and has received his assent,such law shall prevail in the National Capital Territory " म्हणजे केजरीवालांना कितीही वाटत असले तरी ते जनलोकपाल बिल विधानसभेने पास केले तरी राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कायदा होणे शक्य नव्हते. तेव्हा निर्णयप्रक्रीयेतील सर्व घटकांना सामावून घ्यायची नक्की कोणती तयारी केजरीवालांनी केली होती? निदान राष्ट्रपतींना दिल्ली सरकारकडून असे काही बिल सादर करायचा विचार करत आहोत याची माहिती दिली गेली होती अशी कुठलीच बातमी नव्हती. मग नंतर राष्ट्रपतींनी संमती द्यायला उशीर केला असता तर राष्ट्रपतींनाही भ्रष्ट वगैरे ठरवायला हे सर्वात पुढे असते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 16:31 नवीन
>>> यातल्या 229AA मधले (3) (c) वाचा. आणि माझा काही गैरसमज झाला असेल तर कृपया दूर करा. आपण क्षणभर गृहीत धरू का या तरतुदीचा सोली सोराबजींनी लावलेला अर्थ बरोबर आहे व त्यांच्या मतानुसार जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत मांडण्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही. मग आता हे सांगा की (१) आआप मधील शांतिभूषण व शशीभूषण या नामवंत वकीलांनी असाच अर्थ लावला होता का? कदाचित त्यांनी वेगळा अर्थ लावला असेल आणि म्हणूनच केजरीवाल जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत मांडायला कचरले असतील. पण त्यांनी जर सोली सोराबजींप्रमाणेच अर्थ लावला असेल तर केजरीवालांनी जनलोकपाल विधेयक मंजुरीसाठी दिल्ली विधानसभेत का मांडले नाही? (२) दिल्लीच्या नायब राज्यपालांनी हे विधेयक दिल्ली विधानसभेत मंजुरीसाठी सादर करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यांनी नकार दिला तेव्हाच केजरीवालांनी राजीनामा द्यायला हवा होता. परंतु आपण हुतात्मा झालो असे नाटक त्यांना करायचे होते व त्यातून सहानुभूती मिळवायची होती. त्याही पलिकडचा मुख्य हेतू म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना प्रशासन अजिबात जमत नव्हते व त्यांच्या कारभारातून एक प्रकारची अराजकता निर्माण व्हायला सुरूवात झाली होती. केजरीवालांना काहीही करून सत्तेतून सुटका हवी होती, पण सुटका करून घेताना आपण त्याग करून हुतात्मा झालो असे नाटक करायचे होते. त्यासाठी आपल्या धूर्त व नाटकी स्वभावाला अनुसरून त्यांनी एक नाटक रचले. फेब्रुवारी २०१४ मध्ये दिल्ली विधानसभेत केजरीवालांनी जनलोकपाल विधेयक मंजुरीसाठी सादर न करता त्याऐवजी "हे जनलोकपाल विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी सादर करावे का नाही" या विषयावर विधानसभेत मतदान घेतले. म्हणजे हे मतदान जनलोकपाल या विधेयकावर नव्हते तर हे विधेयक सादर करावे का नाही या प्रश्नावर होते. नायब राज्यपालांची परवानगी नसल्याने दिल्ली विधानसभेतील ५० टक्क्यांहून अधिक आमदारांनी हे विधेयक सादर करू नये या बाजूने मतदान केले. लगेचच केजरीवालांनी जनलोकपालसाठी आपण मुख्यमंत्रीपदावर लाथ मारत आहोत असा आविर्भाव आणून राजीनामा देऊन स्वतःच्याच गोंधळातून त्यांनी सुटका करून घेतली. जर त्यांना खरोखरच जनलोकपाल कायदा हवा होता तर त्यांनी ते विधेयक विधानसभेत मांडून ते मंजुर करून घ्यायला हवे होते. त्याऐवजी हे विधेयक मांडावे की न मांडावे या प्रश्नावर मतदान घेऊन स्वतःची सुटका करून घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
प्रसाद१९७१ Fri, 01/30/2015 - 06:00 नवीन
किरण बेदी दणकुन पडावी ही मनोमन इच्छा. भाजपनी मोठी चुक केली आहे तिला आणुन. स्वताच्या पक्षाच्या लोकांवर पण अन्याय केला आहे. ती बेदी बाई तर पडलीच पाहीजे आणि आप चे सरकार आले तर सोन्याहुन पिवळे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 06:33 नवीन
ज्या पध्दतीने घडामोडी होत आहेत त्यावरून असे वाटत आहे की भाजप आणि आआप यांच्यात खूप चुरशीची लढत होईल आणि या लढाईत आआपचे पारडे थोडे जड आहे.नक्की कोण जिंकेल हे सांगता येणे कठिणच आहे.तरीही दिल्ली स्वीप करणे कोणत्याही पक्षाला कठिणच जाईल.मिळाला तर तो अगदी थोडक्यातला विजय असेल.जर का काँग्रेसने अनपेक्षितपणे २०१३ इतक्या जागा घेतल्या तर २०१३ चीच पुनरावृत्ती नाकारता येणार नाही. मला वाटते की भाजपने दिल्लीत जे काही चालविले आहे ते म्हणजे हातातील उत्तम संधी कशी दवडावी याचे उत्तम उदाहरण ठरेल. १. जुनी विधानसभा बरखास्त करायला मोदी सरकारने इतका वेळ का घेतला हे अनाकलनीय आहे.आणि निर्णय घेतला तो पण कोर्टाने फटकारल्यानंतर.त्यामुळे मतदारांमध्ये असा संदेश गेला की भाजप निवडणुकीला घाबरत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांबरोबर दिल्लीतही मतदान व्हायला हवे होते. एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा धुव्वा उडाला त्यातून सावरायची संधी न मिळताच सहा महिन्यात नव्या निवडणुकांना सामोरे जाणे आआपसाठी सोपे गेले नसते.विनाकारण जास्त उशीर करून मोदी सरकारनेच आआपला सावरायची संधी दिली. मला वाटते की जुनी विधानसभा बरखास्त करण्यात केलेली दिरंगाई भाजपला चांगलीच महागात पडणार आहे. २. १९९८ मध्ये सत्ता गमावल्यापासूनच दिल्ली भाजपमध्ये विजय गोयल, जगदीश मुखी, विजेन्द्र गुप्ता, सतीश उपाध्याय,हर्षवर्धन यांचे गट आहेत.वास्तविक हे सगळे नेते तितकेसे प्रभावशाली नाहीत.या नेत्यांना शीला दिक्षित यांना १५ वर्षांपर्यंत सत्तेतून खाली खेचता आले नव्हते.इतकेच काय तर डिसेंबर २०१३ मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट असतानाही दिल्लीमध्ये मात्र स्वबळावर बहुमत यांना मिळवता आले नव्हते. यापैकी कुणाही एकाला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले असते तर इतर सर्व नेते नाराज झाले असते. पण किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर हे सगळे नेते नाराज झाले आहेत असे आताचे चित्र आहे.असे प्रभावहिन नेते दुखावले गेले तर बहुदा भविष्यात ते पक्षासाठी चांगलेच असेल.पण निवडणुकांपर्यंतच्या शॉर्ट रन मध्ये त्यामुळे पक्षाला फटका बसेल असे दिसते. आजही १६ वर्षे सत्तेबाहेर असून काहीही झाले तरी जिंकायचेच ही 'किलर इन्स्टिन्क्ट' अजूनही भाजपवाल्यांमध्ये दिसत नाही. ३. डिसेंबर २०१३ आणि एप्रिल-मे २०१४ प्रमाणे यावेळीही काँग्रेसने लढाई सुरू होण्यापूर्वीच पराभव मान्य केला आहे असे चित्र आहे.त्यामुळे जी भाजपविरोधी अन्यथा काँग्रेसला मिळाली असती ती बर्‍याच अंशी आआपकडे वळतील.त्यातून भाजपविरोधी मतांचे विभाजन टळेल आणि निवडणुक पक्षाला जड जाईल. ४. विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष लोकसभा निवडणुकांइतकी चांगली कामगिरी करत नाहीत तर प्रादेशिक पक्ष विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात हे आतापर्यंत अनेक वेळा सिध्द झाले आहे. त्यामुळे भाजप यावेळी बॅकफुटवर असणार आहे. त्यातून काँग्रेसच्या मतांवर आआपने डल्ला मारला तर ते एक मोठे तगडे आव्हान ठरेल. ५. लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या जोरदार यशानंतर आणि त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यात मिळालेल्या यशानंतर भाजपवाले थोडे ओव्हर-कॉन्फिडन्समध्ये गेले आहेत. एप्रिल-मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे या भावनेतून पक्षाला जोरदार मते मिळाली.पण दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला पंतप्रधान करायचे हा मुद्दा नसून कुणाला मुख्यमंत्री करायचे हा मुद्दा आहे.तिथे केजरीवाल लोकप्रिय आहेत हे नाकारता येणार नाहीच. नक्की कोण जिंकेल हे जरी सांगता येणे कठिण असले तरी एकंदरीतच भाजप बॅकफूटवर आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Fri, 01/30/2015 - 06:51 नवीन
पूर्ण प्रतिसादाशी सहमत. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच ही निवडणूक झाली असती तर भाजप ला सोपे गेले असते असे दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यात निवडणुकीमध्ये मोठे नेते प्रचाराला उतरत आहेत. एकंदरीतच भाजपची इच्छाशक्ती नाही कि आत्मविश्वास जास्ती आहे हे काही कळत नाही. भाजप थोडासा पिछाडीवर आहे असे दिसते आहे. सामान्य कार्यकर्ते कसा प्रचार करताहेत किंवा लोक मोबीलाइझ होताहेत का हे मात्र सांगणारा कुठला लेख किंवा रिपोर्ट उपलब्ध नाही. टीवी वर या गोष्टी दिसू शकत नाहीत असे वाटते मला. अजून एक मुद्दा महत्वचा आहे. मला वाटते, दिल्ली मध्ये बऱ्याच जागा ह्या चुरशीच्या असतात. थोड्या थोड्या फरकाने चित्र पालटू शकते. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी बूथ लेवल management कसे केले जाते याकडेही बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 08:52 नवीन
सर्वच मुद्द्यांशी सहमत. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. मार्च १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ७ पैकी ६ व काँग्रेसला १ जागा होती. नंतर डिसेंबर १९९८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी फक्त १५ व काँगेसला ५० जागा होत्या. नंतर सप्टेंबर १९९९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ७ पैकी सर्व ७ जागा होत्या. आता डिसेंबर २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप ३२, आआप २८ व काँग्रेस ८ अशी स्थिती होती. परंतु मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सर्व ७ जागा भाजपला होत्या. याचा अर्थ असा नव्हे की फेब्रुवारी २०१५ मध्ये भाजपला ७० पैकी बहुसंख्य जागा मिळतील. दरम्यानच्या काळात आआप पक्ष बर्‍यापैकी सावरला आहे. त्यामुळेच कोणालाच बहुमत न मिळण्याची शक्यता जास्त वाटते. आआपला भाजपच्या तुलनेत २-३ जागा जास्त मिळतील व काँग्रेस ५-६ जागांच्या पुढे जाणार नाही व बहुमत कोणालाच मिळणार नाही असा सध्यातरी अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सिद्धार्थ ४ Fri, 01/30/2015 - 23:06 नवीन
whats your Facebook id. I would love to follow you. thanks.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विटेकर Fri, 01/30/2015 - 07:16 नवीन
आप येणार असेल तर अवघड आहे ! त्यापेक्षा कॉन्ग्रेस आलेली उत्तम ! कोन्ग्रेस्मध्ये थोडिफार "जान" येईल त्यानिमित्ताने . शेळपट आणि कणा गमावलेला विरोधी पक्ष ही लोकशाहिच्या दृष्टीने चिन्तेची बाब आहे. "आप" आल्याने प्रादेशिक पक्षांना पुन्हा बळ येईल. प्रदेशिक पक्ष मुजोर आणि बळकट होणे हे हितावह नाही असा आत्ता पर्यन्तचा अनुभव आहे. दिल्लिचा मतदार सूज्ञ आहे आणि योग्य तेच करेल.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 01/30/2015 - 07:23 नवीन
आआप हा प्रादेशिक पक्ष नाही. तो उगवता पक्ष असल्याने काही ठिकाणी त्याचा जोर अजून इतर ठिकाणांपेक्षा कमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 07:39 नवीन
त्यापेक्षा कॉन्ग्रेस आलेली उत्तम
सहमत. एकूणच आपल्या राजकीय स्पेक्ट्रमवर डाव्या बाजूचे अनेक पक्ष आहेत, काँग्रेससारखा मध्याच्या बर्‍याच जवळचा पण थोडासा डावीकडे झुकणारा पक्षही आहेच.पण उजव्या बाजूला मात्र भाजप हा एकच पक्ष आहे.माझ्यासारखे लोक डाव्या बाजूच्या कोणत्याही पक्षाला मत द्यायचा विचार करूच शकत नाहीत.त्यामुळे एक तर भाजपला मत द्या नाहीतर मतदान करूच नका हे दोनच पर्याय माझ्यासारख्यांपुढे असतात.त्यामुळे उजव्या बाजूला भाजपबरोबर आणखी एक पक्ष जरूर असावा (पूर्वी स्वतंत्र पक्ष होता त्याप्रमाणे) असे मला फार वाटते. अन्यथा भाजपवाले माझ्यासारख्यांना गृहित धरतील--"जाऊन जाऊन जाणार कुठे माझ्यासारखे लोक?आपण काहीही केले तरी हे आपल्यालाच मत देणार" असे भाजपला वाटत असेलही कदाचित.तसे असल्यास ते धोक्याचे आहे. असो.आआपसारख्या morons पेक्षा काँग्रेस कधीही परवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ज
जेपी Sat, 01/31/2015 - 16:13 नवीन
शेंच्युरी निमीत्त, श्रीगुरुजी आणी क्लिंटन यांचा सत्कार एक -एक मफलर,कमळ आणी चरखा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नया है वह Fri, 01/30/2015 - 07:49 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/30/2015 - 08:06 नवीन
त्यापेक्षा कॉन्ग्रेस आलेली उत्तम !
काँग्रेस केव्हाही उत्तमच. पण आता तरी काँग्रेस एकहाती सत्तेवर येईल असं वाटत नाही. त्यामुळे आआप्+काँग्रेस हेच शक्य वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 07:34 नवीन
केजरीवाल दणकून आपटावेत असे मला व्यक्तिश: फार वाटते.हे प्रत्यक्षात होणे फारच कठिण आहे हे दिसतच आहे तरीही मला तसे वाटते त्याची कारणे: १. एकतर केजरीवालांनी दिल्लीचे मुख्यमंत्री असताना जो सावळागोंधळ घातला त्याला तोड नाही. दिल्ली पोलिस हे दिल्ली राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली हवेत ही मागणी कितीही रास्त असली तरी ती मागणी मांडायचे आपल्याच राज्यघटनेत अनेक मार्ग दिले आहेत.४९ दिवसात किती वेळा याविषयी दिल्ली विधानसभेत केजरीवालांनी ठराव पास करून घेतला? यासंबंधी त्यांनी किती वेळा राष्ट्रपती-पंतप्रधान-गृहमंत्री यांना निवेदने दिली?किती वेळा त्यांनी कोर्टात धाव घेतली? आपले म्हणणे कितीही रास्त असले तरी घटनात्मक मार्ग न अवलंबता मुख्यमंत्र्यांनीच धरण्यावर बसणे हे कदापि समर्थनीय नाही.बरं केजरीवाल जुन्या अनुभवांमधून शहाणे झालेत असे वाटत नाही. कालच इथे म्हटल्याप्रमाणे परत सत्तेत आल्यासही धरणे थांबविणार नाही असे केजरीवाल म्हणाल्याची बातमी आहे.त्यातून स्पष्ट दिसते की त्यांच्या पक्षाला सरकार चालविण्याची गंभीर गोष्ट सुट होत नाही तर रस्त्यावर धरणे धरणे, तमाशे करणे हेच मानविते. ज्यावेळी भारत देश हा काही वर्षात जागतिक अर्थकारणात एक अधिक महत्वाची भूमिका बजावू शकेल अशी परिस्थिती असताना आपल्या राजधानीतच अशी नौटंकी अयोग्य ठरेल. विशेषतः बंगालमध्ये १९६० च्या दशकाच्या शेवटी जे रस्त्यावरचे राजकारण चालू होते तेच आपल्या राजधानीत व्हायची शक्यता आहे ही कल्पनाच अगदी शिसारी आणणारी आहे. २. वीजेची बिले न भरणार्‍यांचे मीटर कापले होते ते स्वतः केजरीवालांनी जोडले हा प्रकार मला तरी अत्यंत धोकादायक वाटला.एक तर दिल्लीतील तीन वीज वितरण कंपन्या एन.टी.पी.सी किंवा अन्य वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना विकतात.नक्की किती युनिट कोणाला विकले, कोणत्या दराने विकले इत्यादी सर्व माहिती ऑडीटेड असते. तसेच वीज निर्मिती कंपन्यांनी कोळसा किती रूपयांना विकत घेतला ही माहिती कोल इंडिया लिमिटेडच्या अकाऊंटमध्ये ऑडिटेड असते.मी वीज क्षेत्रात जे काही बघितले आहे त्यावरून सांगतो की वीज निर्मितीमध्ये ६५-७०% इतका खर्च कोळशाचा असतो.तेव्हा यात गफला करायचा असेल तर वीज वितरण कंपन्या, वीज निर्मिती कंपन्या, कोल इंडिया लिमिटेड आणि म्हणून कॅग या सगळ्यांचा गफल्यामध्ये समावेश हवा. वीज मीटर फास्ट करून जास्तीची बिले उकळतात असा दावा असेल तर तो आकड्यांद्वारे सिध्द करायला हवा. वीज वितरण कंपन्यांनी समजा १०० युनिट वीज निर्मिती कंपन्यांकडून खरेदी केले त्यापैकी १५ ते २० युनिट लॉसेस मध्ये गेले हे गृहित धरले तर ८० युनिट विकले जायला हवेत.मीटर फास्ट करून युनिट खरेदी केले १०० पण बिल घेतले १२० युनिटचे असे झाल्यास ते आकड्यात नक्कीच पकडता येईल. मनसेसारख्या गुडघ्यातल्या पक्षानेही त्यांच्या ब्लू-प्रिंटमध्ये आकडेवारीनिशी त्यांचा मुद्दा मांडला होता.तसा कोणताही प्रयत्न आआपकडून झालेला नाही.जो काही चालला आहे तो हवेतला गोळीबार. ३. अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ इत्यादी समाजवादी धोरणे अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मला अजिबात मान्य नाहीत.दिल्लीत शीला दिक्षित यांनी १५ वर्षे अर्थकारण नक्कीच चांगले सांभाळले होते. वीज कंपन्यांचीच २००१-०२ मध्ये स्थिती होती त्यापेक्षा बरीच चांगली स्थिती २०१३ मध्ये होती. पण आआपने एकदा ती सुरवात केली म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांना तसे आश्वासन देणे भाग झाले.अन्यथा त्या मुद्द्यावर रान उठवून मतांची झोळी भरायचा प्रयत्न आआप करणारच.लोकांना फुकट द्यायची सवय लावायची की त्या गोष्टी स्वकष्टाने मिळवता येतील यासाठी सक्षम बनवायचे?समजा लोकांना ती समज नसेल तर राजकीय पक्षांना तरी ती समज असलीच पाहिजे.त्यामुळे पहिल्यांदा जो पक्ष असे फुकट वाटायची आश्वासने देतो त्या पक्षालाच मी व्यक्तिशः या प्रकारासाठी जबाबदार धरतो. ४. केजरीवाल (आणि त्यांचे फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणचे समर्थक) हे हिट अ‍ॅन्ड रन करण्यात अगदी एक्सपर्ट आहेत.नितीन गडकरी हे भारतातील सगळ्यात भ्रष्ट राजकारणी आहेत असा केजरीवालांनी दावा केला.गडकरी त्याविरूध्द कोर्टात गेल्यावर मग सारख्या पुढच्या तारखा केजरीवाल का मागत होते? त्यांच्याकडे जो काही पुरावा असेल तो त्यांनी द्यायचा ना मग गडकरींविरूध्द कारवाई करा ही मागणी अनेकांप्रमाणे मीपण केली असती.मग आठवडाभर तुरूंगात राहायचे नाटक झाले.मग मी जामिनच भरणार नाही हे नाटक झाले.बाकी काही नाही पण या भयंकर नाटकीपणामुळे आणि ढोंगीपणामुळे तो मनुष्य अगदी प्रचंड डोक्यात जातो. अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे पुरावे थोडीच मिळतात असे कोणी विचारत असेल तर त्यांना फाट्यावर मारण्यात येत आहे. (अगदी असेच खैरनार समर्थकांना १९९४ मध्ये फाट्यावर मारले होते :) ) ५. केजरीवालांच्या पक्षात एकवाक्यता आहे का? सोमनाथ भारतींच्या त्या रेडनंतर एक दाक्षिणात्य महिला (नाव लक्षात नाही पण त्या पक्षाच्या स्थापकांपैकी एक होत्या) सोडून गेल्या. निवडणुकांना १५ दिवस राहिलेले असताना पक्षाला सर्वात जास्त देणगी देणारे शांती भूषण केजरीवालांनाच पदावरून दूर करा असे म्हणतात आणि किरण बेदींचे कौतुक करतात. मागच्या वर्षी टीना शर्मा नामक नेत्याने भर टिव्हीवर आआपच्या प्रवक्त्याच्या श्रीमुखातच लगावली. डिसेंबर २०१३ मध्ये निवडून आलेल्या २८ पैकी ३-४ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. केजरीवालांचे कित्येक वर्षांपासूनचे सहकारी अश्वनी उपाध्याय त्यांना सोडून भाजपमध्येच गेले.अरे काय चालू काय आहे? एकतर तुम्हाला रस्त्यावर उतरण्यात जास्त इंटरेस्ट आणि वर तुम्ही आपापसात भांड भांड भांडणार.मग तुम्ही चांगले सरकार द्याल यावर लोकांनी का विश्वास ठेवावा? यावर इतर सगळ्या पक्षांमध्येही असेच चालते असे कृपया म्हणू नका.इतर कोणत्याही पक्षात पक्षाच्या आकाराच्या ५०% पेक्षा जास्त भांडणे नसतात. ६. आम्ही तेवढे प्रामाणिक आणि बाकी अलम दुनिया भ्रष्ट हा होलिअर दॅन दाऊ अ‍ॅटिट्यूड आणखी डोक्यात जातो.म्हणजे ज्या किरण बेदींना तुम्हीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनविणार होतात त्याच किरण बेदी दुसर्‍या पक्षात गेल्या तर त्या लगेच संधीसाधू बनतात!! मी प्रामाणिकच आहे हा दावा अगदी लालूसुध्दा करतात.भारतातील कोणताही नेता "हो मी भ्रष्ट आहे" असे म्हणूच शकणार नाही.तेव्हा नेता स्वतःविषयी जे दावे करतो त्याला माझ्या लेखी अगदी शून्य किंमत आहे.प्रत्यक्षात तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय्?आय.आर.एस मध्ये अधिकारी असताना केजरीवालांनी एकही टॅक्सविषयी धाड टाकली नव्हती की त्यांची एकदाही बदली झाली नव्हती असे अनेकवेळी सामोरे आले आहेच.मग तुम्ही प्रामाणिक असे म्हणता त्याला काय आधार? जर मुख्यमंत्री झाल्यानंतर चार दिवसात वीजविले अर्धी करू शकत होतात तर मग शीला दिक्षितांविरूध्द तुमच्याकडेच असलेल्या ३७० पानी आरोपपत्रानुसार कारवाई नव्हती सुरू करता येत्?त्यावेळी शहाजोगपणे म्हणायचे की हर्षवर्धन यांनी पुरावे आणावेत मग आम्ही कारवाई करू. ३७० पानी आरोपपत्राचा उल्लेख कोणी केला होता?मग पुरावे हर्षवर्धन यांच्याकडे कशाला मागता? ७. तुमच्या पक्षात हुर्रियत कॉन्फरन्समध्ये फूट पडल्यामुळे काश्मीरातील 'भारतीय स्टेट' विरूध्दचा लढा कमजोर झाला म्हणून अश्रू ढाळणारे, पूर्ण भारतीय कायद्यानुसार अफजलला फाशी देऊनही त्याविरूध्द गरळ ओकणारे नेते आहेत. त्याविषयी तुमची भूमिका संदिग्धच राहिली आहे.तीन चारशे रूपये वीजेचे बिल कमी यावे म्हणून अशा पक्षाला समर्थन देऊन माझ्या देशाच्याच इंटरेस्टविरूध्द मी जाऊ शकणार नाही. सॉरी. एकूणच काय की आआप दिल्लीत जिंकल्यास हे आआप स्टाईल moronism (मराठी शब्द?) पूर्ण देशभर वाढीला लागेल-- म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो त्याचे नक्कीच दु:ख आहे. या पक्षाला मिडीयाने विनाकारण मोठे केले आहे. इनमिन यांचे लोकसभेत खासदार किती? चार. शिवसेनेचे १८ खासदार आहेत. इतर अनेक पक्षांचे यांच्यापेक्षा बरेच जास्त खासदार आहेत.तरीही कोणत्याही राष्ट्रीय महत्वाच्या चर्चेत इतर पक्षांना दरवेळी मिडियात स्थान असतेच असे नाही पण आआपवाले मात्र हटकून असतात. त्यांच्यातील सगळेच लोक डोक्यात जातात पण आशिष खैतान आणि आशुतोष हे विशेष. आम्ही म्ह़णजे कोण आणि बाकी सगळी दुनिया भ्रष्ट हा दर्प त्यांच्या बोलण्यातून अगदी शब्दाशब्दाला जाणवतो. या असल्या अहंमन्य पक्षाचा अगदी दणदणीत पराभव व्हावा असे मनोमन वाटते.तसे होणे कठिण आहे हे दिसतच आहे तरी मी माझा विरोध सोडणार नाही.आआप सत्तेत आल्यास मात्र फेसबुक आणि मिसळपाववरील दिल्ली विधानसभेतील विरोधीपक्ष नेता मीच. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत (याच ठरावावर वाजपेयी सरकार एका मताने पडले होते) सोमनाथ चॅटर्जी म्हणाले होते: "What is our obligation to keep BJP in power?" त्याच धर्तीवर मी म्हणतो "What is my obligation to support AAP?" विशेषतः समाजवादी आणि डाव्यांना वेळोवेळी असे कोणीतरी मसिहे हवे असतात तो त्यांना केजरीवालांच्या स्वरूपात मिळाला आहे हे फेसबुकवर जाणवतच आहे.आणि असल्या समाजवादी आणि डाव्यांना माझा अगदी कट्टर विरोध आहे.त्यामुळे केजरीवालांना विरोध करायचे आणखी एक कारण मला मिळाले आहे. (आआपला विरोध करणे म्हणजे भ्रष्ट असल्याचे लक्षण असल्यास जगातील सर्वात भ्रष्ट माणूस आणि त्याविषयी जाज्वल्य अभिमान असलेला) क्लिंटन
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 01/30/2015 - 07:44 नवीन
शतप्रतिशत सहमत ! वाक्यावाक्याला टाळ्या !!अगदी अगदी हेच मत माझे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 07:59 नवीन
+ ९९९९९.... जबरदस्त प्रतिसाद! काल मी हा धागा सुरू केल्यावर काही मिनिटातच लॉगऑफ झालो होतो. आज सकाळी भारत वि. इंग्लंड सामना बघायचा असल्याने सकाळपासून आंतरजालावर आलोच नाही. भारताची दाणादाण उडून ९ बाद झाल्यावर पुढे सामना न बघता आताच इथे आलो आणि इथले अनेक प्रतिसाद पाहून चकीत झालो. सर्वांना एकत्रित उत्तर द्यावे की प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर द्यावे याचा विचार सुरू असतानाच तुमचा हा शेवटचा प्रतिसाद वाचला. तुमच्या प्रतिसादात बर्‍याच सभासदांना आपोआप उत्तर दिले गेले आहे. त्यामुळे मी वेगळे उत्तर देण्याची गरज नाही. अर्थात तुमच्याइतके मुद्देसूद लिहिणे मला जमले नसते हे मान्य करतो. डिसेंबर २०१३ मधील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकात राजस्थान, म.प्र. आणि छत्तीसगड या राज्यात भाजप सत्तेवर यावा व दिल्लीत आआपची सत्ता यावी अशी माझी इच्छा होती. दिल्लीत कोणालाच बहुमत मिळाले नाही. परंतु निकाल लागल्यानंतरचे २० दिवस व नंतरचे ४९ दिवस केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जो तमाशा केला त्यामुळे या पक्षात काहीही अर्थ नाही हे लक्षात आले. हे मत अजूनही कायम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नया है वह Fri, 01/30/2015 - 08:01 नवीन
आप म्हणजे अराजक असे काहिसे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अजया Fri, 01/30/2015 - 09:33 नवीन
@क्लिंटन-अतिशय आवडला आणि पटला प्रतिसाद! @श्रीगुरुजी -या धाग्याची वाटच पहात होते.चर्चा वाचायची होतीच पण तुमची आणि अरे माईची जुगलबंदी वाचण्यासाठी सुध्दा.माईचे हे बरे आहेत ना? तशी गप्पच वाटली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा