Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 17:57 नवीन
हा नेहमीप्रमाणे तुम्ही विनोदी स्वभावाने टाकलेला खुसखुशीत विनोदी समजतो. :) ;) तेव्हा खालचा मजकूर फक्त इतरांचा गैरसमज होणार नाही याकरिता... जीडीपी काय केवळ एकच "अकऊंटिंग हेड" असलेला हिशेब नसतो. त्यातली काही हेड्स सद्या खाली गेलेली आहेत हे तर सरकार केव्हापासून म्हणतेय. त्याचबरोबर, अनेक हेड्स या कारवाईमुळे व कारवाईशी संबंध नसलेल्या खरीपाच्या उत्तम उत्पन्नाच्या कामगिरीमुळे वर गेलेली आहेत, हे पण सांगितले जात होते. मिपावरचे मागचे प्रतिसाद चाळले तर त्यांचा माझ्यासकट इतर काही जणांनी उल्लेख केला होता असे दिसेल. त्यावेळेस नोटाबंदीला विरोध असणार्‍यांने ते "अंधभक्ती" इ इ बरेच काही वाटले. ते असो. मुख्य म्हणजे वर जाणार्‍या आणि खाली येण्यार्‍या अश्या सगळ्या हेड्सची गोळाबेरिज करून जीजीपीचा आकडा बनतो. म्हणजेच एखादे हेड 'क्ष' ने कमी झाले पण दुसरे हेड "क्ष+य" ने वाढले तर गोळाबेरीजेत जीडीपी "य" ने वाढलेली दिसेल. माझे वरचे प्रतिसाद थत्तेचाचांनी नीट वाचले असते, तर त्यांना अशी कोणती वर जाणारी हेड्स असू शकतात याबाबत मी लिहिलेले आहे ते सहज दिसले असते. थत्तेचाचांसारख्या माहितगाराला हे माहित नाही असे थोडेच आहे ? पण, त्यांचा स्वभावच फारच विनोदी बुवा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 03/05/2017 - 04:07 नवीन
इथे लिहिले आहे त्याचे काही स्पष्टीकरण आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते Sun, 03/05/2017 - 04:10 नवीन
त्यातलं every bank employee was stocking ATMs एवढंच घेऊन मुद्दे खोडायचा प्रयत्न करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/05/2017 - 08:06 नवीन
थत्तेकाका, तुम्ही तज्ज्ञ आहात हे सगळेजण जाणून आहेतच. पण, हे मिपा आहे शाळा नाही. तेव्हा, इथे शंकासुरासारखे नुसते प्रश्नामागून प्रश्न उभे करण्याऐवजी किंवा (जालावर भरपूर उपलब्ध असलेल्यापैकी काही) कॉपी-पेस्ट करण्याऐवजी तुम्ही तुमचे ज्ञान, विश्लेषण, स्पष्टीकरण, इत्यादी लोकांसमोर उघड करणे अपेक्षित आहे, तरच त्याला चर्चा म्हणता येईल आणि तुमच्या प्रगाढ ज्ञानाचा फायदा इतरांना होईल. काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/06/2017 - 03:57 नवीन
म्हणजे काही स्पष्टीकरण नाही तर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मोदक Mon, 03/06/2017 - 06:56 नवीन
तुम्ही नेहमी स्पष्टीकरणे देत असलात तरच हे बोलू शकता.. अन्यथा आलूची फॅक्टरी आहेच.. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सचु कुळकर्णी Tue, 03/07/2017 - 15:15 नवीन
त्याच्या जोडिला आता "नारीयल का ज्युस" पण आहे रे मोदका :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 03/07/2017 - 19:35 नवीन
शहजादे साहेब नक्की "नारीयलका ज्युस" म्हणाले का "पाईनॅपलका ज्युस" म्हणाले..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/08/2017 - 08:46 नवीन
राहुल गांधी असे काहीही म्हणाले नाहीत असे व्हिडीओज बघून तरी दिसते आहे. मोदींनी प्रचारसभांमध्ये भाषण करताना पातळी सोडू नये असे वाटते. केजरीवालांकडे दुर्लक्ष करू शकणारे मोदी राहुल गांधींबाबत का दुर्लक्ष करू शकत नाहीत काय माहित! प्रचारसभांमधील मोदी मला वैयक्तिकरित्या विशेष आवडत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पुंबा गुरुवार, 03/09/2017 - 09:04 नवीन
चारसभांमधील मोदी मला वैयक्तिकरित्या विशेष आवडत नाहीत.
खरोखर. लोकांचा उत्साह पाहून बहकून जात असतील असे वाटते कधी कधी प्रचारसभांतील भाषणे ऐकताना. मन की बात च्या वेळेला जो पॉईज, तरल भाषा, आणि सुचक टीका असते त्यामानाने प्रचारसभांतील मोदींची भाषा सवंग वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/06/2017 - 19:09 नवीन
थत्ते काका , किती वेळ शंकाकुशंकांच्या मागे लपून राहणार ? इतके काय घाबरता स्वतःची मते, स्पष्टीकरणे आणि विश्लेषणे लिहायला ?! जरा धीर करा आणि लिहा. होतील काही चुका. पण तुम्ही पण माणुसच आहात हे जाणतात हो मिपाकर. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मार्मिक गोडसे Fri, 03/03/2017 - 20:20 नवीन
३. वर उद्धृत केलेल्या आरोपांपैकी दुसर्‍या वचनामधिल "तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे" हा पुराव्याविना केलेला दावा/आरोप तर मी मूळ प्रतिसादात दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्राच्या संदर्भदुव्यातील मजकूरावरून धडधडीत असत्य दिसत आहे. 11 Jan 2017 - 2:42 pm | डॉ सुहास म्हात्रे सहमत. याशिवाय... डिमॉनेटायझेशनमुळे, नकदीने (आणि बहुदा काळ्या पैश्याने) होणारी खरेदी, उदा... (अ) लक्झरी गाड्या, (आ) लक्झरी सदनिका किंवा गुंतवणूक म्हणुन घेतलेल्या अतिरिक्त सदनिका, (इ) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेली जमीन, (ई) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेले सोने, (उ) भरमसाठ किमतीच्या आणि/किंवा चैनिच्या वस्तू, इत्यादींची विक्री कमी होणार हे नक्की होतेच. अश्या विक्रीने होणार्‍या जीडीपीतील वाढीला वाढ न म्हणता सूज म्हणतात. कारण त्यामुळे फक्त काळ्या संपत्तीचे व्यवहार वाढतात, पण त्याचा नोकर्‍या वाढण्यावर किंवा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात लक्षणिय फायदा होण्यावर काहीच सकारात्मक फरक पडत नाही... किंबहुना अश्या व्यवहारांत भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याने देशावर नकारात्मकच परिणाम होतात. गेली काही वर्षे जीडीपीचा दर सतत वर असूनही अनेक रेटिंग एजन्सीज भारताच्या पतीचा दर त्या प्रमाणात वाढवत नव्हत्या त्यामागे हे महत्वाचे कारण होते. त्याविरुद्ध, आता बँकात जास्त पैसा खेळू लागल्याने सरकारी प्रकल्प, उद्योगधंदे आणि व्यवसाय इत्यादींना तो सुलभ दराने उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे नवीन नोकर्‍या निर्माण होतील व जास्त पैसा खेळता राहील. त्यातच सर्वसामान्य माणसांना मिळणार्‍या कमी दराच्या सुलभ कर्जाची भर पडली आहे/पडत राहणार आहे. अर्थातच, छोट्या/मध्यम आकाराच्या गाड्या, कमी/मध्यम किमतीची घरे, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातल्या वस्तू, इत्यादींची विक्री वाढेल. लक्झरी गाड्या/सदनिका/वस्तू यांच्यापेक्षा नवीन विक्रीची "दर नग किंमत" कमी असली तरी एकूण नगांची संख्या अनेक पटींनी जास्त असेल. याचा (किंमत X नग) परिणाम म्हणून, येत्या ३ ते ४ तिमाहींत, जीडीपीत "वाढ" (सूज नव्हे !) होण्यात होईल. यामध्ये अजून एक महत्वाचे परिणाम विसरले जात आहे. असंघटीत असलेले व्यवसाय आणि छोटेमोठे उद्योग यांच्या उत्पादन/सेवेचा अंदाज लावणे शक्य नसल्याने जीडीपी ठरवताना एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते किंवा त्यांच्या उत्पादन/सेवेची अंदाजपंचे कमीत कमी किंमत धरली जात असे. आता, डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या उत्पादन/सेवेची खरी किंमत जमेस धरणे जास्त सुलभ होईल. वर म्हटल्याप्रमाणेच, अश्या प्रत्येक व्यवसाय/उद्योगाचे उत्पन्न तुलनेने कमी (वार्षिक काही लाख) असले तरी भारतभरचे असे सर्व व्यवसाय दशलक्षांच्या संखेत आहेत... जीडीपीतले त्यांचे योगदान लक्षणिय असणार आहे. मुख्य म्हणजे, यापुढची नवीन वाढ सर्वसामान्य लोकांच्या हाती जास्त पैसा खेळू लागल्याने होणार आहे... श्रीमंत जास्त श्रीमंत झाल्यामुळे नाही. अर्थातच, ही वाढ लोकाभिमूख आणि म्हणुनच निरोगी वाढ असेल. किंबहुना, अश्या वाढीचा दर पूर्वीच्या सूजेपेक्षा कमी असला तरी तो देशाच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचाच राहील. आणि त्यामुळे भारताची पत रेटिंग एजन्सींनी पूर्वीपेक्षा जास्त वाढवली तर आश्चर्य वाटायला नको. डिमॉनेटायझेशनमुळे, नकदीने (आणि बहुदा काळ्या पैश्याने) होणारी खरेदी, उदा... (अ) लक्झरी गाड्या, (आ) लक्झरी सदनिका किंवा गुंतवणूक म्हणुन घेतलेल्या अतिरिक्त सदनिका, (इ) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेली जमीन, (ई) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेले सोने, (उ) भरमसाठ किमतीच्या आणि/किंवा चैनिच्या वस्तू, इत्यादींची विक्री कमी होणार हे नक्की होतेच. पूर्वी काळ्या पैशानी ही विक्री होत होती तर जीडीपीत त्याने वाढ कशी व्हायची? ह्याचा अर्थ काळ्या पैशाच्या खरेदी विक्रीमुळे सरकारचा महसूल बुडत नव्ह्ता. मग नोटाबंदी कशासाठी केली. त्यांची ती सूज आणि आता झाली ती वाढ? यामध्ये अजून एक महत्वाचे परिणाम विसरले जात आहे. असंघटीत असलेले व्यवसाय आणि छोटेमोठे उद्योग यांच्या उत्पादन/सेवेचा अंदाज लावणे शक्य नसल्याने जीडीपी ठरवताना एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते किंवा त्यांच्या उत्पादन/सेवेची अंदाजपंचे कमीत कमी किंमत धरली जात असे. आता, डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या उत्पादन/सेवेची खरी किंमत जमेस धरणे जास्त सुलभ होईल. वर म्हटल्याप्रमाणेच, अश्या प्रत्येक व्यवसाय/उद्योगाचे उत्पन्न तुलनेने कमी (वार्षिक काही लाख) असले तरी भारतभरचे असे सर्व व्यवसाय दशलक्षांच्या संखेत आहेत... जीडीपीतले त्यांचे योगदान लक्षणिय असणार आहे. नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत क्षेत्राला फटका बसल्यामुळे जीडीपीत घट होणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 11:47 नवीन
पूर्वी काळ्या पैशानी ही विक्री होत होती तर जीडीपीत त्याने वाढ कशी व्हायची? ह्याचा अर्थ काळ्या पैशाच्या खरेदी विक्रीमुळे सरकारचा महसूल बुडत नव्ह्ता. मग नोटाबंदी कशासाठी केली. त्यांची ती सूज आणि आता झाली ती वाढ? आता दिसणारी जीडीपीतील अपेक्षेपेक्षा कमी तूट होण्यामागे अभूतपुर्व करसंकलन व उत्तम खरीपाच्या उत्पन्नाचे खात्रीने हाती आलेले आकडे आहेत, हे मी पूर्वीच्या एका प्रतिसादांत लिहिले होते... त्याला काहींनी आक्षेप घेतला होता. पण ते असोच. उत्तम करसंकलन हे कारण पुढच्या तिमाहीत लक्षणीयरित्या (कारण चवथ्या तिमाहित सर्वात जास्त करसंकलन होते, यावेळेस तर खूप मोठे मासे गळाला लागलेले आहेत) व त्यानंतर कायमस्वरूपी (कारण एकदा करव्यवस्थेत आल्यावर संपूर्ण करमुक्तता दाखवणे सोपे नाही) जीडीपी वर नेण्यास, तेवढेच किंवा कांकणभार जास्तच मदत करेल; असे माझे मत आहे. बँकांत आणि सरकारच्या हाती खेळणार्‍या पैश्याचा विनियोग पायाभूत सुविधा आणि संसाधन उभे करण्यात होईल व त्यामुळे व्यापार-उद्योगधंदे-रोजगार यांना चालना मिळेल. अर्थातच त्याचेही अनेक सकारत्मक रिपल इफेक्ट्स सपोर्टींग /सप्लाइंग उद्योगांवर होतात. हे सर्वच घटक जीडीपी वाढीस मदत करतात. मात्र, ही जीडीपीतील (वैध कृतींनी झालेली) वाढ असेल, (काळ्या पैश्यांचा सहभाग असलेल्या कृतींनी आलेली) सूज नाही. हा फरक अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे ! *************** महसूल प्रक्रियेसंबंधीचा तुमचा प्रश्न लहान आहे पण वास्तव व त्यावर अवलम्बून असलेले उत्तर किचकट आहे. ते समजायला ती प्रक्रिया जराश्या खोलात जाऊन पहायला पाहिजे. समजा कॅशमध्ये गाडी/जमीन/फ्लॅट विकत घेणारा काळा पैसा वापरत आहे... १. विकणार्‍याच्या कृतीचे परिणाम : अ) विकणारा 'नोंदणीकृत संस्था (कंपनी)' असल्यास : कंपनीला त्यांच्या विक्रीतून आलेला सर्व (कॅश/चेकने आलेला) पैसा त्यांचे उत्पन्नच दाखवणे भाग असते. तेव्हा त्यांना काळा पैसा निर्माण करणे शक्य नाही. म्हणजे जेवढी विक्रिची किंमत तेवढी सर्व जीडीपीत सामील होऊन तिची वाढ होते... त्यातील काळ्या पैशाच्या भागामुळे होणार्‍या वाढीला ती बेकायदेशीर कृतीने झालेली असल्याने वाढ न म्हणता सूज म्हणतात. कारण इथे ती वाढ दिसत असली तरी तिने इतर ठिकाणी (यापुढे ठळक केलेल्या शब्दांत दाखविल्याप्रमाणे) बेकायदेशीररित्या सरकारी उत्पन्न बुडवलेले असते. आ) विकणारा 'व्यक्ती' असल्यास : कॅशची देवाणघेवाण होऊन एकाकडचा काळा पैसा दुसर्‍याच्या हाती जाईल... म्हणजे देणार्‍याने पूर्वी त्यावरचा आयकर चुकवला होता आणि आता विकणारा त्याचे उत्पन्न लपवून आयकर चुकवेल, म्हणजे सरकारचा दुहेरी तोटा झाला. २. विकत घेणार्‍याच्या कृतीचे परिणाम : नोंदणीकृत कंपनीकडून विकत घेणारा जर सर्व किंवा काही प्रमाणात काळा पैसा वापरत असेल तर... ते शोधून काढणे व सिद्ध करणे, करविभागाने पुरावे जमा करून, जप्ती आणून, "त्याच्याकडे ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती आहे", हे सिद्ध केल्याशिवाय (उदा: जयललिता प्रकरण) शक्य नसते. ही प्रक्रिया किती किचकट व म्हणूनच विरळा आहे ते सांगायला नकोच. या प्रकारात, त्या विकत घेणार्‍याने त्याच्या काळ्या पैश्याच्या प्रमाणात सरकारकडे त्याने भरायला हवा होता तो आयकर भरला नाही (ज्यामुळे तो पैसा काळा आहे असे आपण म्हणतो), तेवढेसरकारचे उत्पन्न बुडाले. ३. सरकारी विक्रिकर, रजिस्ट्रेशन फी, इत्यादीवर होणारा परिणाम : अ) जेव्हा जेव्हा विक्रीचे मुल्य कमी दाखवले जाते (जमीन/फ्लॅट व्यवहारंत) तेव्हा लपवलेल्या किमतीच्या प्रमाणात सरकारी कर बुडवला जातो. आ) नोंदणीकृत संस्थांकडून विकत घेतलेल्या गाड्यांच्या संबंधातले कर चुकवणे कठीण असते. यावरून सहज ध्यानात येईल की कॅशच्या व्यवहारांत गाड्या विकणार्‍या नोंदणीकृत संस्था सोडून इतरांना काळा पैसा तयार करणे व फिरवत ठेवणे आणि त्यामधून सरकारी कर चुकवणे (म्हणजे पर्यायाने तुमचे आमचेच नुकसान करणे) सहज शक्य होते. नवीन कायद्यांमुळे कॅश व्यवहारांवर येणार्‍या सीमांमुळे हे बहुतांश टाळता येणे शक्य होईल. त्यामुळे, जो काही जीडीपीचा आकडा असेल तो निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण. आता, कॅश व्यवहारांवर बंधने आल्याने काळा पैसा वापरता न आल्याने विशेषतः चैनीच्या (लक्झरी) वस्तूंची (उदा: महागड्या गाड्या/जमिनी/करोडोंच्या किमतींचे फ्लॅट्स/इ) खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीडीपी कमी होईल. त्यावरचा उपाय म्हणून सरकारने काही योजना अगोदरच जाहीर केल्या आहेत : १. कमी किमतीच्या घरांच्यावर व्याजदरात सूट. २. बँकांच्या सर्वसाधारण करांचे दर खाली आणणे, इ नंतर अजून अनेक उपाय येण्याची शक्यता आहे. याने खाली दिल्याप्रमाने निरोगी जीडीपी वाढीला मदत होईलच, बहुसंख्य जनतेच्या जनतेच्या जीवनमानावर सकारत्मक परिणाम होतील... १. कमी / तुलनेने कमी किमतीच्या घरांची/गाड्यांची जरूर असलेल्या लोकांची संख्या लाखांत/करोडोत आहे. त्यांना घर/गाडी घेणे सुलभ झाले तर त्यांच्यामुळे झालेली जीडीपीतली वाढ लक्षणीय आणि मुख्य म्हणजे निरोगी वाढ असेल. मोजक्या संखेत विकल्या जाणार्‍या लक्झरी वस्तूंच्या विक्रितून आलेल्या सूजेला ती नजिकच्या काळात ओलांडेल असे आडाखे आहेत. २. सर्वसामान्यांच्या वाढलेल्या (घर/गाडी, इ) मागणीमुळे, त्या वस्तू तयार करणार्‍या उद्योगांना चालना मिळेल. अर्थात त्यातले रोजगार वाढतील. याला रिपल इफेक्ट्स म्हणतात. ३. मुख्य म्हणजे, या सर्व कारवाईमुळे आवश्यक गरजा सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात येण्यास मदत होईल... जे कोणत्याही जनताभिमुख सरकारचे प्रथम कर्तव्य असते. विषय किचकट आणि अनेक एकमेकात गुंतलेल्या कृती-परिणामांचा आहे. थोडक्यात सगळे सांगणे शक्य नाहीच. जेवढे सोपे करून आणि कमी शब्दांत *************** जीडीपी वाढ आणि सूज यामुळे जनतेवर होणार्‍या परिणामांतला कळीचा फरक : वैध कृतींमुळे जीडीपीमध्ये झालेली वाढ, आपल्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर सकारत्मक फरक घडवून आणते... त्याविरुद्ध अवैध कृतींमुळे जीडीपीमध्ये आलेली सूज, बलस्थानांशी संबंधीत मोजक्या लोकांच्या हितसंबधांमध्ये वाढ करत राहते. *************** येत्या वर्षभरात प्रत्यक्ष परिणाम पुढे पुढे येत जातील आणि मग इतर गोष्टी स्पष्ट करून सांगायची गरज उरणार नाही असा माझा अंदाज आहे. त्यामुळे, आता इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मोदक Sat, 03/04/2017 - 12:00 नवीन
(चच्चा मोड ऑन) पण २००२ ला दंगल झालीच ना..?? (चच्चा मोड ऑफ) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते Sat, 03/04/2017 - 15:47 नवीन
येथे चच्चा म्हणजे माझ्याकडे निर्देश असेल तर माझा या प्रश्नाची कुठलाही संबंध नाही. मी नोटाबंदीचा २००२ च्या दंगलींशी संबंध जोडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 03/04/2017 - 18:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 13:09 नवीन
नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत क्षेत्राला फटका बसल्यामुळे जीडीपीत घट होणार नाही का? १. हा फटका बसला यात वाद नाही पण तो विरोधकांनी केलेल्या दाव्यांइतका भयानक वगैरे नव्हता. कारण... अ) या क्षेत्रातल्या लोकांना निषेधमोर्चांत आणणे तुलनेने फार सोपे असते. विरोधकांच्या कसोशिच्या प्रयत्नांनंतरही त्यांना ते करणे जमले नाही. आ) नोटाबंदीनंतरचे निवडणूकींचे निर्णय. गाजावाजा केला गेला तेवढा लोकक्षोभ असता तर भाजप आतापर्यंत गारद व्हायला हवा होता ! तेव्हा अधिक विश्लेषणाची गरज नाही. २. असंघटीत क्षेत्राचे जीडीपीतील योगदान : अ) काटेकोर मोजमापच कधी घेतले गेलेले नाही कारण कॅश अर्थव्यवस्थेत ते अशक्यच होते. अर्थात, असंघटीत क्षेत्राचा जीडीपीतला हिस्सा केवळ एक दुरान्वयाने ठरवलेली रक्कम असते. यासाठी, अपोर्शन्ड, जक्स्ट्रापोलेटेड, एस्टीमेटेड, इ इ इ सरकारी शब्द आहेत; पण सगळ्यांचा अर्थ एकच : "नक्की माहीत नाही. सगळा अंदाजपंचे व्यवहार आहे !". आख्खा भारत देश सोडाच, "केवळ तुम्ही राहत असलेल्या शहरातला किंवा अगदी तुमच्याच उपनगरातल्या असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍या (रोख पैसे घेऊन गरज पडेल तसे किंवा दिवसाच्या/महिन्याच्या बोलीवर घरात/व्यवसायात/उद्योगधंद्यांत काम करणार्‍या) लोकांचे एकूण वार्षीक उत्पन्न किती आहे याची तुम्ही मोजदाद करत आहात अशी कल्पना करा", मग मला काय म्हणायचे आहे त्याची बरीचशी कल्पना येईल ! या प्रक्रियेची तोंडोळख करून घ्यायची असल्यास इथून सुरुवात करायला हरकत नाही : http://nceuis.nic.in/Final_Booklet_Working_Paper_2.pdf सगळे मुद्दे माहित करून घ्यायला अजून खूप वाचन जालावरही मिळल. आ) वरच्या परिस्थितीमुळे, असंघटीत क्षेत्रामध्ये अनेक गैरप्रकार चालतात व कामगारांची पिळवणूक होते हे काही गुपीत नाही. त्या क्षेत्रात पहिले तर आयकर चुकविण्यासाठी हिशेबच ठेवले जात नाहीत आणि आयकर विवरण भरले जात नाही. जेथे हिशेब ठेवले जातात तेथे कामगाराला हिशेबात दाखविलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जाण्याचे प्रमाण लक्षणिय आहे; म्हणजे व्यय कृत्रिमरित्या वाढवून फायदा कमी दाखवायचा आणि आयकर कमी भरायचा, हे नेहमीच होते. इ) यापुढे, या क्षेत्रातही बँक/डिजिटल पद्धती वापरणे सक्तीचे करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हे १००% करणे अशक्य आहे. परंतू, बहुतांश असंघटीत क्षेत्र याखाली आल्यास सर्व स्तरांवर खालील महत्वाचे फायदे होतील : इ.१) असंघटीत क्षेत्रामधल्या उलाढालीचे १००% अचूक नाहीत, पण पूर्वीपेक्षा खूप विश्वासू आकडे मिळतील... म्हणजे जीडीपीचे आकडे अधिक विश्वासू बनतील. इ.२) वेतनातली फसवाफसवी कमी होऊन कामगाराचा फायदा होईल. इ.३) या क्षेत्रात, वर सांगितल्याप्रमाणे, करचुकवेगिरी ही सामान्य स्थिती आहे. तिच्यात सुधारणा होऊन करसंकलन वाढेल. हे क्षेत्र बरबाद झाले असे अतीव करुणेने बोलणे राजकिय दृष्ट्या फायद्याचे आहे. या क्षेत्रामुळे मिळणार्‍या किती आणि कोणत्या सेवा शहरी व ग्रामीण भागांत बंद झाल्या आहेत याचा अंदाज तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून आणि तुमच्या इतर ठिकाणच्या विश्वासू माणसांच्या अनुभवावरून बांधू शकता. त्याचबरोबर हे लोक नुकत्याच झालेल्या निवडणूकांत मतदार होते हे पण विसरून चालनार नाही. इतर काही असले तरी, या सेवा फारकाळ बंद ठेवणे त्यातील कामगारांइतकेच किंवा जास्तच उद्योजकांना गैरसोईचे आहे. ती जवळ जवळ पूर्णपणे कॅश अर्थव्यवस्था असल्याने नोटाबंदी झाल्यावर सुरुवातीला तिला मोठा झटका बसणारच. मात्र आता सहजी उपलब्ध कॅश व बँक/डिजिटल व्यवस्थेचा वाढता उपयोग यामुळे ती रुळावर येणे आणि तिच्यातला वैधपणा वाढणे अपेक्षित आहे. माझ्या दृष्टीने, अजून एक महत्वाचा फायदा असा की, या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन मिळणे सुलभ होईल व त्यांच्या आर्थिक पिळवणूकीला जरातरी पायबंद बसेल. काही काळाने, बहुतेक पुढच्या दोन तीन तिमाह्यांत, हाती येणारे खर्‍या उत्पन्नाच्या आकड्यांमुळे असंघटीत क्षेत्राचे जीडीपीमधले योगदान वाढले तर मला तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Sat, 03/04/2017 - 15:08 नवीन
हा फटका बसला यात वाद नाही पण तो विरोधकांनी केलेल्या दाव्यांइतका भयानक वगैरे नव्हता. फटका बसला हे मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 18:17 नवीन
फटका बसला हे मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.

हे पहिल्यापासूनच कधी आणि कोणी नाकारले होते !!!???

फक्त "तो फटका आकांडतांडव केले गेले तेवढा मोठा नक्कीच नव्हता" हे म्हटले जात होते आणि तेच जनतेनेही आपल्या कृतीने (निषेध मोर्चे बारगळणे, निवडणूकीतल्या मतदानाचा कौल, इ) दाखवून दिलेले आहे. तरीही त्याबद्दल संशय आहेच का ?! की हे नेहमिचेच यशस्वी "सोईस्कर-दुर्लक्षास्त्र" आहे ?! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
न
नितिन थत्ते Sat, 03/04/2017 - 15:58 नवीन
>>आ) नोटाबंदीनंतरचे निवडणूकींचे निर्णय. गाजावाजा केला गेला तेवढा लोकक्षोभ असता तर भाजप आतापर्यंत गारद व्हायला हवा होता ! तेव्हा अधिक विश्लेषणाची गरज नाही. हा न्याय लावायचा तर ज्या अर्थी इतकी वर्षे (पक्षी- ६५ की काय ती) विरोधक बोंब मारत असले तरी सरकारचा कारभार वाईट नव्हता. नाहीतर काँग्रेस कधीच गारद झाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते Sat, 03/04/2017 - 16:00 नवीन
हा न्याय लावायचा तर ज्या अर्थी इतकी वर्षे (पक्षी- ६५ की काय ती) लोकक्षोभ न होता काँग्रेसने राज्य केले त्या अर्थी विरोधक बोंब मारत असले तरी सरकारचा कारभार वाईट नव्हता असे सिद्ध झाले असे म्हणावे लागेल. नाहीतर काँग्रेस कधीच गारद झाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 18:44 नवीन
असं आहे, चाचा... त्याला आपण दुसरा सबळ पर्याय नसल्याने (किंवा बर्‍यावाईट मार्गांनी पर्याय निर्माण होऊ न दिल्याने *) जनतेने नाईलाजाने सहन केलेली कुचंबणा म्हणू शकतो ! "कोणाला मत देणार सगळेच एका माळेचे मणी" हे वाक्य तुमच्या सारख्या जाणकाराने ऐकले नसेल असे थोडेच आहे ?! ============ * : "हे कसे काय बुवा ?" असा प्रश्न येण्याची शक्यता जमेस धरून... जगभरातून कामातून काढून टाकलेली ४०-४० वर्षे जुनी मॉडेल्स न बदलता विकून आणि इतर कोणा कंपनीला भारतात यायला (राजकिय पाठबळावर) विरोध करून हिंदुस्तान मोटर्स (अँबॅसॅडर) आणि प्रिमियर ऑटोमोबाईल्स (फियाट, प्रिमियर पद्मिनी) भारताच्या रस्त्यावर ८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांपर्यंत अनिर्बंध राज्य करत होत्या; कार देतो म्हणजे उपकार करतो अश्या आवेशात लोकांना विनाव्याज डिपॉझीट भरून अनेक वर्षे वाट पहायला लावत होत्या. ते त्यांच्या उत्तम कारगिरीने होत नव्हते, तर जनतेला दुसरा पर्याय नसल्याने (निर्माण होऊ न दिल्याने) होते. त्याचमुळे, एक ८०० सीसीचा इवलासा जीव मारुती-सुझुकीच्या रुपाने भारतात आला आणि तोपर्यंत भारताच्या रस्त्यांवर राज्य करणार्‍या त्या दोन बलशाली कार कंपन्या दोन वर्षांत गारद झाल्या की हो !.... कारण ? चांगला पर्याय, काका, चांगला पर्याय ! =)) =)) =)) आता राजकिय पक्षांची नावे देऊन काही जणांची दुखती रग रगडण्याचे पाप करायला नको म्हणून उद्योगधंद्यांचे उदाहरण दिले. पण तुमच्यासारख्या सूज्ञाला अधिक काय सांगणे ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मार्मिक गोडसे Sat, 03/04/2017 - 14:32 नवीन
आता दिसणारी जीडीपीतील अपेक्षेपेक्षा कमी तूट होण्यामागे अभूतपुर्व करसंकलन व उत्तम खरीपाच्या उत्पन्नाचे खात्रीने हाती आलेले आकडे आहेत, हे मी पूर्वीच्या एका प्रतिसादांत लिहिले होते... त्याला काहींनी आक्षेप घेतला होता. का घेऊ नये? कारण खरीपाच्या हंगामात नोटाबंदी झालीच नव्हती. उगाचच आयते श्रेय कोण बरे घेऊ देइल?
विषय किचकट आणि अनेक एकमेकात गुंतलेल्या कृती-परिणामांचा आहे. थोडक्यात सगळे सांगणे शक्य नाहीच.
अगदी सोपे आहे. काळे व्यवहार केल्याने जीडीपीत कोणतीही वाढ होत नाही. एखाद्या प्रामाणिक करदात्याने आपल्या कष्टाचा पांढरा पैसा नाईलाजास्तव घर खरेदीकरता बिल्डरच्या सोयीसाठी कुठलीही अधिकृत पावती न घेता दिल्यास त्या पैश्याने झालेल्या व्यवहारामुळे जीडीपीत कोणतीही वाढ होत नाही. हे फक्त एक उदाहरण दिले. तुम्ही म्हणता तसे रोखीने केलेले कोणतेही अवैध व्यवहार जीडीपीला सूज आणत नाही. मिपावरील प्रामाणिक करदाते शांत का? डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढेल हे मान्य. परंतू, नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहार वाढतील किंवा डिजिटल व्यवहार वाढावेत हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता हे मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 18:59 नवीन
कारण खरीपाच्या हंगामात नोटाबंदी झालीच नव्हती. उगाचच आयते श्रेय कोण बरे घेऊ देइल? अरे कर्मा ! आता हे पण परत परत सांगावेच लागेल का ? नोव्हेंबर-डीसेंबरमध्ये वाढलेल्या करसंकलनाची जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा हे मी स्पष्ट केले होते आणि इथल्या काही तज्ञांना ते "सोईचे" वाटले नव्हते म्हणून इस्काटून सांगितले होते. ते थोडक्यात परत एकदा... खरीपाच्या हंगामात नोटाबंदी झाली नाही... पण ज्या खरीपाची पेरणी झाली त्याच्या उत्पन्नामुळे देशाच्या जीडीपीत किती भर पडली हे (पीक कापून त्याच्या विक्रिचे/विक्रियोग्य उत्पन्न स्पष्ट झाल्यानंतरच) नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये (ज्या महिन्यांत नोटबंदी झाली) उर्फ तिसर्‍या आर्थिक तिमाहीत स्पष्ट होते. अर्थात खरीपाच्या हंगामाच्या उत्पन्नाचा नक्की परिणाम (अंदाज नाही) तिसर्‍या तिमाहीच्या जीडीपीत दिसतो... त्या अगोदर नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 19:09 नवीन
तुमच्या मुद्दलात फार गोंधळ आहे हे विनयाने नमूद करत आहे ! राग नसावा. खरेच माहिती हवी असल्यास अर्थशास्त्राच्या मूलभूत पुस्तकांपासून, संस्थळापासून अथवा जाणकार व्यक्तीसह प्रत्यक्ष चर्चेने सुरुवात करावी, असे सुचवतो. मुक्त संस्थलावर, ते करणे खूप वेळखावू तर आहेच, पण फायद्याचेही नसेल. हे पटत नसेल तर मी तुम्हाला समजावून देण्यात कमी पडत आहे असे समजलेत तरी चालेल ! याशिवाय, माझी सगळी मते सगळ्यांनाच मान्य असावी असा माझा कधीच आग्रह नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 03/06/2017 - 05:48 नवीन
तुमच्या मुद्दलात फार गोंधळ आहे हे विनयाने नमूद करत आहे ! धन्यवाद! आता मनमोहनसिंग , अमर्त्य सेन हे कुठे क्लास लावताय हे बघणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/06/2017 - 17:11 नवीन
त्यांनी तुमच्याकडे क्लास लावावा असे मी सुचवेन, अर्थात, जर त्यांनी माझे ऐकले तर ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पुंबा Fri, 03/03/2017 - 13:03 नवीन

किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली याची आकडेवारी कधी व कुठे मिळेल?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित Fri, 03/03/2017 - 13:10 नवीन
एवढी घाई का करताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित Fri, 03/03/2017 - 13:10 नवीन
एवढी घाई का करताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 03/06/2017 - 07:42 नवीन
अरे हो.. भाजपच्या सोयीची आकडेवारी आली तर कळेलच. बाकी डेटा मागणारे भ्रष्ट, काळा पैसा धारक, राष्ट्रद्रोही नाही का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 03/02/2017 - 14:06 नवीन
हे आकडे मखलाशी करुन काढले आहेत असे लोकसत्ता मधे पुराव्यासह सिद्ध करुन आले आहे. नक्की कुणाचे खरे समजावे हा प्रश्न पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 13:03 नवीन
लोकसत्तेचा उल्लेख आला आणि धन्य झालो ! याचसाठी केला होता अट्टाहास (प्रतिसादाचा) ?! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 13:14 नवीन
कुठला पेपर चांगला .. लोकसत्ता जाऊदे राजकीय अग्रलेख पटत नसतील तर आणीबाणी पासून भूमिका तपासू लोकसत्ता ची महाराष्ट्र टाइम्स भारत कुमार राऊत संपादक बेस्ट असा म्हणायचंय का सकाळ पवारांचा पेपर छान लोकमत दर्डांचा पेपर पुढारी सामना ना बोलले बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुंबा Mon, 03/06/2017 - 06:47 नवीन
आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर सतत संशय घ्यायचे ठरले आहेना ?!
विशुमीत यांना तुम्ही दिलेला प्रतिसाद. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/02/2017 - 13:20 नवीन
हे Q-३ चे रिझल्ट्स आहेत आणि त्यात शेती {३.८ -> ६ }आणि मायनिंग {(-१.३) ->७.५ } उत्पनाचा जास्त हातभार आहे. हे तर आहेच, परंतू नोटाबंदीचा सर्वाधिक फटका ज्या असंघटित क्षेत्राला बसला त्याचा डेटा ह्यात पकडला नाही. तो समोर आला तर चित्र कदाचीत वेगळे असेल.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 13:39 नवीन
पासून बोलतोय निर्णय चुकीचा आहे . असंघटित क्षेत्र सामान्य लोक यांचा आवाज कोणी ऐकत नसतं. मोठी लोकं हो बोली कि हो बाबा . राष्ट्र महत्वाचं आहे हो बाबा . ५०० रुपया वर मतं मिळतात हो बाबा काळा पैसे बाहेर काढून तुम्हाला पण मिळेल हो बाबा ६० वर्ष काँग्रेस जिंकली आज आपण जिंकू हो बाबा जिडीपी कधी काय होता कोण विचारत थोडी हो बाबा . अवांतर - कित्येक वर्षाचे जिडीपी अहवाल दाखवा . नाक दाबल्यावर पैसे जमा झाले व ग्रेट होम लोन स्वस्त झालं हो बाबा पैसे जमा झाले खूप तर कुठल्याच बँकेने आज रेट नव्हते वाढवायला हवे .सामान्य माणसाला का त्रास . होमलोन तर लुटणारी लोकं आज आहे उद्या नाही .
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 13:51 नवीन
सोप्या भाषेत काय आहे मी ८ हजार महिन्याला कमवतो माझी ताकद नाही हुशार असण्याची किंवा प्रतिवाद करण्याची पण मला काय मिळालं . देश हिताचा निर्णय तर माझ्या ओळखीचे कोणीच पकडले गेले नाहीत २ % पैसे काढायला जे कुठलीही सरासरी वर्षात मिळतात ब्लॅक मनी म्हणून त्यासाठी ७८% लोकांना त्रास उगाच ??? जिडीपी कसा वाढतो का वाढतो भूतपूर्व किती ??? आकडेवारी द्या
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 14:01 नवीन
कोणाकडून तरी उत्तर हवंय मला कसा फायदा झाला?? माझा पगार ८ हजार आहे बँकेत उभं राहण्यामुळे माझे काही तास वाया गेले . भारताचा जिडीपी कसा वाढतो माहित नाही दर वर्षी वाढतो का ?? पूर्वी वाढलाच नाही का ?? नोटबंदी मुळे खूप फायदा झाला असेल खूप वाढलाय का जिडीपी ?? मुळात का वाढतो ?? मला कोणतरी बोलाय राष्ट्रभक्ती मी सगळे पैसे बँकेत जमा केले माझं नुकसान झालं फॅक्टरीवर कामावर रोज कोणी बोलवलं नाही मी त्यांना बोलो जिडीपी वाढलाय तरी कंजूसगिरी तर भाग बोले मला
  • Log in or register to post comments
अ
अनरँडम गुरुवार, 03/02/2017 - 19:22 नवीन
कदाचित, "नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :)
तुमचे हे विधान पूर्णपणे पूर्वग्रहदुषित आहे हे प्रथम नोंदवतो. बातमीत म्हटल्याप्रमाणे 'The growth numbers were better than those projected by the RBI (6.9 per cent) and international agencies like IMF (6.6 per cent).' रिझर्व बँकेचे वाढीचे अंदाजही कमीच असल्याचे दिसते. बहूधा काही unanticipated घटकांमुळे वाढीचे अंदाज चुकलेले असू शकतील. पण अर्थतज्ज्ञांना या अंदाजांचा अभ्यास करून मत नोंदवण्यास वेळ लागणे स्वाभाविक आहे याचा अर्थ लगेच ते शेपूट घालून पळाले असा होत नाही. नोटाबंदीसाठी आलेला खर्च आणि त्यामुळे झालेला फायदा यांचे गणित वाढीच्या नव्या दराने कितपत बदलेल हे काळजीपूर्वक तपासले पाहीजे. असो. अवांतरः या पंचशतकी धाग्याचा गौरव करून नविन धागा काढावा म्हणजे नविन माहितीप्रमाणे विस्तृत चर्चा शक्य होईल.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 03/03/2017 - 07:18 नवीन
अवांतराशी सहमत. निश्चलनीकरणाबद्दलच्या(३१ डिसे. नंतरच्या) डेटाचा अभ्यास नव्या धाग्यात व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनरँडम
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 10:19 नवीन
तुमचे हे विधान पूर्णपणे पूर्वग्रहदुषित आहे हे प्रथम नोंदवतो. ते तसे आहे हे कसे याचे दीर्घ विश्लेषण मी याच विषयावरच्या माझ्या एका प्रतिसादात अगोदर केले आहे. ते पहावे म्हणजे माझे विधान पूर्वगृहदूषित नसून सकारण आहे हे ध्यानात येईल. माझ्या त्या विश्लेषणाच्या बाजूचे लेख त्यानंतर माध्यमांतही वाचनात आलेले आहेत. मनमोहनसिंगांच्या अर्थतज्ज्ञ व माननिय महोदय लेबलांच्यामागे मागे लपून काँग्रेसने आपला कार्यभाग साधण्याचे प्रसंग काही कमी नाहीत. त्याचा वारंवार अतिरेक होत आहे हे पाहून, Parliamentary Standing Committee of Finance च्या सभेत आपल्या पक्षाचाच सहसभासद असलेल्या दिग्विजयसिंहाने विचारलेल्या खोचक प्रश्नांना, गव्हर्नर उर्जित पटेल यांनी उत्तर देण्याअगोदर, "पटेल यांनी उत्तर देऊ नये" असे तेथेच स्पष्ट विरोधी मत "मनमोहनसिंग" यांनी नोंदवले होते. अश्या तर्‍हेने प्रश्न अडवणे म्हणजे "तो प्रश्न बेजबाबदारपणे विचारला आहे असे म्हटल्यासारखे (पक्षी : अपमानस्पद)" असते. अश्या तर्‍हेने आपल्याच साथिदाराचा प्रश्न अडवण्याचे दुसरे कुठले उदाहरण, असेलच तर, अत्यंत विरळ असेल. त्यानंतर, बहुदा त्यावरूनच बोध घेऊन काँग्रेसने, निदान आरबीआयवर टीप्पणी करणे तरी, पूर्णपणे थांबवले आहे. माझे मत पूर्वग्रहदुषित आहे असा दावा करताना, मनमोहनसिंगांचा गैरवाजवी उपयोग होत आहे ही सर्वसामान्य माध्यमांत असलेली गोष्ट तुमच्या नजरेत नाही याचे आश्चर्य वाटले ! :) *************** वेळ घेऊन, तथ्ये तपासून, विचारपूर्वक मत देण्याची पद्धतिची तुम्ही पाठराखण करता आहात हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद ! माझेही तेच मत आहे. माझ्या मूळ प्रतिसादातला एक महत्वाचा मुद्दा, "विरोधकांकडून तसे पूर्वी झाले नव्हते व बर्‍याचदा होत नाही", असाच आहे :) फक्त आपल्याला सोईचे असेल तेव्हाच ते तत्व वापरावे, गैरसोईचे असले तर विसरावे, हे चुकीचे होईल, नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनरँडम
फ
फेदरवेट साहेब Fri, 03/03/2017 - 09:41 नवीन
आपले खूप खूप आभार =))
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 03/05/2017 - 05:21 नवीन
जिडीपी, मागची पासष्ट का सत्तर वर्ष काय झालं , अमका काय बोलला आणि तमक्यानं काय केलं...ती निव्वळ फालतू चर्चा आहे. आता फक्त तुमच्या निष्कर्शाबद्दल बोला भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल ! झाला का आनंद ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/07/2017 - 18:55 नवीन
"प्रोस आणि कॉन्सचा इनपुट मनाच्या कंप्युटरमध्ये टाकून, मग मनाचा कंप्युटर बंद करून आणि नंतर अश्या बंद कंप्युटरमधून ताबडतोप अचूक आणि इंस्टंट उत्तरे मिळवून आनंदी होण्याचा शोध " या जगात तुम्ही सोडून इतर कोणालाच लागलेला नाही. इतर सगळे जण, मर्त्य मानव असल्याने, विचार करून उपाय शोधतात आणि ते अंमलात आणून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, बदल घडवून आणायला त्यांना बर्‍यापैकी वेळ लागणारच ! =)) याशिवाय प्रयत्नात अडथळा आणणारे शुक्राचार्य काय कमी आहेत ?! ;) तुम्ही तुमच्या बंद केलेल्या काँप्युटरचा उपयोग केवळ स्वतःकरिताच न करता, नि:स्वार्थिपणे आपल्या मायभूमीसाठी कराच... आणि क्षणभरात इथे नंदनवन अवतरेल असे काही करा ! मग त्या बंद काँप्युटरची ख्याती सांगायला प्रतिसादांची चळत उभी करायच्या अजीजीची गरजच पडणार नाही, हा पण फायदा होईल. बघा बुवा ! ;) परंतू, तुम्ही तर सदासुखी असल्याचे सतत सांगत असता (एक म्हण आठवली, पण ते जाऊ द्या), त्यामुळे तुम्हाला कशानेच फरक पडायला नको, नाही का ? :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 03/08/2017 - 08:46 नवीन
भ्रष्टाचार अजिबात कमी झालेला नाही आणि आता तर तो पूर्वपदावर आला आहे. महागाई कमी होण्याचं सोडा, ती वाढतेच आहे. निर्चलनीकरणानं काहीही साध्य झालेलं नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/08/2017 - 08:56 नवीन
तुमच्याच शब्दांत मुख्य मुद्दा (कारण असे आढ्यतापूर्ण शब्दप्रयोग अपवादात्मक परिस्थितीत नाईलाज झाल्याशिवाय वापरायची मला सवय नाही) सांगायचा झाला तर... अमका काय बोलला, तमक्यानं काय केलं, मीच्च कसा कायम ग्रेट आहे, बाकीचे सगळे कसे सतत चूक आसतात... अशी निव्वळ फालतू चर्चा करणार्‍यांच्या लिखाणाला आम्ही त्याच्या योग्य जागी (पक्षी : कचर्‍याच्या टोपलीत किंवा एखाद्या ओसडगावच्या फाट्यावर) टाकतो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 03/08/2017 - 09:19 नवीन
त्यामुळे ही पोस्टच फाट्यावर मारण्यासारखी झालीये. पुन्हा वाचा : भ्रष्टाचार अजिबात कमी झालेला नाही आणि आता तर तो पूर्वपदावर आला आहे. महागाई कमी होण्याचं सोडा, ती वाढतेच आहे. निर्चलनीकरणानं काहीही साध्य झालेलं नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/08/2017 - 14:19 नवीन
तुमच्याइतक्या सर्वज्ञानीला अजूनही समजत नाही काय ?! चला, तुम्ही कबूल केले नाहीत तरी तेच तुमच्या लिखाणातून व्यक्त होते आहे. तेव्हा अगदी इस्काटून परत एकदा... काहीही विदा, स्पष्टीकरण, विश्लेषण न देता केलेली बेजबादारपणे केलेली विधाने (जे तुम्ही नेहमीच करत असता) यांना त्यांच्या योग्य जागी (पक्षी : कचर्‍याच्या टोपलीत किंवा एखाद्या ओसाडगावच्या फाट्यावर) टाकलेली आहेत. त्यांना इतर कोणतेही महत्व देणे म्हणजे, "...कालचा गोंधळ बरा होता" असेच होईल. :) असे दगडफेक करून पळून जाण्याऐवजी, जरा हिम्मत दाखवून, केवळ अफाट, उद्धट व बेजबादार विधाने न करता, त्यांच्यामागचा (फुकाचा अतीव्यक्तिगत अध्यात्म सोडून, शहाण्यासुरत्या लोकांना समजेल असा) काही तार्किक आधार (असलाच तर) लिहा. मग त्याबद्दल काहीतरी बोलण्याचे ठरवता येईल. तो पर्यंत आत्मानंदात मग्न रहा आणि आमचे मनोरंजन करत रहा ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 03/08/2017 - 18:57 नवीन
भ्रष्टाचार कमी झाला का? एकदा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन पाहा (माझा या खात्यांशी कायम संबंध येतो) आणि मग प्रतिसाद द्या. महागाई कमी झाली की वाढली यासाठी विदा लागत असेल (इथे किराणा मालाची बिलं टाकावी अशी अपेक्षा आहे का ?) तर सध्या तुम्ही कोणत्या देशात राहाता ? आता पुन्हा वाचा : भ्रष्टाचार अजिबात कमी झालेला नाही आणि आता तर तो पूर्वपदावर आला आहे. महागाई कमी होण्याचं सोडा, ती वाढतेच आहे. निर्चलनीकरणानं काहीही साध्य झालेलं नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा